नवी मुंबईकरांचा मुंबईला पोहोचण्याचा वेळ 30 मिनिटांवर, वॉटर टॅक्सीच्या लोकार्पणाचा कार्यक्रम
मुंबईला जाण्यासाठी नवी मुंबईकरांना एक ते दीड तास लागतात, आता वॉटर टॅक्सीमुळे (Water Taxi) 30 मिनिटांत नवी मुंबईकरांना मुंबईत जाता येणार.
नवी मुंबई :नवी मुंबईकरांचा (Navi Mumbai) मुंबईचा (Mumbai) प्रवास अखेर वेगवान होणार आहे. मुंबईला जाण्यासाठी नवी मुंबईकरांना एक ते दीड तास लागतात, आता वॉटर टॅक्सीमुळे (Water Taxi) 30 मिनिटांत नवी मुंबईकरांना मुंबईत जाता येणार आहे. मुंबई ते नेरुळ, बेलापूर, जेएनपीटी, एलिफंटा वॉटर टॅक्सी सेवेचे लोकार्पण आज करण्यात येणार आहे. वॉटर टॅक्सी प्रवासासाठी प्रवाशांना प्रति व्यक्ती 700 ते 1200 रुपये मोजावे लागणार आहेत. बेलापूर येथून प्रत्येकी 10 ते 30 प्रवासी क्षमता असलेल्या 7 स्पीडबोटी आणि 56 प्रवासी क्षमता असलेली एक कॅटामरान बोट अशा एकूण 8 बोटींद्वारे वॉटर टॅक्सी सेवा सुरु करण्यात येत आहे. राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि केंद्रीय मंत्री सरबानंद सोनोवाल हे ऑनलाईन उपस्थित राहणार आहेत.
वॉटर टॅक्सी शुभारंभ
मुंबईतील वाहतूक कोंडीला मार्ग काढण्यासाठी बहुप्रतीक्षित मुंबई ते बेलापूर वॉटर टॅक्सी चा मुहुर्त अखेर निश्चित झाला आहे. महाराष्ट्र मेरिटाईम बोर्ड आणि मुंबई पोर्ट ट्रस्ट यांची महत्त्वाकांक्षी योजना असलेल्या वॉटर टॅक्सी सेवेचे आज उद्घाटन होत आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार, एकनाथ शिंदे,अस्लम शेख उपस्थित राहणार आहेत. तर राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि केंद्रीय मंत्री सरबानंद सोनोवाल हे ऑनलाईन उपस्थित राहणार आहेत.
7 स्पीडबोटी आणि एक कॅटामरान बोट सेवेत असणार
बेलापूर येथून प्रत्येकी 10 ते 30 प्रवासी क्षमता असलेल्या 7 स्पीडबोटी आणि 56 प्रवासी क्षमता असलेली एक कॅटामरान बोट अशा एकूण 8 बोटींद्वारे वॉटर टॅक्सी सेवा सुरु करण्यात येत आहे. बेलापूर येथून दक्षिण मुंबईत भाऊचा धक्का येथे पोहोचण्यास स्पीड बोटीने फक्त 30 मिनिटे तर कॅटामरान बोटीला 45 ते 50 मिनिटांचा कालावधी लागणार आहे. स्पीडबोटीचे भाडे प्रति प्रवासी रु.800 ते रु. 1200 तर कॅटामरान बोटीकरीता प्रति प्रवासी रु 290 इतके ठेवण्यात आले आहे. बेलापूर येथून भाऊच्या धक्क्याबरोबरच एलिफंटा, जेएनपीटी या जलमार्गावर सुद्धा प्रवासी सेवा चालविण्यात येणार आहे.
इतर बातम्या:
चंद्रकांतदादा सोमय्यांच्या प्रकरणात पडू नका, नाही तर तुमचेही कपडे फाटतील; राऊतांचा सल्ला
राऊत आमच्या कुटुंबाचा भाग, पण आमच्यात कोणतेही आर्थिक व्यवहार नाहीत; सुजित पाटकर EXCLUSIVE