शिर्डी | 4 जानेवारी 2023 : वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर आणि राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांची मध्यंतरी मोदी बागेत भेट झाली होती. आंबेडकर यांनी आधी ही भेट झाल्याचा इन्कार केला होता. पण नंतर त्यांनी ही भेट झाल्याचं सांगितलं होतं. त्यानंतर आता शरद पवार यांनीही या भेटीबाबत पहिल्यांदाच भाष्य केलं आहे. आंबेडकरांसोबत भेट झाल्याचं पवार यांनी स्पष्ट केलं आहे. तसेच आंबेडकर हे भाजप सरकारला घालण्यावर आग्रही आहेत, असं शरद पवार यांनी सांगताच उपस्थितांनी टाळ्यांचा एकच कडकडाट केला.
राष्ट्रवादी काँग्रेसचं शिर्डीत कार्यकर्ता शिबीर पार पडलं. यावेळी शरद पवार यांनी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना प्रकाश आंबेडकर यांच्याशी झालेल्या चर्चेची माहिती दिली. येत्या 15 दिवसात इंडिया आघाडीची बैठक होणार आहे. देशाला पर्याय कसा देता येईल, यावर या बैठकीत चर्चा होणार आहे, असं सांगतानाच प्रकाश आंबेडकर यांच्याशी माझी चर्चा झाली आहे. त्यांच्याशी आमची चर्चा योग्य मार्गावर आहे. मोदींना सत्तेवरून हटवण्यासाठी प्रकाश आंबेडकर आग्रही आहेत. त्यामुळे दिल्लीत होणाऱ्या इंडिया आघाडीतील बैठकीवेळी प्रकाश आंबेडकर यांना इंडिया आघाडीत घ्या म्हणून नेत्यांना सांगणार आहे, असं शरद पवार यांनी सांगितलं. शरद पवार यांनी ही घोषणा करताच टाळ्यांचा एकच कडकडाट झाला.
यावेळी शरद पवार यांनी इंडिया आघाडीसोबतच निवडणूक लढणार असल्याचं जाहीर केलं. आपण एकटे लढणार नाही, सर्व सहकार्यांना सोबत घेऊन लढणार आहोत. जनतेचा आपल्याला पाठिंबा मिळेल याची खात्री आहे. तुम्ही या कामाला तयार राहा, असे आदेशच पवार यांनी कार्यकर्त्यांना दिले.
पंतप्रधान नरेंद्र मोदींशिवाय देशात पर्याय नाही, असं उपमुख्यमंत्री अजित पवार वारंवार म्हणत असतात. पवार यांच्या या विधानाचाही शरद पवार यांनी समाचार घेतला. आमचे काही सहकारी म्हणतात बदल करायचा असेल तर एकच व्यक्ती आहे. ती म्हणजे मोदी. मोदींना पर्याय नाही. ही खोटी मांडणी आहे. मोदींना पर्याय नाही. ही गोष्ट खरी नाही, असं शरद पवार यांनी ठणकावून सांगितलं.
तुमचा पंतप्रधान पदाचा उमेदवार दाखवा, अशी विचारणाही आमच्याकडे होती. सत्ताधारी नेहमी म्हणतात, तुम्ही इंडिया म्हणून एकत्र होता. पण तुमचा पंतप्रधान पदाचा उमेदवार कोण? इंडिया आघाडीच्या बैठकीत मी म्हटलं, तुम्ही चिंता करू नका. एमर्जन्सीमध्ये देशात निवडणुका झाल्या. तेव्हा त्यावेळी पंतप्रधानपदाचा उमेदवार जाहीर केला नव्हता. निवडणुकीनंतर जनता पक्षाचा जन्म झाला. त्यानंतर मोरारजी देसाई यांची पंतप्रधान म्हणून निवड झाली. म्हणून आजच उमेदवार जाहीर करा. तो नाही केला तर देश चालू शकत नाही, हा प्रचार खोटा आणि फसवा आहे. त्यामुळे मोदींना पर्याय नाही असं सांगितलं जातं त्यात काही अर्थ नाही, असं त्यांनी स्पष्ट केलं.
देशातील शेतकरी अन्नदाता आहे. त्याला अनेक अडचणींना सामोरे जावं लागतं. अवकाळी पावसामुळे त्याचं नुकसान झालं. शेतीवर अवलंबून असलेल्या लोकांची संख्या वाढली. स्वातंत्र्याच्या काळात आपली लोकसंख्या 35 कोटी होती. त्यावर 70 ते 80 टक्के लोक अवलंबून होते. आज लोकसंख्या 114 कोटीच्या पुढे गेलो. आज 56 टक्के लोक शेतीवर अवलंबून आहेत. म्हणजे लोकसंख्या अडीच ते तीन पट वाढली. लोकसंख्या वाढली, पण जमिनीचं क्षेत्रफळ वाढलं नाही. धरणं बांधली, शेतीची जमीन गेली, एमआयडीसी बांधल्या शेतीची जमीन गेली, शहरं बांधली शेतीची जमीन गेली.
विकासाचे जे कार्यक्रम असतील, त्यासाठी जमीन घ्यावी लागते. त्यामुळेही जमिनीचं प्रमाण कमी झालं आहे. त्यामुळे शेतकऱ्यांची अवस्था चिंताजनक झाली आहे. आम्ही सातत्याने सांगतो, शेतीवरचा बोजा कमी करण्यासाठी धोरणं आखा. त्याावर निर्णय घ्या. अन्य पर्याय घ्या. जोपर्यंत शेतीवरील बोजा कमी करत नाही, तोपर्यंत देशाची गरीबी दूर करू शकत नाही, असं त्यांनी सांगितलं.