Mumbai APMC : शेतकरी, ग्राहक कंगाल, व्यापारी मालामाल, एकाच मार्केटमध्ये भाज्यांच्या दरात मोठी तफावत कशी?
ग्राहक शेतीमाल खरेदी करतो त्यावेळी बऱ्याचदा जादा दरांबाबत त्याची नेहमी तक्रार असते. प्रत्यक्षात बहुतांशवेळा शेतकरी बाजार समितीमध्ये शेतमाल विकतो त्यावेळी त्याला पडक्या दरात व्यापाऱ्यांना विक्री करावा लागतो.
नवी मुंबई : केंद्र सरकारने लागू केलेल्या तीन कृषी कायद्यांना होणारा विरोध बघून या कायद्यांना सर्वोच्च न्यायालयातून स्थगिती देण्यात आली आहे. केंद्र सरकारच्या या कायद्यांना विरोध करणारं महाविकास आघाडी सरकार देखील कृषी कायदा आणणार आहे. त्यावर हरकती आणि सूचना मागवण्यात आल्या आहेत. मात्र, हे येणारे कायदे शेतकरी आणि बाजार समिती यांच्या हिताचे असणार का? असा प्रश्न निर्माण झाला आहे.
यासाठी आमदार शशिकांत शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली मुंबई एपीएमसी सभागृहात सर्व बाजार घटकांची बैठक आयोजित करण्यात आली होती. त्यातून समिती नेमण्यात आली आहे. ते बाजार घटकांचे प्रश्न आणि अडचणी सरकारपुढे ठेवणार आहेत. दुसरीकडे एपीएमसी मार्केटमधील वास्तव परिस्थितीची माहिती आम्ही तुम्हाला आज देणार आहोत. कारण मार्केटमध्ये शेतकऱ्यांकडून एवघ्या कवडीमोल किंमतीत भाजीपाला खरेदी केला जातोय. तर दुसरीकडे अव्वाच्या सव्वा दरात सर्वसामान्यांना हा शेतमाल विकला जातोय.
नेमकं प्रकरण काय?
नवी मुंबईच्या कृषी उत्पन्न बाजार समितीत शेतकऱ्याला हमीभाव मिळत नाहीय. शेतकऱ्याने पाठवलेल्या शेतमालाची लाखो रुपये थकबाकी वर्षानुवर्षे व्यापारी ठेवत आहेत. पैशांसाठी शेतकरी फक्त हेलपाटे घालताना दिसत आहेत. बाजार समितीला योग्य सेस सुद्धा मिळत नाही. राज्य सरकार तर्फे येऊ घातलेल्या कायद्यांबाबत बाजार समितीच्या घटकांनी समिती स्थापन करुन अभ्यास सुरु केला आहे.
शहरातील ग्राहक शेतीमाल खरेदी करतो त्यावेळी बऱ्याचदा जादा दरांबाबत त्याची नेहमी तक्रार असते. प्रत्यक्षात बहुतांशवेळा शेतकरी बाजार समितीमध्ये शेतमाल विकतो त्यावेळी त्याला पडक्या दरात व्यापाऱ्यांना विक्री करावा लागतो. हाच शेतीमाल मध्यस्थ साखळीद्वारे शहरात ग्राहकांना विकला जातो. पण व्यापारी अव्वाच्या सव्वा नफा मिळवितात, असे शेतकरी ते ग्राहक दराच्या केलेल्या पाहणीतील निष्कर्षातून समोर आले आहे.
साखळी जाणून घ्या
मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीत विक्रीस आलेला माल शहर, उपनगराततील मॉल, गाळे आणि खुल्या ठिकाणी विक्री केला जातो. शेतकऱ्यांकडून अडत्यांकडे, अडत्यांकडून खरेदीदारांकडे आणि खरेदीदारांकडून मॉल, गाळे आणि किरकोळ विक्रीपर्यंतच्या साखळीतील नफेखोरी ग्राहकापर्यंत जाते तेव्हा शेतकऱ्याला अल्प मोबदला मिळालेला असताना ग्राहकाला तो शेतमाला अधिक दरानेही खरेदी करावा लागतो.
शेतकरी ते ग्राहक दरातील तफावत
मुंबई एपीएमसी भाजीपाला घाऊक बाजारात सध्या जवळपास 700 गाड्यांची आवक होत आहे. बाजार आवारात करण्यात आलेल्या खरेदी-विक्रीच्या सर्वेक्षणातून शेतकरी ते ग्राहक दरातील तफावत प्रकर्षाने समोर आली आहे. मुंबई कृषी उत्पन्न बाजार समिती ही आशिया खंडातील सर्वात मोठी बाजारपेठ आहे. या बाजारसमितीमध्ये घाऊक भाजीपाला मार्केट आहे. घाऊक बाजारात चार पाकळ्या आहेत.
एकाच मार्केटमध्ये दुप्पट दरात भाजीपाला विक्री
या मार्केटमध्ये जवळपास 80 टक्के व्यापाऱ्यांनी व्यापार न करता आपले गाळे भाड्याने दिले आहेत. एका गाळ्यामध्ये 4 ते 5 जण व्यापार करतात. सध्या घाऊक बाजार आवारात दोन विभाग झाले आहेत. डी विंगमध्ये पूर्णपणे किरकोळ दरात भाज्या विकल्या जात आहेत. डी पाकळीमध्ये भाजीपाल्याची 30 ते 70 रुपये प्रतिकिलो दराने विक्री होत आहे. तर इतर पाकळीमध्ये 15 ते 30 रुपये किलो भावाने भाजीपाला विकला जात आहे. अशाप्रकारे सध्या एकाच मार्केटमध्ये दुपट्ट दराने भाजीपाला विक्री केला जात आहे.
हाच भाजीपाला मुंबई आणि मुंबई उपनगरात गेल्यास चारपट अधिक दराने विक्री केला जात आहे. यावर नियंत्रण येणे गरजेचे आहे. त्यामुळे ग्राहक आणि शेतकरी या दोघानांही फायदा होईल. शिवाय हे व्यापारी आपल्या भाड्याच्या दुकानात स्वत:च्या नावावर लाखो रुपयांचा शेतमाल मागवतात आणि माल विक्री करुन पळ काढतात. त्यामुळे शेतकरी बाजारात येऊन व्यापाऱ्याला शोधत राहतो. मात्र, त्याची फसवणूक झाल्याचे त्याच्या लक्षात येते.
शेतकरी आणि ग्राहकांचं नुकसान
घाऊक बाजारात कमी दराने मालाची विक्री केली जाते. मात्र, त्याच ठिकाणी किरकोळ मार्केटमध्ये दुप्पट भावाने माल विकला जातो. एकीकडे कमी किंमतीला विकला जाणारा माल तर दुसरीकडे मात्र हाच माल दुप्पट किंमतीच्या भावाने विकला जातो. त्यामुळे APMC मार्केटमध्ये भाजीपाल्याचे एकच मार्केट असून जागेच्या भाड्याच्या किंमतींमुळे व्यापारी भाज्यांचे भाव वाढवत आहेत. त्यामुळे त्याचा परिणाम शेतकऱ्यांवर आणि ग्राहकांवर झालेला दिसून येत आहेत.
व्यापाऱ्यांची नेमकी भूमिका काय?
या बाबतीत बाजारात काही व्यापाऱ्यांना विचारपूस केली असता व्यापाऱ्यांनी सांगितले कि, बाजार समितीमध्ये काही अधिकाऱ्यांनी डी पाकळीमधील भाजीपाला किरकोळ भावात विकण्यासाठी सूट दिली आहे. शिवाय या व्यापाऱ्यांकडून बाजार समितीचा सेस भरणा होत नाही. त्यामुळे प्रतिदिन जवळपास सरासरी 600 गाड्यांची आवक होऊन देखील बाजार समितीकडे 20 टक्के सेस जमा होत आहे. त्यामुळे काही व्यापारी आणि बाजार समिती कर्मचारीच बाजार समिती संपण्याच्या मागे असल्याचे निदर्शनास येत आहे. यावर सरकार काय भूमिका घेणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
आजचे मुंबई बाजार समितीमधील घाऊक आणि घाऊक बाजार समितीमधीलच किरकोळ भावातील दर :
घाऊक बाजारातील भाज्यांचे दर (प्रतिकिलो) किरकोळ बाजारातील दर (प्रतिकिलो)
फ्लावर- २५ फ्लावर-५० टोमॉटो- १० टोमॉटो- २० कोबी- १० कोबी- २० वांगी- १५ वांगी- ३० कारले- २० कारले- ४० वाटाणा- ४० वाटाणा- ८० भेंडी- २० भेंडी- ४० पापडी ३० पापडी ६० घेवडा ३० घेवडा ६०
हेही वाचा :
मोठी बातमी: RBIकडून जुन्या नोटा आणि नाण्यांसंदर्भात अलर्ट जारी, तुम्हीही व्हा सावध
बीड जिल्ह्याचं नाव केलंss, लोकनेत्याच्या लेकीनंss, किशाबाईंच्या आवाजात पंकजा मुंडेंवर भन्नाट गाणं