नाशिक येथे सभेत बोलताना शुभांगी पाटील भावुक; म्हणाल्या, “या मुलीचं काही चुकलं तर…”
विजयाचा विश्वास जनतेने मला दिला. लढत फार मोठी आहे. मी झोपडी आहे. समोर बंगला आहे. पण झोपडीला महाविकास आघाडीचा आधार आहे.
नाशिक : महविकास आघाडीच्या उमेदवार शुभांगी पाटील (Shubhangi Patil) या प्रचारसभेत बोलताना आज भावुक झाल्याचं पाहायला मिळालं. भाषणादरम्यान शुभांगी पाटील भावुक झाल्या. त्या म्हणाल्या, जेव्हा मी आझाद मैदानावर लढायची त्यावेळी सोपं वाटायचे. पण आता व्यासपीठावर बसताना भीती वाटत आहे. सर्वांची दिलगिरी व्यक्त करते. काही चुकलं तर माफ करा, अशा त्या कातरत्या स्वरात म्हणाल्या. शुभांगी पाटील कुणी नेता नाही. सामान्य घरातून आहे. महाविकास आघाडीने (Mahavikas Aghadi) आश्रय दिल्याने बरं वाटलं.
सर्व लोकांचे नाशिक विभागाकडे लक्ष लागले आहे. नक्कीच दोन तारखेला आम्ही मातोश्रीवर विजयाची रॅली आणू, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. विजयाचा विश्वास जनतेने मला दिला. लढत फार मोठी आहे. मी झोपडी आहे. समोर बंगला आहे. पण झोपडीला महाविकास आघाडीचा आधार आहे.
माहेरची साडी नक्की देतील
जुनी पेन्शन योजनेचा प्रश्न आहे. डॉक्टर, वकील यांचा प्रश्न सोडविण्याचे आश्वासन त्यांनी दिले. दोन तारखेनंतर उपोषण, आंदोलन याला सुरुवात होईल. 30 तारखेला माझे भाऊ मला माहेरची साडी नक्कीच देतील, असं मतही शुभांगी पाटील यांनी व्यक्त केलं.
आणि मी होकार दिला
शुभांगी पाटील यांनी सांगितलं की, ज्यावेळी मी शिक्षण कार्यालयाला टाळे ठोकले होते, त्यावेळी सगळे मला म्हणाले होते की, तुम्ही पक्के शिवसैनिक आहात. मला वाटलं होतं की, मी चुकीच्या ठिकाणी जाऊन बसले की काय? उद्धव ठाकरे यांनी मला विचारलं, तू लढू शकते का. मी होकार दिला.
विधान परिषदेच्या नाशिक पदवीधर मतदार संघाच्या निवडणुकीसाठी शिवसेना ठाकरे गट प्रणित शिक्षक संघटनेची आज बैठक पार पडली. या बैठकीला शिवसेना ठाकरे गटाचे नेते सुभाष देसाई आणि विनायक राऊत उपस्थित होते.
या नेत्यांनी नाशिक पदवीधर निवडणुकीसाठी सर्व कार्यकर्त्यांना तयारी करण्यासाठी मार्गदर्शन केले. नाशिकमधील इंदिरानगर परिसरातील एका हॉटेलमध्ये ही बैठक झाली. यावेळी सुभाष देसाई आणि विनायक राऊत यांनी मार्गदर्शन केले.