“परमबीर सिंग, प्रदीप शर्मा, राजकुमार कोथिंबिरे यांनी माझ्या 2 गाड्या जबरदस्तीने नेल्या”, व्यावसायिकाचा गंभीर आरोप
माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग, निवृत्त पोलीस निरीक्षक प्रदीप शर्मा, राजकुमार कोथिंबीरे यांच्यावर विरारमधील व्यावसायिक मयुरेश राऊत यांनी गंभीर आरोप केलेत.
विरार : मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग, निवृत्त पोलीस निरीक्षक प्रदीप शर्मा, राजकुमार कोथिंबीरे यांच्यावर विरारमधील व्यावसायिक मयुरेश राऊत यांनी गंभीर आरोप केलेत. 2017 मध्ये ठाणे खंडणी विरोधी पथकाने आपल्या दोन गाड्या जबरदस्तीने नेल्या. या गाड्यांचा उपयोग करुन अनेक गुन्हे घडलेत. मला हिरेन मनसुख व्हायचं नाही. म्हणून मी त्यांच्या विरोधात तक्रार देण्यास विरार पोलिसांकडे आलो. मात्र, पोलिसांनी माझी तक्रार घेण्यास टाळाटाळ केल्याचा आरोप मयुरेश राऊत यांनी केलाय (Serious allegations on Parambir Singh Pradip Sharma and Rajkumar Kothimbire by Mayuresh Raut).
“2017 मध्ये माझ्या दोन गाड्या पोलिसांनी जबरदस्तीने नेल्या”
मयुरेश राऊत यांनी टीव्ही 9 मराठीशी बोलताना सांगितलं, “परमबीर सिंग आणि अँटेलियाबद्दल जे प्रकरण सुरु आहे त्याविषयी वर्तमानपत्रात माहिती येते आहे. त्याप्रमाणेच 2017 मध्ये माझ्या दोन गाड्या पोलिसांनी जबरदस्तीने नेल्या होत्या. त्यावेळी ठाण्याचे तत्कालीन पोलीस आयुक्त परमबीर सिंग होते. याशिवाय खंडणी विरोधी पथकाचे प्रमुख प्रदीप शर्मा आणि त्यांचे सहाय्यक अधिकारी म्हणून राजकुमार कोथिंबीरे होते. त्यांनीच माझ्या दोन गाड्या नेल्या होत्या.”
“विरार पोलीस परमबीर सिंगांविरुद्धची तक्रार घेत नाहीत”
“2018 पासून मी उच्च न्यायालयाचा आदेश घेऊन वारंवार येतोय. आतापर्यंत माझ्या विरार पोलिसांकडे हजाराच्या वर तक्रारी असतील. मात्र, आजपर्यंत त्यांनी कोणतीही कार्यवाही केली नाही. मागच्या प्रमाणेच त्यांनी माझी तक्रार घेतली नाही. माझ्या पत्रात मी मला पोलीस संरक्षण देण्याचीही मागणी केलीय. पोलीस तक्रारीतील परमबीर सिंग, प्रदीप शर्मा आणि राजकुमार कोथिंबीरे यांची नावं वाचून हे आमच्या अखत्यारीत येत नाही, आमच्याकडे या पॉवर्स नाहीत, असं सांगत मला माघारी पाठवलं,” असंही मयुरेश राऊत यांनी सांगितलं.
“मी तक्रार नोंदवा आणि न्याय द्या, तपासातच गुन्ह्यातील सत्यता समोर येईल”
मयुरेश राऊत पुढे म्हणाले, “मी विरारचे वरिष्ठ पोलीस निरिक्षक वऱ्डाडे यांना भेटलो. मला या प्रकरणी एफआरआय रेजिस्टर करुन हवी आहे. माझ्यावर झालेल्या अत्याचारावर मला न्याय हवा आहे. पोलिसांनी गुन्हा नोंद करुन तपास करावा. गुन्ह्यात किती सत्यता आहे हे तुम्हाला तपासातच कळेल. साधा अर्ज घेतानाही पोलीस त्यांच्याकडे पॉवर नसल्याचं सांगतात. मग ते गुन्ह्याचा तपास काय करणार?”
“मनसुख हिरेनची हत्या, माझ्याही जीवाला धोका”
“मनसुख हिरेन प्रकरणात देखील अशाचप्रकारे व्यवसायिकांच्या जबरदस्तीने आणलेल्या गाड्यांचा वापर करण्यात आलाय. त्या प्रकरणात मनसुख हिरेन यांची हत्या झालीय. त्यामुळे माझ्या गाड्यांचाही यात काही वापर झालाय का हे माहिती नाही. पण माझ्या जीवालाही धोका आहे. हे लोक मला जीवे मारतील. मी त्यांच्या विरोधात तक्रारीसाठी प्रयत्न करतोय आणि त्यांच्यावर आरोप करतोय म्हणून मला त्यांच्यापासून धोका आहे. ते कधीही मला मारुन टाकतील,” असा आरोप करत राऊत यांनी पोलीस संरक्षणाची मागणी केलीय.
हेही वाचा :
परमबीर सिंग यांच्या अडचणीत वाढ, पोलीस अधिकाऱ्याकडून पहिला गुन्हा दाखल
परमबीर सिंग यांचे अंडरवर्ल्डशी संबंध? पोलीस निरीक्षक अनुप डांगेंच्या आरोपांचीही चौकशी होणार
व्हिडीओ पाहा :
Serious allegations on Parambir Singh Pradip Sharma and Rajkumar Kothimbire by Mayuresh Raut