नवीमुंबईकरांना मिळणार प्रशस्त आरटीओ ऑफीस, लवकरच उद्घाटन होणार
नवीमुंबईकरांसाठी 1232.26 चौरस मीटर जागेत नवीन ग्राऊंड प्लस चार मजली आरटीओची इमारत नेरूळ सेक्टर 19 मध्ये उभारण्यात आली आहे.
नवी मुंबई : नवीमुंबईकरांसाठी फायद्याचे ठरणाऱ्या वाशी आरटीओच्या ( New Rto Building ) नव्या कार्यालयाची इमारत बांधूण पूर्ण झाली आहे. नेरुळ सेक्टर 19 मध्ये असलेल्या या कार्यालयाच्या इमारतीचे उद्धाटन एकदा का या इमारतीला ओसी सर्टीफीकेट्स मिळाले की मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ( Eknath Shinde ) यांच्या हस्ते होणार आहे. गेली 19 वर्षे नवीमुंबईकरांना ( Navi Mmumbai ) आधीच्या अरुंद आणि दाटीवाटी असलेल्या कृषी उत्पन्न समितीच्या इमारतीत भाड्याच्या जागेत असलेल्या वाशी उप प्रादेशिक परिवहन कार्यालयात जावे लागत होते.
नवीमुंबईकरांसाठी 1232.26 चौरस मीटर जागेत नवीन ग्राऊंड प्लस चार मजली आरटीओची इमारत नेरूळ सेक्टर 19 मध्ये उभारण्यात आली आहे. या इमारतीसाठी 8.84 कोटी रुपयांची तरतूद अर्थसंकल्पात करण्यात आली होती. पुढील महिन्यात इमारतीला ओसी सर्टीफिकेट्स मिळाल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते करण्यात येणार आहे.
साल 2004 पासून वाशीत कार्यालय आले
वाशी उप प्रादेशिक परिवहन कार्यालय ठाणे प्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या अंतर्गत येत आहे. त्याचे उद्घाटन 2004 रोजी करण्यात झाले होते. याआधी नवीमुंबईकरांना वाहनाच्या नोंदणीसह वाहन लायसन्सच्या कामासाठी ठाणे आरटीओत जावे लागायचे. एपीएमसी मार्केटमध्ये महिना 3.65 लाख भाड्याने आरटीओ कार्यालया चालविण्यात येत होते.
दाटीवाटीची जागा होती
सध्याच्या कार्यालयात आरटीओसह अनेक सरकारी कार्यालये आहेत. तसेच क्राईम ब्रॅंच युनिट एकचे कार्यालय देखील आहे. अधिकाऱ्यांना एकाच वेळी दोन खिडक्या सांभाळाव्या लागायच्या. त्यामुळे नागरिकांची प्रचंड गैरसोय होत होती. त्यांना नेमके कुठे रांग लावायची समजत नसायचे. त्यासाठी चौकशी करावी लागायचे. नागरिकांच्या वाहनांना पार्किंगसाठी जागा देखील नसायची अशी माहिती सूत्रांनी दिली.
1.2 किमीचा वाहन टेस्टींग ट्रॅक
नवीन वाशी उप प्रादेशिक परिवहन कार्यालयात 1.2 किमीचा वाहन टेस्टींग ट्रॅक उभारण्यात आलेला आहे. सध्याच्या कार्यालयाला दररोज 500 नागरिक भेट द्यायचे. कधी कधी त्यांची संख्या 1000 इतकी होते. नवीन कार्यालय नेरुळच्या उरण फाटा आणि एलपी बस थांब्यापासून नजिक आहे.