नवी मुंबई | 7 सप्टेंबर 2023 : राज्यातील रायगडमधील एका शाळेत सेमिस्टरदरम्यान एक अतिशय दु:खद घटना घडल्याचे समोर आले आहे. शाळेच्या मैदानात भालाफेकीची प्रॅक्टिस (javelin throw practice) सुरू असताना, एका विद्यार्थ्याने फेकलेला भाला लागून डोक्याला जखम झाल्याने अवघ्या १५ वर्षांच्या विद्यार्थ्याचा मृत्यू झाला आहे. माणगाव तालुक्यातील पुरार येथील आयएनटी इंग्लिश स्कूल ( School) येथे बुधवारी दुपारी ही दुर्घटना घडली.
हुजेफा डावरे असे मृत विद्यार्थ्याचे नाव असून तो दहावीचा विद्यार्थी होता. तो बुटाची लेस बांधत असताना भाला त्याच्या डोक्याला लागून ही दुर्घटना घडल्याचे पोलिसांनी सांगितले.
स्पर्धेसाठी भालाफेकीचे प्रशिक्षण घेत होते विद्यार्थी
रायगड पोलिसांनी दिलेल्या माहितनुसार, आयएनटी इंग्लिश स्कूलच्या शाळेच्या मैदानावर सराव सुरू असताना ही घटना घडली. डावरे हा इतर विद्यार्थ्यांसाह तालुकास्तरीय स्पर्धेसाठी सराव करत होता. त्या प्रशिक्षणा दरम्यान दोन विद्यार्थी वेगवेगळ्या टोकांवरून भाला फेकत होते. त्यामधअये डावरे याचाही समावेश होता. भाला मागे फेकल्यानंतर डावरे हा त्याच्या बुटाची फीत बांधण्यासाठी वाकला असता, दुसऱ्या टोकावरून आलेला भाला त्याच्या डोक्यावर आदळला, असे पोलिसांनी सांगितले.
ही जीवघेणी घटना कशी घडली हे शोधण्यासाठी पोलिसांनी शाळेच्या मैदानातील सीसीटीव्ही फुटेज गोळा केले आहे, असे रायगडचे अतिरिक्त पोलीस अधीक्षक अतुल झेंडे यांनी सांगितले. मृत विद्यार्थी डावरे हा सराव करत असताना भाला आदळल्याने तो जागीच कोसळल्याचे प्राथमिक तपासणीतून समोर आले आहे. त्याला उपचारांसाठी तातडीने रुग्णालयात नेण्यात आले, मात्र तेथे डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले.