गर्दीत बाई दिसली की चार फूट लांब पळतो, बायकोला सोडून कुणालाही… जितेंद्र आव्हाड असं का म्हणाले?
संभाजी महाराजांच्या मुद्द्यावरून राष्ट्रवादीत दोन गट पडल्याचा इन्कारही त्यांनी केला. अजित पवार जे बोलायचे ते बोललेच. दोन गट नाही. आम्ही आमच्या भूमिकेवर ठाम आहोत.
नवी मुंबई: पूर्वी कुणाच्या अंगावर जायची भीती वाटायची नाही. आजकाल अंगावर जायलाही भीती वाटते. कारण कधी रात्री उचलून नेतील सांगता येत नाही. गुन्हा काय? तोही सांगता येत नाही. मी बघितलं ना माझ्या आयुष्यात 72 तासात दोन गुन्हे झाले. कधी काय होईल सांगता येत नाही. एका बाईला हाताने बाजूला केलं तर तिने माझ्यावर विनयभंगाचाच गुन्हा दाखल केला. गर्दीत बाई दिसली की मी चार फूट लांब दिसतो. मी आता शपथच खाल्लीय बायकोला सोडून कुणालाच स्पर्श करायचा नाही, असं विधान राष्ट्रवादीचे नेते आणि माजी मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी केलं.
नवी मुंबईत दोन वर्षानंतर आगरी कोळी महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी उपस्थितांना संबोधित करताना जितेंद्र आव्हाड बोलत होते. सरकार म्हणजे कहर आहे कहर. माझ्यावर आणखी एक गुन्हा दाखल केला. 1932चा कायदा काढून माझ्यावर गुन्हा टाकला. तो ठाण्यात लागूच होत नाही. पण लावला. बेल देताना जजने सांगितलं हे गुन्हेच होत नाही. लावलेच कसे? पण राज्यात हमारी मर्जी असं सुरू आहे, अशी टीका आव्हाड यांनी केली.
थोडे दिवस चालते हुकूमशाही. सर्व गोष्टीची तयारी ठेवली पाहिजे. लढत असताना कधी काय घडवून आणतील सांगता येत नाही. कारण लोकशाहीवर त्यांचा विश्वासच नाही. आम्ही सांगू तो कायदा अशा पद्धतीचा कायदा राबवला जात आहे.
ठाण्यातही टिपून टिपून मारत आहेत. अख्खं ठाणे माझ्या हातात असावं असं मुख्यमंत्र्यांना वाटतं. ज्या शरद पवारांनी एवढी वर्ष बारामतीवर राज्य केलं. ती बारामती त्यांची होऊ शकली नाही. थोडे दिवस चालतं. हे जास्त काळ टिकत नाही, असा सूचक इशाराही त्यांनी दिला.
तुम्ही वारंवार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर निशाणा साधत आहात. तुमच्या आणि शिंदे यांच्या मैत्रीत वितुष्ट आलंय का? असा सवाल त्यांना करण्यात आला. त्यावर, मैत्री कधी तुटते का? दोस्त दोस्त ना राहा, प्यार प्यार ना राहा… असं कधी होतं का? मी कुठे सीएमला टार्गेट केलं? तुम्हाला वाटतं निशाणा आहे. मी असा निशाणा वगैरे ठेवत नाही, असंही ते म्हणाले.
भाजप काय म्हणतंय यावर आव्हाड चालत नाही. मी 25 वर्ष इतिहासावर बोलतोय. त्यामुळे नवीन आलेल्यांच्या नादाला मी लागत नाही. मी ज्या दोन पत्रांचा उल्लेख केला किंवा शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक कुणी नाकारला?
संभाजी महाराजांवर विषप्रयोग कुणी केला? संभाजी महाराजांनी हत्तीच्या पायाखाली कुणाला दिलं? ते नेमके सनातनी मनुवादी कोण आहेत? या प्रश्नांची उत्तरे द्या, असं आव्हानच त्यांनी दिलं.
संभाजी महाराजांच्या मुद्द्यावरून राष्ट्रवादीत दोन गट पडल्याचा इन्कारही त्यांनी केला. अजित पवार जे बोलायचे ते बोललेच. दोन गट नाही. आम्ही आमच्या भूमिकेवर ठाम आहोत. अजित पवार यांची भूमिका योग्यच आहे. ते चुकीचं काही बोलले नाहीत. मनुवादी विचारसरणीने इतिहासाचं वाटोळं केलं.
सर्व नष्ट करण्याचा प्रयत्न केला. इतिहासात नसलेल्या गोष्टी मांडल्या. लोकांपर्यंत पोहोचवल्या. आता बहुजनांची पोरं शिकत आहे. नव्याने इतिहास मांडत आहेत, असं त्यांनी सांगितलं.
औरंगजेबाने नेमकी सनातन्यांच्या गावातीलच मंदिरं कशी पडली नाहीत? हा प्रश्न आहे. औरंगजेबाने भावाला मारलं. बापाला मारलं आणि मुलाला मारायचा प्रयत्न केला. संभाजी महाराजांनी त्याच्या मुलाला मदत केली. त्याला पर्शियाला पाठवलं. पण त्यावेळी जे औरंगजेबाने लिहून ठेवलं ते धक्कादायक आहे. ते वाचाच, असंही ते म्हणाले.