शरद पवारांना शिक्षण खातं अवघड जागेचं दुखणं का वाटलं?, चव्हाणांना का म्हणाले या खात्यातून सुटका करा?; असा किस्सा जो कुणालाच माहीत नाही
शिक्षण खातं हे किती महत्त्वाचं आहे आणि त्याची जबाबदारी पेलणं किती कठीण आहे याचा प्रत्यय खुद्द राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांना आला.
नाशिक: शिक्षण खातं हे किती महत्त्वाचं आहे आणि त्याची जबाबदारी पेलणं किती कठीण आहे याचा प्रत्यय खुद्द राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांना आला. एवढंच नव्हे तर या खात्यातून सुटका करा अशी विनंतीच त्यांनी राज्याचे माजी मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांना केली होती. त्याचा किस्सा सांगतानाच शिक्षण खात्याऐवजी कृषी खातं चव्हाणांकडे मागितल्याचंही शरद पवार यांनी सांगितलं.
शरद पवार नाशिकमध्ये होते. एका कार्यक्रमात भाषण करताना शरद पवार यांनी शिक्षणाचं महत्त्व सांगतानाच हे खातं मिळाल्यानंतर कशी दमछाक उडाली होती याचा किस्साच सांगितला. गेल्या अनेक वर्षापासून मी राजकारणात आहे. एकदा मी शिक्षण मंत्री होतो. तेव्हा शिक्षकांचं शिष्टमंडळ आपल्या मागण्या घेऊन यायचे. त्यांच्या मागण्या मान्य केल्या की कोट्यवधी रुपयांचे बर्डन येत होतं. त्यावेळी कळालं शिक्षण मंत्र्यांएवढं अवघड काम नाही. तेव्हा मला शिक्षण संघटनेचे अनेक लोक भेटत. मी कच्चा विद्यार्थी आहे असं त्यांना वाटायचं. एकदा यशवंतराव चव्हाण साहेबांनी मला विचारलं, मंत्रिमंडळात तुम्हाला कोणतं काम करायचं आहे? मी त्यांना सांगितलं शिक्षण खात्यातून माझी सुटका करा, कृषी खातं द्या. त्यानंतर मी कृषी खात्याचं काम सुरू केलं, असा किस्सा पवारांनी ऐकवताच एकच खसखस पिकली.
महात्मा फुलेंनीच शिक्षणाचं सार्वत्रिकरण केलं
देशाच्या अनेक राज्यात शिक्षणाचा विस्तार झाला. शिक्षणाचा विस्तार करण्याची जबाबदारी राज्यकर्त्यांची आहे. महाराष्ट्रात शिक्षण विस्ताराची जबाबदारी एका ठराविक वर्गानंतर खासगी शिक्षण संस्थानी उचलली. अनेकांनी शिक्षणसंस्था सुरू केल्या, शिक्षणसंस्था वाढवण्याचं काम अनेकांनी केलं. अनेक मान्यवरांनी शिक्षणसंस्था मोठ्या केल्या आणि ज्ञानदानाचं काम केलं. शिक्षणाचं सार्वत्रिकीकरण करण्याचं काम खऱ्या अर्थानं महात्मा ज्योतिबा फुले आणि सावित्रीबाई फुले यांनी केलं. महात्मा फुले यांनी शिक्षण क्षेत्राला वैज्ञानिक दृष्टिकोन देण्याचं काम केलं. शिक्षणाचा जागर करण्याचं काम खऱ्या अर्थानं महात्मा फुलेंनी केलं, असं गौरवोद्गागार त्यांनी काढलं.
सरकारी हस्तक्षेपाला मर्यादा हव्यात
शिक्षण संस्थांचा अनुदानाचा प्रश्न सोडवण्यासाठी नगरविकास, अर्थ खातं आणि महामंडळ तसेच शिक्षण संघटनेच्या प्रतिनिधींची एकत्रित बैठक घेऊन प्रश्न सोडवावा लागेल. शिक्षण खात्याचा अति हस्तक्षेप नको, अशा काही शिक्षण संस्था चालकांच्या तक्रारी आहेत. सरकारी हस्तक्षेपाला मर्यादा हव्या, पण संस्था चालकांनीही तारतम्य ठेवणं गरजेचं, असंही ते म्हणाले.
भाजपने भरती होऊ दिली नाही
यावेळी पवार यांनी भाजप सरकारवर जोरदार टीका केली. मागच्या सरकारनं त्यांच्या कार्यकाळात भरती होऊ दिली नाही. मागच्या सरकारनं संस्था चालकांकडे चमत्कारीक नजरेनं पाहिलं. मागच्या सरकारनं अनेक गोष्टी तशाच ठेवल्या, भरती थांबवली. त्यामुळे 4 हजार पदं रिक्त आहेत, असं त्यांनी सांगितलं.
VIDEO : 36 जिल्हे 50 बातम्या | 15 November 2021https://t.co/UC4PvXVAeA#36JILHE50BATMYA #36district50news #MarathiBatmya
— TV9 Marathi (@TV9Marathi) November 15, 2021
संबंधित बातम्या:
औरंगाबादेत हळहळः लग्न तोंडावर, मुलगी पळून गेली, हताश बापाची आत्महत्या, लिहिलं- तिला घरात घेऊ नका…
मोदींविरोधात विरोधकांकडे चेहरा नाही काय?; शरद पवारांचं पहिल्यांदाच थेट उत्तर