Unseasonal Rain : काल इथे शेती होती… कांदा गेला, डाळींब गेले, द्राक्षाच्या बागाही गेल्या; नाशिकच्या शेतकऱ्यांच्या डोळ्यात फक्त पाणी
नाशिकमध्ये झालेल्या अवकाळी पावसामुळे आणि गारपीटीमुळे शेतकऱ्यांचं प्रचंड नुकसान झालं आहे. जगावं कसं? असा प्रश्न या शेतकऱ्यांना पडला आहे. होतं नव्हतं सर्वच वाहून गेल्याने हे शेतकरी आता फक्त सरकारी मदतीची आस लावून आहेत.
नाशिक : राज्यात गेल्या काही दिवसांपासून अवकाळी पाऊस आणि गारपीटीने थैमान घातलं आहे. त्यामुळे राज्यातील विविध भागात शेतीपिकांचं प्रचंड नुकसान झालं आहे. नाशिक जिल्ह्यात तर गेल्या चार दिवसांपासून सुरू असलेल्या अवकाळी पावसामुळे शेती अक्षरश: पाण्याखाली गेली आहे. वादळी वाऱ्यासह अवकाळी पाऊस व गारपीटीने नाशिक जिल्ह्यातील सटाणा, मालेगाव, नांदगाव, निफाड, दिंडोरी आदी 11 तालुक्यातील गावात अक्षरशः थैमान घातलेले आहे. यामध्ये कांद्याचे सर्वाधिक तर डाळिंब, द्राक्षबागाचं नुकसान झालं आहेच इतर शेतींपिके जमीनदोस्त झाली आहेत. या झालेल्या नुकसानीमुळे नाशिक जिल्ह्यातील शेतकरी सध्या मेटाकुटीस आला आहे.
गेली तीन महिने शेतात राब राब मेहनत करून रात्र – पहाट न बघता कांद्याला पाणी भरलं… एकरी चाळीस ते पन्नास हजार रुपये खर्च करून पोटच्या लेकराप्रमाने कांदा पीक आणि इतर पिके सांभाळली… पीक हाताशी आलं अन् सारं काही निसर्गाने हिरावून नेलं… अवकाळीने होत्याच नव्हतं केलं… शेतातील उभी पिके आणि काढणीला आलेला कांदा तसेच शेतात काढून ठेवलेला कांदा सडू लागला आहे… तोंडाशी आलेला घास निसर्ग हिरावून घेत असल्याने शेतकरी वर्ग व्यथित झाला आहे.
मायबाप सरकार…
अवकाळी पाऊस आणि गारपीट यामुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांच्या बांधावर मुख्यमंत्र्यांसह आमदार, खासदार, मंत्री राजकीय नेत्यांनी शेतकऱ्याला आर्थिक दिलासा देण्याचा प्रयत्न केला. मात्र आभाळचं फाटलेले असतांना ठिगळ कुठे कुठे लावायचा? असा प्रश्न शेतकऱ्यांसमोर असल्याने मेटाकुटीला आलेल्या शेतकऱ्याला अश्रू अनावर होत आहे . मायबाप सरकार, आम्ही शेतकऱ्यांनी आता काय करावे? अशी आर्त साद नाशिक जिल्ह्यातील गारपीट आणि अवकाळी पावसामुळे नुकसानग्रस्त झालेले शेतकरी सोपान गायकवाड आणि ज्ञानेश्वर गायकवाड करत आहेत. ही साद घालताना या दोघांच्या डोळ्यात अश्रू दाटले होते.
सरसकट अनुदान द्या
एक तर कांद्याला भाव नाही म्हणून शासनाने सानुग्रह अनुदान 350 रुपये जाहीर केले, त्यातही पिकपेऱ्यासह इतरही अटी – शर्ती घालून दिल्याने अनेक शेतकरी या लाभापासून वंचित राहणार आहे. त्यातच अवकाळीने दणका दिल्याने बळीराजा पुरता कोलमडला आहे. सानुग्रह अनुदान मिळण्यासाठी ‘ ई पीक पेरा ‘ अट रद्द करावी. ज्यांनी बाजार समितीत कांदा विकला त्यांना सरसकट अनुदान द्यावे, अशी मागणी कांदा उत्पादक शेतकरी संघटनेचे राज्य अध्यक्ष भारत दिघोळे यांनी केली आहे.
सर्व योजनांवर पाणी
अस्मानी आणि सुलतानी संकटाने नेहमीच भरडल्या जाणाऱ्या शेतकऱ्याला यंदा कांदा पिकांमुळे येणाऱ्या पैशाची आस लागलेली होती. मागील नुकसानीची भर यातून निघणार होती. पुढील वर्षाचे शेतीची आर्थिक नियोजन देखील बसणार होते. मात्र निसर्गाच्या लहरीपणाचा फटका यंदाही बसल्याने शेतकऱ्यांनी जगावं कसं? असा प्रश्न शेतकऱ्यांपुढे आता पडला आहे. मायबाप सरकार यातून ठोस अशी काहीतरी मदत या आशेने शेतकरी आता सरकारच्या मदतीकडे डोळे लावून बसला आहे.