अफगाणिस्तानवर तालिबानाचा ताबा, सुक्या मेव्याच्या दरांचा भडका, भाववाढीवर ग्राहकांची तीव्र नाराजी, नेमकं काय घडलं?
सुक्यामेव्याचे बाजारभाव मार्केटमध्ये वाढले असून तालिबानच्या नावाखाली मुंबई एपीएमसी बाजारात सुका मेव्याचे बाजारभाव व्यापाऱ्यांनी वाढवले आहेत. त्यामुळे ग्राहकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.
नवी मुंबई: जुना माल बाजार आवारात असल्याने सध्या सुकामेवाच्या दर वाढण्याची शक्यता नसल्याचे मुंबई एपीएमसी मसाला मार्केट संचालक विजय भुत्ता यांनी सांगतले. परंतु, काल पासून सुक्यामेव्याचे बाजारभाव मार्केटमध्ये वाढले असून तालिबानच्या नावाखाली मुंबई एपीएमसी बाजारात सुका मेव्याचे बाजारभाव व्यापाऱ्यांनी वाढवले आहेत. त्यामुळे ग्राहकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. अद्याप जुनाच सुकामेवा बाजारात असून मालाची कमतरता नसल्याचे विजय भुत्ता यांनी सांगितले आहे. शिवाय लवकरच अफगाणिस्थानातील बँकिंग क्षेत्र सुरु झाल्यास पुन्हा माल येण्यास सुरुवात होईल असे ही भुत्ता यांनी सांगितले.
देश परदेशातून सुक्या मेव्याची आवक
मुंबई एपीएमसी मसाला मार्केटमध्ये देश-परदेशातून मोठ्या प्रमाणात सुकामेवा आयात होतो. शिवाय जवळपास 7 ते 8 हजार कोटी रुपयांची उलाढाल वर्षाला या बाजारात होत असते. तर जवळपास 30 ते 40 व्यापारी अफगाणिस्थानवरून माल आयात करतात. तर जवळपास 38 हजार मेट्रिक टन सुकामेवा मार्केटमध्ये अफगाणिस्थानमधून आयात केला जातो. दिवाळी सणाला मोठ्या प्रमाणात सुक्यामेव्याची मागणी असते. त्यामुळे तो पर्यंत अफगाणिस्थानचे बँकिंग क्षेत्र चालू न झाल्यास मालाचा तुटवडा होऊन बाजारभाव मोठ्या प्रमाणात वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे. बाजारात बदामाच्या दरात मोठ्या प्रमाणात दर वाढ झाली आहे. मात्र, बदाम हे प्रामुख्याने अमेरिकेतून येत असल्याने त्यात भाववाढ होण्याची शक्यता नसल्याचे भुत्त यांनी सांगितले. मात्र, येत्या दोन महिन्यात येणारे नवीन पीक आणि अफगाणिस्थानातील बँकिंग क्षेत्र यावर सुक्यामेव्याची भाववाढ अवलंबून असेल. तर 10 ते 25 टक्के दर वाढ होण्याची शक्यता असल्याचे भुत्ता यांनी सांगितले.
सुक्यामेव्याचा साठा असताना दरवाढ
दुकानापासून गोडाऊन ते नाव्हा-शेवा बंदरापर्यंत मोठ्या प्रमाणात सुक्यामेव्याचा साठा असताना सुद्धा ही बाजारवाढ करण्यात आल्याने ग्राहकांमध्ये नाराजीचा सूर आहे. तर कॅलिफोर्निया येथून सुद्धा मोठ्या प्रमाणात सुकामेवा भारतात येतो. त्या ठिकाणी वाहतूक व्यवस्था विस्कळीत झाल्याने माल कमी येत असल्याचे सांगत विनाकारण ही भाव वाढ करण्यात आल्याचाही अंदाज व्यक्त केला जात आहे.
काही वस्तूंचे भाव दुपटीनं वाढले
अफगाणिस्तानमधील तणावपूर्ण परिस्थिती दरम्यान देशभरासह मुंबईत देखील सुका मेव्याचे भाव अचानक वाढले आहेत. मुंबई एपीएमसी मार्केटमधील मसाला मार्केटमध्ये सुकामेवा खरेदी केला जातो. मात्र, मार्केटमध्ये सुकामेवा अफगाणिस्तानातून येत असल्याने काही वस्तूंचे भाव दुपटीने वाढले आहेत.
अफगाणिस्तानमधील परिस्थितीचा परिणाम आता भारतीय बाजारावरही होत आहे. अफगाणिस्तानात बदल झाल्यानंतर सुकामेव्याच्या किमतीत वाढ झाली आहे. येत्या काही दिवसात आणखी भाव वाढू शकतात, असा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. मात्र, देशाला वर्षभर पुरेल एवढा साठा व्यापाऱ्यांकडे असताना लगेच हि भाववाढ का? असा देखील सवाल केला जात आहे. कारण येणाऱ्या सणासुदीला याचा मोठा परिणामी ग्राहकांना सहन करावा लागणार आहे. त्यामुळं केंद्र सरकारने यात लक्ष घालून भाववाढ नियंत्रणात ठेवण्याचा प्रयत्न करावा अशी मागणी ग्राहकांनी केली आहे.
कृत्रिमरित्या दरवाढ
अफगाणिस्तानात तालिबानने सरकार हातात घेतल्यानंतर देशातील अनेक भागात ड्रायफ्रूटचे दर कृत्रिमरित्या वाढवण्यास सुरुवात झाली आहे. सध्या देशात अफगाणिस्तानातून येणाऱ्या ड्रायफ्रूटचा पुरेसा साठा शिल्लक आहे. परंतु पुढील काही दिवसात केंद्र सरकारच्या धोरणानुसार दर वाढतील की नाहीत हे सांगता येणे कठीण आहे.
मुंबई एपीएमसी घाऊक बाजारात ड्रायफ्रुटचे दर्जानुसार सध्याचे किलोचे दर
काळा मनुका :220-550 रुपये अंजीर: 200-1400 रुपये जरदाळू :175-800 रुपये खजूर : 100-1000रुपये शहाजिरा : 415-500 रुपये खरजीरा : 480 रुपये काळा किशमिश : 280-600 रुपये हिरवा किशमिश – 200 ते 800 रुपये चिलकुजा 200 ते 4000 रुपये पिस्ता 800 ते 1600 रुपये बदाम 700 ते 1000 रुपये अक्रोड 800 ते 1000 रुपये कच्चा हिंग 2000 ते 5000 रुपये
इतर बातम्या:
धारावीतील विद्यार्थ्यांना टॅबचं वितरण, शिक्षणापासून कुणीही वंचित राहू नये: आदित्य ठाकरे
Anil Deshmukh : अनिल देशमुख यांची पुन्हा एकदा चौकशीला दांडी! ईडी काय कारवाई करणार?
Mumbai Apmc Dry Fruit rates increased due to Taliban Take over Afghanistan