10 वर्षांच्या प्रतिक्षेनंतर नवीमुंबई मेट्रो सुरु, पाहा काय भाडे आणि वेळापत्रक
नवीमुंबई मध्ये बेलापूर ते पेंधरपर्यंत पहिल्या टप्प्यात मेट्रो सेवा शुक्रवारपासून सुरु झाली आहे. या निर्णयाने नवीमुंबईकरांना प्रदुषणरहीत आरामदायी प्रवासाचा लाभ मिळणार आहे. 10 वर्षांच्या विलंबानंतर मेट्रो अखेर सुरु होत आहे.
मुंबई | 17 नोव्हेंबर 2023 : 10 वर्षांहून अधिक काळाच्या प्रदीर्घ विलंबानंतर नवीमुंबई मेट्रो आजपासून प्रवाशांच्या सेवेत आली आहे. पहिल्या टप्प्यात ही मेट्रो बेलापूर ते पेंधर अशी चालविण्यात येत आहे. लोकांच्या सोयीसाठी ही मेट्रो कोणत्याही औपचारिक उद्घाटन सोहळ्याशिवाय सुरु करण्याचे आदेश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले होते. या मेट्रोच्या उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते करण्याची योजना होती. परंतू त्यांचा अनेकवेळा प्रयत्न करूनही त्यांची वेळ मिळाली नाही. अखेर आज शुक्रवारी ही मेट्रो बेलापूर ते पेंधर रुट क्र. 1 वर सुरु करण्यात आली आहे. सिडको संचालिक या मेट्रोच्या बेलापूर ते पेंधर या 11.10 किमी लांबीच्या मार्गावर 11 स्थानके असून तळोजा येथील पांचनंद येथे डेपो तयार करण्यात आला आहे. दर पंधरा मिनिटांना एक अशा मेट्रोच्या फेऱ्या होणार आहेत.
पहिल्या टप्प्यात बेलापूर ते पेंधर
शुक्रवार दुपारी तीनच्या सुमारास नवीमुंबईच्या मेट्रोचे उद्घाटन झाले असून बेलापूर ते पेंधर अशी ती धावणार आहे. उद्या 18 नोव्हेंबर पासून पहिली मेट्रो सकाळी 6 वाजल्यापासून सुरु होईल तर शेवटची मेट्रो रात्री 10 वाजता सुटेल. या प्रकल्पासाठी सिडको 3,063.63 कोटी अंदाजित खर्च येईल असे म्हटले होते. प्रत्यक्षात 2,954 कोटी या प्रकल्पासाठी खर्च झाले आहेत.
पर्यावरणीय मेट्रो
सिडकोचे एमडी अनिल डीग्गीकर यांनी सांगितले की बेलापूर ते पेंधरपर्यंत मेट्रो सेवा सुरु होत आहे. नवीमुंबईकरांना वेगवान, पर्यावरण अनुकुल आणि आरामदायी परिवहनाचा पर्याय उपलब्ध होणार आहे. सीबीडी बेलापूरसह वेगाने विकसित होणाऱ्या खारघर, तळोजा नोड्स ला मेट्रोमुळे चांगली कनेक्टीविटी मिळणार आहे. या मेट्रो अंतर्गत चार एलिवेटेड मार्ग तयार केले जात आहेत. पहिल्या टप्प्यात बेलापूर ते पेंधरपर्यंत 11.10 किमी लांबीचा मार्ग सुरु होत आहे. प्रवाशांना 11 स्थानकांची भेट मिळणार आहे.
अशी असणार स्थानके
बेलापूर, सेक्टर-7 बेलापूर, सायन्स पार्क, उत्सव चौक, सेक्टर-11 खारघर, सेक्टर-14 खारघर, सेंट्रल पार्क, पेठापाडा, सेक्टर-34 खारघर, पंचनद आणि पेंधर टर्मिनल.
मेट्रोच्या तिकीटाचे दर
0 ते 2 किमी – 10 रुपये
2 ते 4 – 15 रुपये
4 ते 6 – 25 रुपये
8 ते 10 – 30 रुपये
10 किमी – 40 रुपये