एमआयएम, बीआरएस आणि भाजपा मध्ये नाटू नाटूचा खेळ, माजी मुख्यमंत्री यांची टीका
मराठा ओबीसी वाद कोण लावतंय हे लोकांना माहित आहे. पण, जातीनिहाय जणगणना करुन बिहारप्रमाणे आरक्षणाचा प्रश्न सोडवा. इतर राज्यात एमआयएमचे अनेक उमेदवार मात्र तेलंगणात फक्त आठ उमेदवार , एमआयएम , बीआरएस आणि भाजपात नाटू नाटूचा खेळ सुरू आहे.
नांदेड | 21 नोव्हेंबर 2023 : मराठवाड्याला पाणी सोडण्याबाबतच्या उच्च न्यायालयाच्या निर्णयाला आज सर्वोच्च न्यायालयाने कोणतीही स्थगिती दिली नाही. उच्च न्यायालयाने याबाबत निर्णय दिला होता. तरीही काही लोकांनी न्यायालयाचा अवमान केला. हा विषय सर्वोच्च न्यायालयात नेला. परंतु, सर्वोच्च न्यायालयानेही उच्च न्यायालयाचा निर्णय कायम ठेवला. त्यामुळे राज्य सरकारने आता वेळ न घालवता मराठवाड्याच्या हक्काचं पाणी सोडावे अशी मागणी कॉंग्रेस नेते आणि माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी केलीय.
सरकारने याबाबत जर विलंब केला तर तो मराठवाड्यावर अन्याय असेल असे अशोक चव्हाण म्हणाले. राज्यात मराठा आणि ओबीसी यांच्यामध्ये कोण वाद लावतंय हे लोकांना माहित आहे.. त्यामुळे राज्य सरकारने जातीनिहाय जणगणना करावी. बिहारप्रमाणे आरक्षणाचा प्रश्न सोडवावा असेही त्यांनी सांगितले.
जाती निहाय जणगणना ही काँग्रेसची अधिकृत भूमिका आहे. याच माध्यमातून बिहार राज्यात आरक्षण 65 टक्क्यांच्या पुढे नेले. त्यानुसार राज्य सरकारने विचार करावा. काही कायदेशीर मुद्दे सर्वोच्च न्यायालयात अडचणीत असले तरी संसदेत कायदा करण्यासाठी केंद्राने पुढाकार घ्यावा. यासाठी राज्य सरकारने प्रयत्न करण्याची गरज आहे असे अशोक चव्हाण म्हणाले.
एमआयएमची भूमिका अनेक ठिकाणी भाजपाला मदत करणारी आहे असा आरोप त्यांनी केला. महाराष्ट्रासह अनेक राज्यात एमआयएमकडून अनेक ठिकाणी उमेदवार उभे केले जातात. पण, स्वतःचे राज्य असेलल्या तेलंगणा विधानसभा निवडणुकीत एमआयएमने फक्त आठ ठिकाणीच उमेदवार का उभे केले असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला.
एमआयएमला तेलंगणामध्ये भाजपाला मदत करायची की केसीआरला? एमआयएमची भूमिका तेलंगणात वेगळी का आहे, असे सवाल त्यांनी उपस्थित केले. अनेक राज्यात अनेक ठिकाणी उमेदवार देऊन भाजपाला अप्रत्यक्षपणे मदत करायची हा एमआयएमचा प्रयत्न आहे. त्यामुळेच सध्या तेलंगणात एमआयएम, बीआरएस आणि भाजपामध्ये नाटू नाटूचा खेळ सुरू असल्याची टीका अशोक चव्हाण यांनी केली.