लहान मुलांना न्युमोकोकल आजाराचा धोका, नवी मुंबईत पीसीव्ही लसीकरणाला सुरुवात
न्युमोकोकल आजारापासून बालकांचे संरक्षण करण्यासाठी सार्वत्रिक लसीकरण मोहिमेत पीसीव्ही लसीचा समावेश करण्यात आला आहे. नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रात पीसीव्ही लसीकरणाला सुरुवात करण्यात आली.
नवी मुंबई : पाच वर्षांच्या आतील मुलांमध्ये न्युमोनियाचे स्ट्रेप्टोकोकस न्युमोनिया विषाणू हे न्युमोकोकल आजाराचं प्रमुख कारण आहे. त्यामुळेच न्युमोकोकल आजारापासून बालकांचे संरक्षण करण्यासाठी सार्वत्रिक लसीकरण मोहिमेत पीसीव्ही लसीचा समावेश करण्यात आला आहे. शासन आदेशानुसार आजपासून (13 जुलै) नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रात पीसीव्ही लसीकरणाला सुरुवात करण्यात आली. नवी मुंबई महानगरपालिकेच्या मिनाताई ठाकरे रुग्णालय नेरुळ येथे शिवाजीनगर एमआयडीसी येथील अंश गजानन माडेकर हे 6 आठवड्याचे बाळ पीसीव्ही लसीचे पहिले लाभार्थी ठरले.
नवी मुंबई महापालिका आयुक्त अभिजीत बांगर यांच्या निर्देशानुसार सार्वत्रिक लसीकरण कार्यक्रम नियमितपणे सुरु आहे. नवी मुंबई महानगरपालिकेची रुग्णालये, नागरी प्राथमिक आरोग्य केंद्रे येथे दरमहा एकूण 118 स्थायी लसीकरण सत्रे आयोजित करण्यात येत आहेत. याशिवाय 324 बाह्य संपर्क सत्रे आणि 28 मोबाईल सत्रे आयोजित करण्यात येतात. अशाप्रकारे दरमहा एकूण 470 लसीकरण सत्रांच्या माध्यमातून 0 ते 6 वयोगट दरम्यान विविध आजारांपासून बालकांचे संरक्षण व्हावे यासाठी हा सार्वत्रिक लसीकरणाचा कार्यक्रम राबविला जातो. हा कार्यक्रम 7 टप्प्यात होईल आणि यामुळे 12 आजारांना प्रतिबंध होईल. यामध्ये आता न्युमोकोकल कंज्युगेट व्हॅक्सीनचा (PCV) समावेश करण्यात आलेला आहे.
पीसीव्ही लसीचा डोस कुणाल मिळणार?
जन्मानंतर 6 आठवड्याच्या म्हणजेच दीड महिन्याच्या बालकास पीसीव्ही लसीचा पहिला डोस दिला जाणार आहे. 14 आठवडे म्हणजे साडेतीन महिन्याच्या बालकास दुसरा डोस तर 9 महिन्याच्या बालकास बुस्टर डोस दिला जाणार आहे. नवी मुंबई महानगरपालिकेस पीसीव्ही लसीचे 1500 डोस प्राप्त झाले आहेत. ही पीसीव्ही लस विनामूल्य देण्यात येणार आहे.
नवी मुंबई महानगरपालिकेच्या रुग्णालयांप्रमाणेच अंगणवाडी, सोसायटी ऑफिसेस, खासगी वैद्यकीय व्यावसायिक, दवाखाने, खासगी रुग्णालये अशा विविध ठिकाणी बाह्य संपर्क सत्रे आयोजित कऱण्यात येत आहेत. दगड खाणी, उड्डाणपुलाखालील वस्ती, स्टेशन लगतच्या वस्त्या, विटभट्ट्या, एमआयडीसी क्षेत्रातील झोपडपट्टी भाग, बांधकाम साईट्स अशा ठिकाणी मोबाईल सत्रे आयोजित करण्यात येत असतात. एकही बालक विविध आजारांपासून संरक्षण करणाऱ्या सार्वत्रिक लसीकरणापासून वंचित राहू नये, असे निर्देश महापालिका आयुक्त अभिजीत बांगर यांनी आरोग्य विभागाला दिले आहेत.
आशा स्वयंसेविका व अंगणवाडी सेविका यांनाही प्रशिक्षण
पीसीव्ही लस देण्याबाबत नवी मुंबई महानगरपालिकेचे वैद्यकीय अधिकारी तसेच एएनएम यांचे रितसर प्रशिक्षण पूर्ण झाले. आशा स्वयंसेविका व अंगणवाडी सेविका यांनाही प्रशिक्षित करण्यात आलेले आहे. तसेच खासगी वैद्यकीय व्यावसायिक (General Practitioner) यांचीही कार्यशाळा आयोजित करून त्यांना पीसीव्ही लसीकरणाबाबत माहिती देण्यात आलेली आहे.
न्युमोकोकल आजाराचा सर्वाधिक धोका कुणाला?
न्युमोकोकल आजाराचा धोका एक वर्षापर्यंतच्या बालकांमध्ये सर्वाधिक जाणवतो. तसेच 2 वर्षापर्यंतच्या बालकांमध्ये हा आजार गंभीर स्वरूपात आढळून येतो. या आजारामुळे लहान मुलांमध्ये होणारे धोके टाळण्यासाठी सार्वत्रिक लसीकरण कार्यक्रमात शासकीय आदेशानुसार न्युमोकोकल कन्ज्युगेट वॅक्सीनचा समावेश करण्यात आला आहे. नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील 6 आठवडे पूर्ण झालेल्या बाळाच्या पालकांनी महानगरपालिकेच्या कोणत्याही रुग्णालय, नागरी आरोग्य केंदात विनामूल्य पीसीव्ही लसीचा डोस आपल्या बाळाला देऊन संरक्षित करावे, असे आवाहन महापालिका आयुक्त अभिजीत बांगर यांच्या वतीने करण्यात येत आहे.
हेही वाचा :
चार दिवस लसीकरण बंद करून रेकॉर्ड केल्याचा दावा करायचा हा पोरखेळ; पृथ्वीराज चव्हाण यांचा हल्ला
केंद्राने दिलेला 25 लाख डोसेसचा साठा खासगी रुग्णालयांकडे, तो मोठ्या प्रमाणावर वापरला पाहिजे : उद्धव ठाकरे
नांदेडमध्ये लसीकरणाला वेग, आतापर्यंत 7 लाख ‘लसवंत’, 25 लाखांचं जिल्हाधिकाऱ्यांचं उदिष्ट
व्हिडीओ पाहा :
PCV Vaccination to protect child from Pneumococcal in Navi Mumbai