माजी खासदार संजीव नाईक रावसाहेब दानवेंच्या भेटीला, रेल्वेपासून ते धरणापर्यंतच्या विविध विषयांवर चर्चा
माजी खासदार संजीव नाईक (Sanjeev Naik) यांनी आज (10 ऑगस्ट) केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे (Raosaheb Danve) यांची मुंबईत भेट घेतली. यावेळी त्यांनी विविध महत्त्वांच्या विषयांवर चर्चा केली.
नवी मुंबई : ठाणे-बेलापूर ट्रान्स हार्बर मार्गावरील मंजूर झालेल्या दिघा आणि खैरणे रेल्वेस्थानकांचे काम युद्धपातळीवर व्हावे आणि दिघा येथील ब्रिटिशकालीन धरणाची दुरवस्था या संदर्भातील प्रमुख मागण्यांसाठी माजी खासदार संजीव नाईक (Sanjeev Naik) यांनी आज (10 ऑगस्ट) केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे (Raosaheb Danve) यांची मुंबईत भेट घेतली. यावेळी त्यांनी आपल्या मागण्या संदर्भातील निवदेन रावसाहेब दानवे यांना दिलं.
संजीय नाईक यांच्या नेमक्या मागण्या काय?
रेल्वेच्या ट्रान्स हार्बर लाईनच्या रेल्वे स्थानकांवर आता हजारो प्रवाशांची गर्दी होते. त्यासाठी वाशी ते सीबीडी आणि वाशी ते ठाणे अशा जादा फेऱ्या वाढविण्यात याव्यात. वाशी ते ठाणे आणि सीबीडी ते वाशी या रेल्वेच्या ट्रान्स हार्बर मार्गावर रेल्वेच्या संरक्षक भिंतीची दुरावस्था झाली आहे. रेल्वेरुळ ओलांडताना अनेकदा लहान मोठे अपघात घडत असतात. त्यामुळे त्याची दुरुस्ती करणे, यासारख्या अनेक मागण्यांचे निवेदन संजीव नाईक यांनी केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब यांची भेट घेऊन दिले.
‘सकारात्मक चर्चा झाली’
या भेटीदरम्यान केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांच्याशी सकारात्मक चर्चा झाली. लवकरच दिघा आणि खैरणे रेल्वेस्थानकांच्या कामाला गती देण्यात येईल, असे आश्वासन दानवे यांच्याकडून देण्यात आल्याचे माजी खासदार संजीव नाईक यांनी सांगितले.
दिघा आणि खैरणे या दोन्ही स्थानकांची कामे कासवगतीने सुरु
ठाणे-बेलापूर ट्रान्स हार्बर रेल्वेमार्गावरील दिघा आणि खैरणे ही दोन नवीन रेल्वेस्थानके मंजूर झालेली आहेत. त्याचे काम डिसेंबर 2021 पर्यंत पूर्ण होणार असल्याचे सांगण्यात येते. मात्र, या स्थानकांची कामे कासवगतीने सुरु असल्याने ते युद्धपातळीवर सुरु करण्याची मागणी संजीव नाईक यांनी केली आहे.
रेल्वेच्या 150 वर्षांपूर्वीच्या धरणाची दुरावस्था
दिघा येथील रेल्वेचे 150 वर्षांपूर्वीचे ब्रिटिश राजवटीतील 15 एकर क्षेत्रफळाचे धरण आजही आहे. या धरणाच्या पाण्याचा सद्यस्थितीत वापर होत नसल्याने हे धरण पडीक झालं आहे. त्यामुळे या धरणाची दुरवस्था झाली आहे. हे धरण नवी मुंबई महापालिकेकडे हस्तांतरित केले तर अतिरिक्त पाण्याचा एक स्रोत महापालिकेकडे तयार होईल. या पाण्याचा वापरही करता येणार आहे, तसेच डागडुजी केल्यास एक पर्यटनस्थळ विकसित करता येईल. यासाठी 2018 पासून पाठपुरवा सुरु आहे. हे धरण दीर्घकालीन भाडेपट्ट्यावर हस्तांतरित करण्याची मागणी माजी खासदार संजीव नाईक यांनी केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांच्याकडे केली आहे.
हेही वाचा :
कामगारांना न्याय मिळवून देण्यासाठी राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी थेट उपायुक्तांची खुर्ची पळवली
गणेशोत्सवात खाजगी वाहनांनी जादा भाडे आकारल्यास पनवेल आरटीओ करणार कारवाई