नवी मुंबई : राज्यातील कोकणासह पश्चिम महाराष्ट्रात ओढवलेल्या संकटामुळे मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंसह अनेक नेत्यांनी वाढदिवस साजरा करण्यास मनाई केली. मात्र, दुसरीकडे पणन मंत्री बाळासाहेब पाटील यांच्या वाढदिवसाला शुभेच्छा देण्यासाठी मुंबई बाजार समितीच्या रस्त्यावर मोठी गर्दी उसळली. विशेष म्हणजे अनेक बाजार समिती कर्मचारी आपले काम सोडून शुभेच्छा देण्यासाठी तेथे गेलेले पाहायला मिळाले. मंत्री महोदयांचा आशिर्वाद आपल्यावर राहावा म्हणून या बाजार समिती कर्मचाऱ्यांनी त्या ठिकाणी गर्दी केल्याची चर्चा बाजार आवारात सुरु आहे.
नवी मुंबईमध्ये वाशी येथे पणन मंत्री बाळासाहेब पाटील यांना रस्त्यावर गर्दी करत वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यात आल्या. कोकणातील दुर्घटनाग्रस्त आणि सांगली, कोल्हापूर परिसरातील पूरग्रस्त नागरिकांचे अजून डोळ्यातील अश्रू सुकले नाहीत. अनेकांचे जीव जाऊन आठवडा सुद्धा झाला नाही. शिवाय बाजार घटकांनी या दुर्घटनाग्रस्त आणि पूरग्रस्त लोकांना कोणतीच मदत केल्याचं ऐकिवात नाही. मात्र, या ठिकाणी मंत्र्यांसाठी गुच्छ आणि शाल घेऊन शुभेच्छा देण्यासाठी रस्त्यावर मोठ्या प्रमाणात गर्दी करण्यात आली.
यावेळी शारीरिक अंतराचा विसर मंत्र्यांसह बाजार समितीच्या कर्मचाऱ्यांनाही पडला. काही बहाद्दरांनी फोटो काढताना मास्क नाकाच्या आणि गळ्याच्या खालीच ठेवले. शिवाय काही काळ रस्त्यावरील सामान्य नागरिकांच्या वाहतुकीला या प्रकाराचा फटका बसला. त्यामुळे वाहतूक पोलिसांना वाहनांना रस्ता करून द्यावा लागला. शुभेच्छा देताना बाजार समितीतील लोकांनी मोठ्या आनंदाने फोटो सेशन केले. कोणाच्याही चेहऱ्यावर राज्यावर आलेले संकट तसेच मृत नागरिकांसह उद्ध्वस्त कुटुंबाबाबत वेदनेचा भाव दिसत नव्हता. शिवाय राजकारण्यांच्या नावाने घोषणाबाजीही करण्यात आली.