खारघरमध्ये हज हाउस आणि हंगामी कार्यालय होणार, उभारणीसाठी खारघरमध्ये भूखंड प्रदान, सिडकोचा निर्णय
सिडकोतर्फे नवी मुंबईतील खारघर येथील सेक्टर-38 मधील भूखंड क्र. 1 अ भारतीय हज समितीला हज हाउस आणि हंगामी कार्यालयाच्या उभारणीसाठी देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
नवी मुंबई : सिडकोतर्फे नवी मुंबईतील खारघर येथील सेक्टर-38 मधील भूखंड क्र. 1 अ भारतीय हज समितीला हज हाउस आणि हंगामी कार्यालयाच्या उभारणीसाठी देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. प्रस्तावित नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळापासून नजीकच्या अंतरावर हा भूखंड असल्याने हज यात्रेला जाणाऱ्या यात्रेकरूंना याचा निश्चितच फायदा होणार आहे.
हज समिती काय आहे?
मुस्लीम धर्मियांसाठी महत्त्वाच्या असणाऱ्या हज यात्रेसाठी जगभरातील लक्षावधी मुस्लीम बांधव सौदी अरेबियातील मक्का आणि मदिना शहरांना भेट देण्यासाठी जातात. 1927 पासून भारतातील हज यात्रेकरूंसाठी या यात्रेची व्यवस्था करण्यासह इतर प्रश्नांची सोडवणूक करण्याचे काम भारतीय हज समिती करते. ही समिती ही भारतीय संसदेने केलेल्या अधिनियमांतर्गत स्थापन झालेली वैधानिक संस्था आहे.
भारतातील हज यात्रेकरूंसाठी आवश्यक ती व्यवस्था करण्यासह राज्यांतील/केंद्रशासित प्रदेशांतील हज समित्यांबरोबर समन्वय साधण्याचे अधिकार भारतीय हज समितीला आहेत. 2016 पासून हज यात्रेसंबंधीचे कामकाज भारत सरकारच्या अल्पसंख्याक मंत्रालयाकडे सोपविण्यात आले आहे. अल्पसंख्याक मंत्रालयाकडून भारतीय हज समितीच्या हज हाउस तसेच हंगामी कार्यालयाच्या उभारण्यासाठी नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाजवळील भूखंड देण्यात यावा याबाबतची विनंती करणारे पत्र सिडकोला प्राप्त झाले होते. त्या अनुषंगाने सिडकोने हा निर्णय घेतला.
नेमका निर्णय काय झाला?
सिडकोच्या निर्णयानुसार नवी मुंबईतील खारघर येथील सेक्टर-38 मधील 6 हजार चौ.मी. क्षेत्रफळाचा भूखंड क्र. 1 अ भारतीय हज समितीला भाडेपट्ट्याने 14 कोटी 21 लाख 94 हजार भाडेपट्टा अधिमूल्य आकारून देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
हेही वाचा :
लोकलमध्ये महिला प्रवाशांचे मोबाईल चोरणारी सराईत महिला चोर जेरबंद
मुंबई APMC धान्य मार्केट एक दिवसीय बंदमुळे डाळ व्यापाऱ्यांसह शेतकऱ्यांना करोडोंचे नुकसान
केंद्र शासनाच्या निर्णयाला विरोध, मुंबई APMC मार्केटमधील मसाला आणि धान्य बाजरात शुकशुकाट, शेतकऱ्यांचं मोठं नुकसान
व्हिडीओ पाहा :
CIDCO gives land of sector 38 for Haj Committee in Kharghar Navi Mumbai