APMC Vegetables News | नवी मुंबईतील एपीएमसी(APMC) घाऊक भाजीपाला बाजारात (Vegetable Market) भाज्यांची आवक घटली आहे. यंदा पावसाने (Heavy Rain) धुवांदार बॅटिंग केल्याने भाजीपाला मोठ्या प्रमाणात खराब होत आहे. त्यामुळे भाज्यांचे दर कडाडले आहेत. तर काही फळभाज्यांचे भाव ही वाढले आहेत. एपीएमसी मार्केट मध्ये पुणे, नाशिक सह खानदेश आणि विदर्भातील काही जिल्ह्यातून भाजीपाल्यासह फळांची आवक होते. पण राज्यात अनेक भागात पावसाचा जोर कायम असल्याने तर काही परिसरात दमदार पाऊस झाल्याने भाज्या खराब होण्याचे देखील प्रमाण वाढले आहे. भाज्या खराब होत असल्यामुळे दरात देखील वाढ (Hike in Rate) झाली आहे. याविषयी आमचे नवी मुंबई येथील प्रतिनिधी रवी खरात यांनी आढावा घेतला आहे.
एपीएमसीतील भाजीपाला बाजारात दररोज 550 ते 600 भाजीपाला गाड्यांची आवक होत असते. ही नियमित आवक कमी होत आता 424 गाड्यांवर आली आहे. त्यात पावसामुळे आवक होत असलेल्या भाजीपाला हा भिजलेला येत असून तो बाजारात येईपर्यंतच खराब होत आहे. ग्राहकांनी हा भाजीपाला खरेदी केल्यानंतर त्यांना त्याच दिवशी त्याची विक्री करावी लागत आहे. शिल्लक राहिल्यास हा भाजीपाला फेकून द्यावा लागत आहे. त्यामुळे ग्राहकांकडून मागणी कमी झाली आहे. त्यामुळे दरात 10 ते 20 रुपयांनी वाढ झाली आहे.
यंदा पावसाने दमदार हजेरी लावल्याने भाज्या पावसातच खराब झाल्या. पीकच हाती येत नसल्याने अनेक उत्पादकांनी भाजीपाला, माळव लावले नाही. भाजीपाला लागवड न केल्याने त्याचे क्षेत्र ही घटले. त्यामुळे ज्याभागातून पूर्वी भाजीपाला आणि फळपीकांची चांगली आवक होती, तिथून यंदा भाज्या आल्या नाहीत. तर ज्या भागातून भाजीपाला आला तो पावसामुळे सतत भीजत असल्याने एका दिवसाच्यावर टिकला नाही. त्यामुळे भाजीपाला विक्री न झाल्याने या भाज्या कचऱ्यात फेकून द्यावा लागल्या.
राज्यभरात अनेक ठिकाणी सुरू असलेल्या पावसामुळे नवी मुंबई येथील एपीएमसी बाजारामध्ये भाज्यांची आवक घटली. भाज्यांचे प्रमाण या आठवड्यात खूप कमी झाले. दरात वाढ झाल्याने ग्राहकांनीही पाठ फिरवली.परिणामी वीस टक्के मालाची विक्री झाली नाही. पावसामुळे एक दिवसाच्यावर मालच टिकत नसल्याने खराब मालाकडे ग्राहकांनी पाठ फिरवली. त्यामुळे असा माल का घ्यावा, म्हणून व्यापाऱ्यांनी ही भिजलेला भाजीपाला खरेदी केला नाही.