नाशिक : शिक्षक भारती संघटनेचे आमदार कपिल पाटील (Kapil Patil) यांनी नाशिक पदवीधर मतदारसंघासाठी अपक्ष उमेदवार सत्यजित तांबे (Satyajeet Tambe) यांना पाठिंबा जाहीर केलाय. सत्यजित तांबे, त्यांचे वडील सुधीर तांबे (Sudhir Tambe) आणि कपिल पाटील (Kapil Patil) यांच्यात महत्त्वाची बैठक झाली. या बैठकीनंतर कपिल पाटील यांनी सत्यजित तांबे यांना पाठिंबा जाहीर केलाय. त्यामुळे सुधीर तांबे यांनी त्यांचे आभार मानले. “मी नाशिक पदवीधर मतदारसंघातून तीन निवडणुका लढवल्या. तीनही निवडणूक लढवत असताना आपल्या सगळ्यांनी खूप चांगला पाठिंबा दिला. पहिल्यावेळेस मला पक्षाचा पाठिंबा नव्हता. म्हणजे मी अपक्ष होतो. पण सर्व शिक्षकांनी मला मनापासून पाठिंबा दिला होता. माझ्या मनात शिक्षकांबद्दल सदैव कृतज्ञतेची भावना आहे. मला शिक्षक भारती संघटनाने सहकार्य केलं. मला सर्वांचे मनापासून आभार व्यक्त करायचे आहे. आमदार कपिल पाटील हे साक्षीदार आहेत. आम्ही विधीमंडळात अतिशय पोटतिडकीने विषय मांडले आहेत”, असं सुधीर तांबे यावेळी म्हणाले.
“सामान्य माणसाचं शिक्षण महत्त्वाचं आहे. शिक्षणाची महत्त्वकांक्षा शिक्षकांच्या माध्यमातून पूर्ण होऊ शकते. शिक्षकांना पेन्शन योजना मिळाली पाहिजे. शिक्षकांचे सर्व प्रश्न सुटायला हवेत. शिक्षकांच्या सन्माचा प्रश्न आहे. कपिल पाटील यांनी औरंगाबादला मोठा मोर्चा काढला होता. मी तिथे सुद्धा उपस्थित होतो”, असं सुधीर तांबे म्हणाले.
“सत्यजित पाटील यांना पाठिंबा द्यावा, अशी विनंती करण्यासाठी आलो आहे. मी सर्वांना अतिशय सन्मानाने वागणूक देईन. मी आपल्या पाठिशी खंबीरपणाने उभा राहील. तसेच सत्यजितही राहील”, असं आश्वासन सुधीर तांबे यांनी दिलं.
“मी जरी काही दिवसांनी माजी आमदार होणार आहे. पण माजी आमदार म्हणूनही काम करता येईल. शिक्षकांच्या हक्कासाठी दोन आमदार आमच्या परिवारातील राहतील. एक माजी असेल आणि एक आजी असेल. पुरोगामी विचारांशी आमची बांधिलकी कायम राहील. मी आपल्या संपर्कात राहील याची ग्वाही देतो”, असा शब्द सुधीर तांबे यांनी मतदारांना दिला.
यावेळी सत्यजित तांबे यांनीदेखील आपली भूमिका मांडली.
“मी गेले २२ वर्ष संघटनेच्या माध्यमातून या देशात काम करतोय. २००० साली मी काँग्रेसच्या विद्यार्थी संघटनेतून कामाला सुरुवात केली. पुढे मी जिल्हा परिषद सदस्य म्हणून काम केलं. त्यानंतर युवक काँग्रेसमध्ये काम केलं. युवक काँग्रेसचा राज्य अध्यक्ष म्हणून चार वर्षे काम केलं. असं या देशातील एकही राज्य नाही जिथे मी काँग्रेस पक्षाच्या संघटनेचं काम केलेलं नाही”, असं सत्यजित तांबे यावेळी म्हणाले.
“या राज्यातील असा एकही तालुका नाही जिथे मी काँग्रेसचं काम केलेलं नाही. चांद्यापासून बांद्यापर्यंत मी काम केलंय. मित्र जमवण्याचं काम केलं. अनेक राजकीय संस्था आणि संघटनांवर मी काम करतोय. म्हणूनच कपिल पाटील यांच्या मनामध्ये गेली अनेक वर्ष होतं, खरंतर कपिल पाटील माझ्यासाठी विधानसभेचा मतदारसंघ शोधत होते”, असं सत्यजित यांनी सांगितलं.
“अनेकवेळा आमची चर्चा व्हायची. ते म्हणायचे की, तू इथून-तिथून उभं राहण्याचा प्रयत्न कर. पण राजकारण असतं. ते किती हे असतं हे आपण गेल्या चार-पाच दिवसांत टीव्हीवर पाहिलेलं आहे. खूप राजकारण झालंय त्या विषयावर आम्ही योग्यवेळी योग्य रितीने आम्ही बोलूच. आता सध्या राजकारणावर बोलणार नाही”, अशी भूमिका सत्यजित यांनी मांडली.
“माझ्या पंधरा-सोळा वर्षाच्या कालखंडात माझे वडील सुधीर तांबे यांनी पदवीधर मतदारसंघाच्या निमित्ताने समाजातील पदवीधरांसाठी जे काम केलंय, शिक्षण क्षेत्रातील शिक्षक, कर्मचाऱ्यांचे प्रश्न असतील, खासगी संस्था असेल, प्रत्येक क्षेत्रात वडिलांनी केलं. ते काम आणखी ताकदीने पुढे नेण्याचं काम माझ्याकडून होईल”, असं आश्वासन सत्यजित तांबे यांनी दिलं.