नाशिककरांसाठी आनंदाची बातमी, शहरात लवकरच मेट्रो धावणार, नितीन गडकरी यांचा शब्द
नाशिककरांसाठी आनंदाची बातमी, शहरात लवकरच मेट्रो धावणार...
नाशिक : केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी (Nitin Gadkari) यांनी नाशिककरांसाठी महत्वाच्या प्रकस्लापची घोषणा केली आहे. नाशिकमध्ये लवकरच मेट्रो प्रकल्प सुरू करण्याची घोषणा त्यांनी केलीय. ही दोन टप्प्यात मेट्रो (Nashik Metro)होईल, असंही त्यांनी सांगितलं आहे. यासाठी 1600 कोटी रुपयांच्या खर्चाला मंजुरी दिली असल्याचंही त्यांनी सांगितलं आहे.
नाशिक मेट्रोमध्ये चार लेन डबल डेकरच्या असतील. त्यामुळे नाशिकरोड ते द्वारकाचं ट्रॅफिक कमी होईल, असं गडकरी म्हणालेत.
चांगल्या रस्त्यामुळे विकासाला गती मिळेल. नाशिक जिल्हा एक्सपोर्ट इम्पोर्टमध्ये राज्यात नंबर एकचा जिल्हा बनेल. भुजबळ साहेबांनी त्याचवेळी नाशिक-पुणे रस्ता सहा लेन केला असता तर अशी वेळ आली नसती. भुजबळ साहेबांनी रस्ता बांधला त्याचवेळी प्रॉब्लेम होता. अर्थात मी त्यांना दोष देत नाही, मला राजकारण करायचंही नाही, असं गडकरींनी यावेळी सांगितलं.
मी महाराष्ट्रात मंत्री असताना मुंबई-नाशिक हायवे बांधण्याचा निर्णय घेतला होता. मुंबई ते नाशिक संपूर्ण रस्त्याचे सिक्स लेन काँक्रीटीकरण होईल. वडपे हे महत्त्वाचे जंक्शन होईल. मुंबई ते दिल्ली एक लाख कोटी रुपयांचा हायवे बांधून पूर्ण झालेला आहे, सात ते आठ तासांत दिल्लीला जाता येईल, अशी माहितीही गडकरींनी दिलीय.
सुरत हायवेमुळे मोठी क्रांती होईल. 80 हजार कोटी रुपये प्रकल्पाची किंमत आहे. 10 हजार कोटी रुपयांचे काम नाशिक जिल्ह्यात होईल. दहा तासांत चेन्नईमध्ये पोहचू शकता, असंही गडकरी यांनी यावेळी सांगितलं.
महाराष्ट्रातून 422 किलोमीटर हायवेचा मार्ग होईल. 182 किलोमीटर नाशिक जिल्ह्यातून मार्ग जाईल. 4200 हेक्टर जमिनीचे भूसंपादन होईल. यानिमित्ताने नाशिक जिल्ह्यातील शेतकऱ्यांना भरपूर पैसे मिळतील. ग्रामीण भागात रोजगार निर्मिती होईल. पुणे आणि मुंबई येथील ट्रॅफिक कमी होईल. उत्तर भारतातील लोकं थेट नाशिकमधून दक्षिणेत जाऊ शकतात, असंही गडकरी म्हणालेत.