Suresh Bhat Jayanti Special : जाळले गेलो तरी, सोडले नाही तुला, कापले गेलो तरी, तोडले नाही तुला…!
मराठीत गझल काव्यप्रकार रुजवण्याचे श्रेय सुरेश भटांना जाते. त्यांचे एल्गार, रंग माझा वेगळा, रूपगंधा, झंझावात असे अनेक काव्यसंग्रह गाजले. मात्र, कुठल्याही कवीचं गाणं लोकांच्या ओठी रुळनं हा त्या कवीचा मोठा सन्मान समजला जातो. तोच भटांना मिळाला.
केव्हा तरी पहाटे उलटून रात गेली…या गाण्यासारखी असंख्य भावस्पर्शी गाणी लिहून मराठी मन मोगऱ्याच्या गंधानं सुंगधित करणारे गझलसम्राट सुरेश भट (Suresh Bhat) यांची आज 15 एप्रिल रोजी जयंती (Birth Anniversary). भटांचा जन्म 1932 मध्ये अमरावती येथे एका ब्राह्मण कुटुंबात झाला. आयुष्याच्या शेवटी त्यांनी भाऊ लोखंडे यांच्या उपस्थितीत धम्मदीक्षा घेतली. भट नास्तिक होते. ते डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना मानायचे. बौद्ध (Buddhist) धर्म हा ईश्वराचे अस्तित्व नाकारणारा आणि बाबासाहेबांचा आहे. यामुळे आपण बौद्ध धम्माचा स्वीकार केला, असं ते म्हणायचे. या भटांचे हृदयविकाराच्या झटक्याने 14 मार्च 2003 वयाच्या 71 व्या वर्षी निधन झालं. मात्र, ते आपल्या कवितेनं अजरामर झाले. मराठीत गझल काव्यप्रकार रुजवण्याचे श्रेय भटांना जातं. त्यांचे एल्गार, रंग माझा वेगळा, रूपगंधा, झंझावात असे अनेक काव्यसंग्रह गाजले. मात्र, कुठल्याही कवीचं गाणं लोकांच्या ओठी रुळनं हा त्या कवीचा मोठा सन्मान समजला जातो. तोच भटांना मिळाला. सुरेश भट डॉ. बाबासाहेब आंबेडकरांबद्दल म्हणत, जाळले गेलो तरी, सोडले नाही तुला, कापले गेलो तरी, तोडले नाही तुला, ही तुला उद्ध्वस्त झालेल्या घरांची वंदना. मराठी माणूस आणि सुरेश भटांचं नातंही नेमकं असंच आहे. मराठी मुलुखात मोठ्या दिमाखात मुशाफिरी करणाऱ्या या आगळावेगळ्या कलंदराचा हा थोडक्यात परिचय.
आईला कविता आवडायच्या
सुरेश भटांचे वडील श्रीधर भट. पेशानं डॉक्टर. सुरेश भटांच्या आईला कविता आवडायच्या. हेच बीज पुढे भटांमध्ये अंकुरलं. घरात आई-वडिलांना संगिताची आवड. त्यात आई हार्मोनियम वाजवायच्या. त्यांनी सुरेश भटांना लहानपणीच संगीताची गोडी लावली. भटांचा पाय लहानपणीच पोलिओनं अधू झालेला. त्यामुळं ते ही खेळण्याऐवजी घरात संगीतात रमत. त्यांच्यासाठी बाजाची पेटी आणली गेली. घरात ग्रामोफोन होताच. या संगीताच्या गोडीनं भटांनी शाळेच्या बँडपथकात बासरी वाजवायला सुरुवात केली.
संगीताचे शिक्षण घेतले
सुरेश भटांची संगीतातली आवड पाहून त्यांचे घरातच संगीत शिक्षण सुरू झालं. त्यांना शिकवण्यासाठी प्रल्हादबुवा घरी येत. सुरेश भट अनेकदा आजारी असत. त्यावेळी ते तासनतास अंथरुणावर बासरी वाजवत पडत. ते उत्तम गात. त्यांच्या त्या काळात अमरावतीत एक गाण्याचा कार्यक्रमही झालेला. पुढे ते तबला शिकले. पोलिओनं पाय अधू झाल्यानं त्यांनी शरीर बळकट करण्यासाठी व्यायाम, खेळ सुरू केला. त्याचा चांगला परिणाम त्यांच्या तब्येतीवर झाला.
नेमबाजीत होते पारंगत
सुरेश भट नेमबाजीमध्ये पारंगत होते. त्यांची ही ओढ पाहून वडिलांनी त्यांना अमेरिकन स्लिंग शॉट बंदूक आणली. भालाफेक, तलवारबाजीमध्येही त्यांना रुची होती. तलवारीने एका घावात दोन तुकडे करण्यात सुरेश भटांची ख्याती होती. त्यांचं सारं शिक्षण अमरावतीत झालं. बीएच्या शेवटच्या वर्गात ते दोन वेळा नापास झाले. अन् अखेर 1955 मध्ये ते उत्तीर्ण झाले आणि शिक्षकी सुरू केली.
कवितेची वही फुटपाथवर
सुरेश भटांना कविता लेखनाची आवड होती. त्यांनी एकीकडे शिक्षकी पेशाबरोबर आपले लेखन सुरू ठेवले. त्यांच्या कवितेची एक वही हृदयनाथ मंगेशकरांना फुटपाथवर पडलेली मिळाली. त्यांनी त्यांच्या कविता वाचून काढल्या. ही वही सुरेश भटांची असल्याचं त्यांना समजलं. त्यांनी सुरेश भटांनाही शोधलं. त्यांच्या कवितांना चाली लावल्या. हृदयनाथ मंगेशकर, लता मंगेशकर, आशा भोसले, सुरेश वाडकर अशा अनेकांनी त्यांच्या कविता गायिल्या. त्या इतक्या लोकप्रिय झाल्या की, नकळतपणे सामान्यांच्या ओठी आल्या. सुरेश भट म्हणत कविता आरशाचं काम करते. ती स्वच्छ व निकोप चेहरे दाखवते आणि लबाड व घाणेरडे चेहरेही दाखवते. केवळ नक्षीदार शब्दांमुळं कवितेत यश मिळत नसतं. सुबक, गोंडस व नक्षीदार शब्दांमुळे कविता सुंदर होत नसते आणि शब्दांचा थयथयाट घातला म्हणून कविता शक्तिशाली बनत नसते. हेच त्यांच्या कवितेत झिरपलेलं दिसतं.
सूर्य केव्हाच अंधारला यार हो या, नवा सूर्य आणू चला यार हो
हे नवे फक्त आले पहारेकरी कैदखाना नवा कोठला यार हो
ते सुखासीन संताप गेले कुठे हाय, जो तो मुका बैसला यार हो
चालण्याची नको एवढी कौतुके थांबणेही अघोरी कला यार हो
जे न बोलायचे तेच मी बोलतो मीच माणूस नाही भला यार हो
सोडली मी जरी स्वप्नभूमी तरी जीवनाची टळेना बला यार हो
हासण्याची मिळाली अनुज्ञा कधी? हुंदकाही नसे आपला यार हो
ओळखीचा निघे रोज मारेकरी ओळखीचाच धोका मला यार हो
लोक रस्त्यावरी यावया लागले दूर नाही अता फैसला यार हो
आज घालू नका हार माझ्या गळा (मी कुणाचा गळा कापला यार हो)
सुरेश भटांचे काव्यसंग्रह…
– सप्तरंग (2002)
– झंझावात (1994)
– एल्गार (1983)
– रंग माझा वेगळा (1974)
– रूपगंधा (1961)
– रसवंतीचा मुजरा
– काफला
– सुरेश भट – निवडक कविता
– हिंडणारा सूर्य (गद्य)
इतर बातम्याः