आई स्कूटीवरून चिमुकलीला घेऊन चालली होती, अचानक ब्रेक दाबावा लागला आणि घडली दुर्दैवी घटना
नाशिकच्या विविध भागात कुत्र्यांची संख्या वाढत चालली आहे. त्यात रस्त्यावर अनेक कुत्रे फिरत असल्याने अपघात होण्याची संख्याही वाढत चालली आहे.
नाशिक : नाशिकच्या रस्त्यावरील एका अपघातानंतर मोठ्या प्रमाणात हळहळ व्यक्त केली जात आहे. त्यात दोन वर्षाच्या चिमूकलीचा दुर्दैवी मृत्यू झाल्याने पंचक्रोशीत खळबळ उडाली आहे. दिव्यांश्री घुमरे असे बलिकेचे नाव आहे. कोणार्कनगर येथे राहणाऱ्या दीपाली घुमरे या आपल्या दोन वर्षीय दिव्यांश्रीला दुचाकी वरुन घेऊन चालल्या होत्या. नांदूर नाका ते जत्रा हॉटेल असा प्रवास करीत असतांना अचानक दुचाकीला कुत्रा आडवा आला. त्यामुळे दुचाकी चालवणाऱ्या दीपाली यांना अचानक ब्रेक दाबावा लागला. पण वाहन न थांबता दुचाकी जोरात पडली. त्यात मायलेकी दीपाली आणि दिव्यांश्री या दोघींनाही जबर मार लागला. त्यात दिव्यांश्री हीच्या डोक्याला जबर मार लागला होता. दीपाली यांनी तात्काळ आपल्या भावाला कॉल करून बोलावले होते. जवळच असलेल्या दवाखान्यात त्यांनी दोघांना ये-जा करणाऱ्या नागरिकांच्या मदतीने घेऊन गेले. मात्र, दोन वर्षीय बालिका बेशुद्ध अवस्थेत गेली होती. उपचारादरम्यान दोन वर्षीय बलिकेचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे.
नाशिकच्या विविध भागात कुत्र्यांची संख्या वाढत चालली आहे. त्यात रस्त्यावर अनेक कुत्रे फिरत असल्याने अपघात होण्याची संख्याही वाढत चालली आहे.
सातपुर परिसरात पंधरवाड्यात अंगणात खेळत असलेल्या मुलीला कुत्र्याने फरफटत नेल्याची घटना घडली होती, याशिवाय रस्त्याने जाणाऱ्या दुचाकीवर भुंकणे यामुळे देखील अपघात होत आहे.
नाशिक महानगर पालिकेच्या वतिने ठिकठिकाणी कुत्र्यांचा बंदोबस्त करावा अशी मागणी होत आहे, अशातच वाहनांच्या मध्येच कुत्रे आडवे आल्याने दोन वर्षीय बलिकेचा निष्पाप बळी गेला आहे.
याबाबत आडगाव पोलीस ठाण्यात अपघाती मृत्यूची नोंद करण्यात आली असून याबाबत अधिकचा तपास आडगाव पोलीस ठाण्याचे पोलीस करीत आहे.