होय, मालेगाव निवडणुकीसाठी बाहेरून पैसा आला, माजी आमदाराच्या दाव्याने एकच खळबळ, Vote Jihad साठीच आला पैसा?
Malegaon Assembly Election 2024 Money : मालेगाव विधानसभा निवडणुकीत वोट जिहाद झाल्याचा आरोप भाजप नेते किरीट सोमय्या यांनी केला होता. त्यातच आता माजी आमदाराने सुद्धा या निवडणुकीसाठी बाहेरून पैसा आल्याचा खळबळजनक दावा केला आहे.

लोकसभा आणि विधानसभा निवडणूक 2024 मध्ये वोट जिहाद झाल्याचा आरोप भाजप नेते किरीट सोमय्या यांनी केला होता. 125 कोटींचे रॅकेट झाल्याचा आरोप त्यांनी केला होता. त्यानंतर एकच खळबळ उडाली होती. आता माजी आमदार आसिफ शेख यांनी सुद्धा निवडणुकीसाठी बाहेरून पैसा आल्याचा नवीन बॉम्ब टाकला आहे. त्यामुळे मालेगावमधील निवडणुकीत ऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल मुस्लिमीन(AIMIM) या पक्षाच्या विजयावरच प्रश्नचिन्ह उभं ठाकलं आहे. काय आहे नवीन आरोप?
आमच्याकडे भक्कम पुरावे
मालेगावमधील दोन्ही निवडणुकीत बाहेरून मोठ्या प्रमाणात पैसा आला, असा आरोप माजी आमदार आसिफ शेख यांनी केला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांना यासर्व गोष्टींची माहिती देणार असल्याचे शेख म्हणाले. तर राष्ट्रीय तपास यंत्रणांसमोर याविषयीचे पुरावे दाखल करण्याची तयारी सुद्धा त्यांनी दर्शवली. आपल्याकडे या सर्व आरोपांविषयी भक्कम पुरावे असल्याचा दावा शेख यांनी केला. एमआयएमचे आमदार मुफ्ती इस्माईल यांनी अर्थसंकल्पीय अधिवेशनात वोट जिहादचा उल्लेख करत निवडणुकीत बाहेरून पैसा आल्याच्या आरोपावर कानावर हात ठेवले आहेत. आपल्याला एकही रुपया मिळाला नसल्याचे ते म्हणाले.




तर सरकारने या सर्व प्रकरणात ईडी, एटीएस, लाचलुचपत प्रतिबंधक विभाग आणि राष्ट्रीय तपास यंत्रणांकडून कसून चौकशी करावी अशी मागणी माजी आमदार शेख यांनी केला. हा पैसा कुणी आणि कुणासाठी वापरला हे तपासात निष्पन्न होईल, असे ते म्हणाले. त्यामुळे आता हा मुद्दा पुन्हा एकदा तापल्याचे दिसून आले आहे. तर शेख यांच्याकडे पुरावे असतील तर ते त्यांनी सादर करावे, असे आवाहनच एमआयएमचे आमदार मुफ्ती इस्माईल शेख यांनी केले आहे.
मालेगाव मर्चंट बँक खात्यात 125 कोटी
तर विधानसभा निवडणुकीच्या काळात मालेगाव मर्चंट बँकेतील खात्यांमध्ये अचानक 125 कोटी रुपये जमा झाल्याने एकच खळबळ उडाली होती. त्याविषयी किरीट सोमय्या यांनी सुद्धा आवाज उठवला होता. हा इतका पैसा कुठून आणि कसा आला असा सवाल त्यांनी केला होता. तर वोट जिहादसाठी हा पैसा वापरण्यात आल्याचा खळबजनक आरोप त्यावेळी सोमय्या यांनी केला होता.