नाशिकच्या कीर्तनकार झाल्या ‘पीएसआय’; अध्यात्म अन् विज्ञानाचा अनोखा सुवर्णमध्य…!
नाशिकच्या रूपाली केदार यांची सातवीपासूनच बालकीर्तनकार ही ओळख. अध्यात्माच्या शिक्षणासोबतच रूपालीने अभियांत्रिकीपर्यंतचे शिक्षण पूर्ण केले. त्यानंतर तिने 'एमपीएससी'ची तयारी केली. आज त्यातही यश मिळवले. त्यांचा हा अध्यात्म आणि विज्ञानाचा सुवर्णमध्य साधून सुरू असलेला प्रवास अफलातून असाच आहे.
नाशिकः लाखो विद्यार्थ्यांचे स्वप्न असलेल्या ‘एमपीएससी’ (MPSC) परीक्षेत नाशिकच्या (Nashik) कीर्तनकार लेकीने बाजी मारली आहे. रूपाली शिवाजी केदार असे या यशस्वी विद्यार्थिनीचे नाव असून, तिचे जिल्ह्यात कौतुक होत आहे. रूपाली सिन्नर तालुक्यातल्या दोडीची. कुटुंब वारकरी. तिचे चुलते मनोहर केदार हे नोकरीसाठी आळंदीला होते. त्यामुळे आई-वडिलांच्या इच्छेनुसार रूपालीने चौथीपासून आळंदीत अध्यात्म शिक्षणासोबत (Education) शाळा सुरू ठेवली. पुढे सुप्रसिद्ध कीर्तनकार निवृत्ती महाराज इंदोरीकर यांच्याकडे ओझरला काही काळ अध्यात्माचे धडे गिरवले. त्यानंतर राजाराम आव्हाड महाराजांचे मार्गदर्शन लाभले. या जोरावर रूपालीने इयत्त्या सातवीपासूनच बालकीर्तनकार ही ओळख निर्माण केली. अध्यात्माच्या शिक्षणासोबतच रूपालीने अभियांत्रिकीपर्यंतचे शिक्षण पूर्ण केले. त्यानंतर तिने ‘एमपीएससी’ची तयारी केली. आज त्यातही तिने यश मिळवले असून, तिची पोलीस उपनिरीक्षकपदी निवड झाली आहे.
अपयश आले पण…
कुठलेही यश सहजासहजी मिळत नसते. तसेच रूपालीचे झाले. तिने 2018 मध्ये ‘एमपीएससी’ची पहिली पूर्वपरीक्षा दिली. या परीक्षेत ती नापास झाली. मात्र, ती खचून गेली नाही. तिने आपले प्रयत्न सुरूच ठेवले. रूपालीचे काका संतोष केदार हे मुंबई पोलिसांमध्ये आहेत. तिने त्यांचे मार्गदर्शन घेतले. खासगी कोचिंग क्लास लावला. दुसरीकडे कीर्तन सुरू होते. अभ्यासही सुरू होता.
लग्न झाले अन्…
‘एमपीएससी’ची तयारी सुरू असतानाच रूपालीचे लग्न झाले. 2017 मध्ये नितीन सानप यांच्याशी तिचा विवाह झाला. मात्र, एकीकडे घर, दुसरीकडे कीर्तन आणि अभ्यास असा सुवर्णमध्य तिने साधला. खरे तर ही तारेवरची कसरत होती. यात महत्त्वाचे म्हणजे तिचे पती नितीन यांनीही तिला पूर्ण पाठिंबा दिला. या जोरावरच तिने 2019 मध्ये झालेल्या पूर्व आणि नंतर मुख्य परीक्षेत बाजी मारली.
कीर्तनाचा असाही उपयोग…
रूपालीच्या मुलाखतीमध्ये कीर्तनाचा मोठा उपयोग झाला. तिच्या रसाळ वाणीने असंख्य भक्तांना वेड लावलेच आहे. मात्र, हाच सभाधीटपणा तिला मुलाखतीमध्ये उपयोगी आला. तिने न भिता मुलाखत दिली आणि या बळावरच तिची ‘पीएसआय’ म्हणून निवड झाली. तिच्या या यशाचे तिचे शेतकरी आई-वडील आणि मित्र परिवाराला अपार कौतुक आहे.
इतर बातम्याः
नाशिक – दिंडोरी सिटी बस सुरू; गामीण भागात वाढवला विस्तार, मार्ग काय राहणार?
नाशिककरांना दिलासा; 4 वर्षांपूर्वी केलेली अव्वाच्या सव्वा करवाढ निवडणुकीच्या तोंडावर मागे!