नवी मुंबईत तीन मजली इमारत कोसळली; दोघांचा मृत्यू, तर काही जण दबल्याची भीती
Navi Mumbai Building Collapse : महाराष्ट्रातील नवी मुंबईत तीन मजली इमारत कोसळली. इंदिरा निवास असे या इमारतीचे नाव आहे. या घटनेत दोन लोकांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर येत आहे. ढिगाऱ्याखाली काही लोक दबल्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. बचाव कार्याला सुरुवात झाली आहे.
मुसळधार पावसामुळे धोक्कादायक इमारतीतील रहिवाशांचे जीव धोक्यात आले आहेत. नवी मुंबईत एक तीन मजली इमारत कोसळली आहे. इंदिरा निवास असे या इमारतीचे नाव आहे. वेळवरच बचाव पथक दाखल झाले आहे. या घटनेत दोघांचा मृत्यू झाला तर इतर काही जण ढिगाऱ्याखाली दबल्याची माहिती समोर येत आहे. बचाव पथकाने अडकलेल्या लोकांना बाहेर काढण्याचे काम सुरु केले आहे.
धोकादायक इमारतीचा प्रश्न ऐरणीवर
पावसाळाच्या तोंडावर अनेक धोकादायक इमारतीमधील नागरिकांना सुरक्षित स्थळी हलविण्यात येते अथवा पालिका पथक त्यांना नोटीस तरी देते. इंदिरा निवास इमारतीप्रकरणात पालिकेने काय कार्यवाही केले हे समोर येईलच. पण ही इमारत कमकुवत असल्याचे समोर येत आहे. इंदिरा निवासमध्ये एकूण 13 सदनिका होत्या. त्यात 26 कुटुंब राहत असल्याची माहिती समोर येत आहे.
सध्या मुंबईत पावसाने कहर केला आहे. त्याचा फटका या इमारतीला बसण्याची शक्यता आहे. अजून याविषयीची अधिकृत माहिती समोर आली नाही. इमारत ढासळण्याची माहिती मिळताच NDRF, मुंबई पोलीस, अग्निशमन दल आणि महापालिकेचे अधिकारी घटनास्थळी पोहचले.
आयुक्तांनी काय दिली माहिती ?
ही इमारत का आणि कोणत्या कारणांमुळे कोसळली याचा तपास करण्यात येणार आहे. अँम्बुलन्सची व्यवस्था करण्यात आली आहे. नवी मुंबई महापालिकेचे आयुक्त कैलास शिंदे यांनी दिलेल्या माहितीनुसार, सकाळी जवळपास 5:30 वाजता इमारत जमीनदोस्त झाली. ही ग्राऊंडसह तीन मजली इमारत आहे. ती बेलापूर वॉर्डातंर्गत येते. या इमारतीत एकूण 13 सदनिका, फ्लॅट आहेत.
तर नवी मुंबई अग्निशमन दलाचे अधिकारी पुरुषोत्तम जाधव यांनी घटनाक्रम सांगितला. त्यानुसार, पहाटे 4:50 वाजता विभागाला इमारत कोसळल्याची माहिती मिळाली. बचाव कार्य प्रगती पथावर असल्याची माहिती त्यांनी माध्यमांना दिली.
प्रत्यक्षदर्शींनी सांगितली हकीकत
प्रत्यक्षदर्शींनी या घटनेची हकीकत सांगितली. त्यानुसार, सकाळी उठलोच होतो तर काहीतरी कोसळण्याचा जोरात आवाज झाला. बाहेर येऊन पाहिले तर शेजारची इमारत ही पत्त्याच्या बंगल्यासारखी कोसळली. रात्री तर ही इमारत डोळ्यासमोर होती. पण डोळ्यादेखत तिचा ढिगारा झाला. आम्ही लागलीच या घटनेची माहिती संबंधित विभाग आणि अधिकाऱ्यांना दिला. आता घटनास्थळी बचाव कार्य सुरु आहे.