VIDEO: सोमय्या कोर्लईत येताच तणाव, शिवसेना-भाजप कार्यकर्ते आमने-सामने, गोमूत्र आणि दूध शिंपडून शुद्धीकरण
भाजपचे नेते किरीट सोमय्या आपल्या लवाजम्यासह आज कोर्लईत पोहोचले. यावेळी भाजपचे कार्यकर्ते मोठ्या संख्यने उपस्थित होते. बाईकवर बसून शेकडो कार्यकर्ते सोमय्यांसोबत आले होते. सोमय्या यांच्यासोबत भाजपचे कार्यकर्ते असल्याने शिवसैनिकांनीही कोर्लईच्या ग्रामपंचायतीसमोर तुफान गर्दी केली.
गिरीश गायकवाड, अलिबाग: भाजपचे नेते किरीट सोमय्या (Kirit somaiya) आपल्या लवाजम्यासह आज कोर्लईत पोहोचले. यावेळी भाजपचे (bjp) कार्यकर्ते मोठ्या संख्यने उपस्थित होते. बाईकवर बसून शेकडो कार्यकर्ते सोमय्यांसोबत आले होते. सोमय्या यांच्यासोबत भाजपचे कार्यकर्ते असल्याने शिवसैनिकांनीही (shivsainik) कोर्लईच्या ग्रामपंचायतीसमोर तुफान गर्दी केली. यात महिला रणरागिणीचा सर्वाधिक समावेश होता. शिवसैनिक आणि भाजप कार्यकर्ते आमनेसामने आल्याने कोर्लईत प्रचंड तणाव निर्माण झाला होता. सोमय्या येताच शिवसैनिकांनी जोरदार घोषणाबाजी सुरू केली. यावेळी सोमय्या यांचा ताफाही अडवण्याचा प्रयत्न झाला. तसेच सोमय्या हे ग्रामपंचायतीच्या कार्यालयात जाताच शिवसैनिकांनीही ग्रामपंचायत कार्यालयात घुसण्याचा प्रयत्न केला. मात्र, सोमय्यांसोबत असलेल्या सुरक्षा रक्षकांनी शिवसैनिकांना हुसकावून लावले. मात्र, सोमय्या पंचायत कार्यालयातून गेल्यानंतर शिवसैनिकांनी सोमय्या आले त्या जागेवर गोमूत्र आणि दूध शिंपडून शुद्धीकरण केलं.
भाजप नेते किरीट सोमय्या दुपारी पावणे दोनच्या सुमारास कोर्लई गावात पोहोचले. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या 19 बंगल्यांचा शोध घेण्यासाठी ते कोर्लईत आले होते. यावेळी त्यांच्यासोबत भाजपचे शेकडो कार्यकर्ते बाईक आणि गाड्या घेऊन आले होते. भाजप कार्यकर्त्यांनी जोरदार शक्तीप्रदर्शन केलं. सोमय्यांसोबत भाजप कार्यकर्ते येत असल्याचं माहीत पडताच शेकडो शिवसैनिकांनीही कोर्लईच्या ग्रामपंचायतीच्या बाहेर गर्दी केली. सोमय्या येताच शिवसैनिकांनी ‘निमका पत्ता कडवा है…’ ‘चलो जाव, चलो जाव, किरीट सोमय्या चले जाव’च्या घोषणा दिल्या. त्यामुळे भाजप कार्यकर्त्यांनीही ‘किरीट सोमय्या आगे बढो’च्या घोषणा देत सोमय्यांचं समर्थन केलं. काही शिवसैनिकांनी सोमय्यांचा ताफा अडवण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे पोलिसांनी आणि सुरक्षा रक्षकांनी त्यांना पांगवले. त्यानंतर सुरक्षा रक्षकांच्या कड्यातच सोमय्या हे ग्रामपंचायतीच्या कार्यालयात गेले. त्यांच्यासोबत भाजपचे आमदार प्रशांत ठाकूर होते.
पंचायतीच्या कार्यालयात काय घडलं?
पंचायत समितीच्या कार्यालयात सोमय्या गेले. त्यानंतर अवघ्या पाचच मिनिटात ते कार्यालयाबाहेर आले. सोमय्यांनी सरपंच प्रशांत मिसाळ यांना नमस्कार केला. खुर्चीत बसले. तेवढ्यात प्रशांत ठाकूर यांनी खिशातून एक पत्रं काढलं आणि ते मिसाळ यांना दिलं. त्यानंतर ते कार्यालयाबाहेर आले. सोमय्यांनी कार्यालयात आल्यानंतर आमच्याशी एका शब्दानेही चर्चा केली नाही, अशी प्रतिक्रिया सरपंच मिसाळ यांनी दिली आहे.
पुन्हा घोषणा आणि शुद्धीकरण
सोमय्या पंचायत कार्यालयाच्या बाहेर येताच शिवसैनिकांनी पुन्हा एकदा घोषणाबाजी केली. पुन्हा शिवसैनिकांनी सोमय्यांना अडवण्याचा प्रयत्न केला. पण सोमय्या तात्काळ गाडीत बसले आणि वायुवेगाने त्यांची गाडी रेवदंडा पोलीस ठाण्याच्या दिशेने गेली. सोमय्या निघून जाताच सोमय्या आले त्या जागेवर दूध आणि गोमूत्र शिंपडून शिवसैनिकांनी शुद्धीकरण केलं. ग्रामपंचायतीचं शुद्धीकरण केल्याचं सरपंचांनीही सांगितलं.
संबंधित बातम्या:
VIDEO: मनसुख हिरेनच्या हत्येची सुपारी शिवसेनेने दिली, सोमय्यांचा गंभीर आरोप
VIDEO: संजय राऊत म्हणाले, सोमय्या वेडा झालाय; किरीट सोमय्या म्हणतात, होय, मी…
VIDEO: किरीट सोमय्या वेडा माणूस, भाजपला भुताटकीनं झपाटलं; राऊतांची जोरदार टोलेबाजी