Suhas Kande : पोलिसांनी परवानगी दिल्यास आदित्य ठाकरेंना भेटायला जाणार, सुहास कांदे यांनी स्पष्टच सांगितलं
पोलिसांनी परवानगी दिल्यास आदित्य ठाकरे यांना भेटायला जाणार, असे वक्तव्य सुहास कांदे यांनी केला आहे. त्यामुळे पुन्हा नवा सस्पेन्स तयार झाला आहे.
नाशिक : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Cm Eknath Shinde) यांच्या सुरक्षेवरून आणि इतर विविध मुद्द्यांवरून आमदार सुहास कांदे (Suhas Kande) हे आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) यांच्यावर थेट तोफा डागत आहेत. तेच त्यांनी आता पुढेही सुरू ठेवलं आहे. तसेच आदित्य ठाकरे यांनी केलेल्या आरोपांना त्यांनी जोरदार प्रतिउत्तर दिले आहे. तर सुहास कांदे यांनी जे आरोप केले होते सुरक्षेबाबत त्याला माजी गृहराज्यमंत्री शंभूराजे देसाई यांनीही दुजोरा दिला आहे. त्यातच आता आदित्य ठाकरे हे नाशिकच्या दौऱ्यावर असताना पोलिसांनी परवानगी दिल्यास आदित्य ठाकरे यांना भेटायला जाणार, असे वक्तव्य सुहास कांदे यांनी केला आहे. त्यामुळे पुन्हा नवा सस्पेन्स तयार झाला आहे. आदित्य ठाकरे आणि सुहास कांदे यांचा सामना नाशिकमध्ये होणार का? असा सवाल अनेक शिवसैनिकांच्या मनात आहे.
परवानगी मिळाल्यास भेटायला जाणार
याबाबत बोलताना सुहास कांदे म्हणाले, पोलिसांनी परवानगी दिली तर आदित्य ठाकरे यांना भेटायला जाणार आहे, तसेच शिवसेना प्रोटोकॉल पाळणारा पक्ष आहे. त्यामुळे मी कोणताही प्रोटोकॉल तोडणार नाही. मी संपर्क प्रमुखांकडे दोन वेळा निरोप दिला आहे. मात्र त्यांच्याकडून अजून निरोप आला नाही, अशी माहिती ही सुहास कांदे यांनी दिली आहे. तसेच आदित्य ठाकरे माझ्या मतदारसंघात आले आहेत, त्यामुळे मातोश्रीवर भेटायला जाण्याचा प्रश्न येतच नाही. आमदार या नात्याने मी मतदार संघाचा प्रथम नागरिक आहे, मला मेळाव्याला बोलावले असते तर मी गेलो असतो असेही त्यांनी स्पष्ट केले.
खरी शिवसेना ही आमचीच आहे
तसेच धनुष्यबाण हे चिन्ह आमचेच राहणार आहे, उत्तर प्रदेश मध्ये समाजवादी पक्षांची स्थिती उद्भवली तीच शिवसेनेत आहे. पक्षात उभी फूट पडलेली आहे विधानसभा आणि लोकसभेमध्ये दोन तृतीयांश बहुमत आमच्या बाजूने असल्याने आमची खरी शिवसेना आहे, असे म्हणत बंडखोर आमदार गेल्या अनेक दिवसापासून जे बोलत आहेत, त्याला सुहास कांदे यांनी पुन्हा दुजोरा दिला आहे. त्यामुळे हा संघर्ष आणखी वाढत चालला आहे. तर दुसरीकडे आदित्य ठाकरे हे शिवसेनेतील गळती रोखण्यासाठी राज्यभर दौरे काढत आहेत. निष्ठा यात्रेच्या माध्यमातून कार्यकर्त्यांना आपल्या सोबत बांधून ठेवण्याचा प्रयत्न करत आहेत. मात्र तरीही दिवसेंदिवस शिंदे गाटाचा पाठिंबा हा वाढत चालला आहे. त्यामुळे आदित्य ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांची डोकेदुखी थांबायचं नाव घेत नाही.