मुंबई APMC मध्ये शेतमाल पाठवत असाल तर सावधान! शेतकऱ्यांच्या फसवणूक, अडवणुकीचे प्रकार समोर
मुंबई एपीएमसी भाजीपाला मार्केटमध्ये मागील दोन महिन्यांपूर्वी एक वृद्ध शेतकरी शेतमालाचे पैसे मिळण्यासाठी विनवणी करत होते. मात्र, अद्याप त्यांना त्यांचे पैसे मिळाले नसून अशाच आणखी घटना समोर येत आहेत.
नवी मुंबई : मुंबई एपीएमसी भाजीपाला मार्केटमध्ये मागील दोन महिन्यांपूर्वी एक वृद्ध शेतकरी शेतमालाचे पैसे मिळण्यासाठी विनवणी करत होते. मात्र, अद्याप त्यांना त्यांचे पैसे मिळाले नसून अशीच दुसरी एक घटना समोर आली आहे. व्यापाऱ्याकडे पैसे थकल्याने आणखी एक शेतकरी आत्महत्येच्या विचारात असल्याचे बोलले जात आहे. (Fraud with farmers in Mumbai APMC)
कर्नाटक येथील सय्यद मसूद नामक शेतकऱ्याने कैरी व्यापाऱ्याकडे पाठवलेल्या मालाचे 4 लाख 50 हजार रुपये थकबाकी असल्याचे सांगितले आहे. याबाबत मुंबई बाजार समितीला तक्रार अर्ज दिला आहे. शिवाजी विष्णू अभंग ए-183 या गाळ्यावर 2020 व 2021 पासून कैरी माल पाठवला होता. मागील आणि चालू वर्षाची एकूण थकबाकी जवळपास 5 लाख 50 हजार असल्याचे शेतकऱ्याने दिलेल्या हिशोबपत्रातून पाहायला मिळत आहे.
मात्र गेल्या अनेक दिवसांपासून येरझऱ्या मारुनसुद्धा शेतकऱ्याला पैसे न मिळाल्याने त्याने आत्महत्या करणार असल्याचे सांगितले आहे. पैसे बाकी राहिल्याने माझी जमीन विकली असून उर्वरित जमीन गहाण ठेवली आहे. तसेच संबंधित व्यापारी फेऱ्या मारायला लावत असून तारखेवर तारीख देत आहे. फोन केल्यावर फोन देखील स्वीकारत नाही, अशीही तक्रार शेतकऱ्याने केली आहे.
वृद्ध शेतकऱ्याच्या जीवनमरणाचा प्रश्न
तर दुसरीकडे गेल्या दोन वर्षात 10 वेळा नाशिकहून मुंबईवारी करून सुद्धा या वृद्धाला न्याय मिळत नसल्याचे समोर आले आहे. मुंबई एपीएमसी भाजीपाला मार्केटमधील व्यापाऱ्याने वृद्ध शेतकऱ्याची फसवणूक केल्याने या वृद्ध शेतकऱ्याच्या जीवनमरणाचा प्रश्न निर्माण झाला आहे.
सोमनाथ गणपत सानप हा 65 वर्षीय वृद्ध शेतकरी भाजीपाला व्यापाऱ्याकडे हेलपाटे घालून थकला आहे. शिवाय हा शेतकरी आपल्यापेक्षा वयाने कमी असलेल्या बाजार समिती सभापतींना हात जोडून न्याय मिळवून देण्याची विनवणी करत आहे. व्यापाऱ्याकडे स्वतःचा गाळा नसल्याने शेतकऱ्याला पैसे मिळण्यास अडचण येत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनो मुंबई एपीएमसी मार्केटमध्ये शेतमाल पाठवत असाल तर सावधान! कारण मुंबई बाजार समितीमध्ये अनेक फसवे व्यापारी आपले बस्तान मांडून बसल्याची माहिती समोर आली आहे.
दिवाळीपर्यंत पैसे देतो, असे लेखी आश्वासन
तुम्हाला येत आलेल्या शेतमालाच्या हिशोबपत्रावर पत्ता अचूक असला पाहिजे. शिवाय त्यात गाळा क्रमांक आणि व्यापाऱ्यांचे पूर्ण नाव असणे गरजेचे आहे. शेतकऱ्याने माल पाठ्वण्याआधी मार्केटमध्ये जाग्यावर येऊन व्यापाऱ्याबाबत माहिती घेणे आवश्यक आहे. व्यापाऱ्याला बोलावून थकीत रक्कमेबाबत माहिती घेतली असता व्यापाऱ्याने दिवाळीपर्यंत पैसे देतो असे लेखी दिले आहे. तसेच पैसे न दिल्यास बाजार समितीने पुढील कारवाई करावी, असे देखील मान्य केले असल्याचे उपसचिव मारुती पवितवार यांनी सांगितले.
व्यापाऱ्याचा शोध घेताना बाजार समिती हैराण
भाजीपाला मार्केटमध्ये एकूण ए, सी, डी आणि इ अशा चार पाकळ्या आहेत. यातील डी पाकळीमध्ये जवळपास सर्वच व्यापारी भाडेतत्वावर व्यापार करत आहेत. त्यामुळे या ठिकाणी असलेले गाळा मालक इतर पाकळीत जाऊन व्यापार करतात. त्या ठिकाणी गाळा मालक वेगळा आणि व्यापार करणारा वेगळा, अशावेळी शेतकऱ्यांना पैसे न देता पळ काढणाऱ्या व्यक्तीचा शोध घेणे कठीण जाते. त्या व्यापाऱ्याचा शोध घेणे बाजार समिती प्रशासनाला कठीण जात आहे. त्यामुळे बाजार समितीने गाळा मालकानेच गाळ्यावर व्यापार करणे बंधनकारक असेल, असे निर्देश जारी करावेत. तरच शेतकऱ्याला त्याचे पैसे मिळणे अथवा बाजार समितीला मिळवून देणे सोयीचे राहील. असे काही शेतकऱ्यांचे म्हणणे आहे.
इतर बातम्या
(Fraud with farmers in Mumbai APMC)