नवरा -बायकोच्या मध्ये पडू नका.. नवनीत राणांनी थेट भाजप प्रदेशाध्यक्षांना सुनावले
मी ज्या पक्षात कार्यकर्ती आहे त्या पक्षाचे नेते पंतप्रधान मोदी, अमित शहा आणि देवेंद्र फडणवीस आहेत. हा निर्णय मी माझ्या स्वेच्छेने घेतला आहे आणि ते (पती रवी राणा) त्यांच्या इच्छेनुसार निर्णय घेतीलल. नवरा-बायकोमध्ये बाहेरचं कोणी बोललं नाही तरच बरं.. असं मला वाटतं.
आगामी लोकसभा निवडणुकीसाठी अमरावतीमधून भारतीय जनता पक्षाने नवनीत राणा यांची उमेदवारी जाहीर केली आहे. मात्र आता नवनीत राणा या भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्यावर नाराज असल्याची चर्चा आहे. बावनकुळे यांच्या एका विधानामुळे नवनीत राणा नाराज असून त्यांनी त्यांची नाराजी स्पष्टपणे बोलूनही दाखवली आहे. मी आणि माझे पती रवी राणा, यांच्यात मध्ये पडू नका, बोली नका, असा सल्ला देत नवीनत राणांनी थेट भाजपा प्रदेशाध्यक्षांनाच सुनावलं आहे.
नक्की काय झालं ?
खरंतर नवनीत राणा यांनी नुकताच भाजपमध्ये प्रवेश केला. त्यांच्या प्रवेशानंतर अमरावती येथील भाजप पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत चंद्रशेखर बावनुकळे यांनी एक वक्तव्य केलं. नवनीत राणा यांनी त्यांचे पती रवी राणा यांचा युवा स्वाभिमानी पक्ष सोडून भाजपमध्ये प्रवेश केल्याचे बावनुकळे म्हणाले. येत्या काही दिवसांतच नवनीत राणा या त्यांचे पती रवी यांना भाजपमध्ये येण्याचे आदेश देतील, असे वक्तव्य बावनकुळे यांनी केलं.
नवनीत राणा नाराज
मात्र त्यांचं हे वक्तव्य नवनीत राणा यांना फारसं रुचलेलं नाही. त्यामुळेच त्या नाराज असून त्यांनी थेट शब्दांत त्यांची नाराजीही बोलून दाखवली. मी माझ्या मर्जीने भाजपामध्ये प्रवेश करण्याचा निर्णय घेतला आहे. मी भाजपची एक कार्यकर्ती म्हणून काम करत आहे. रवी राणा यांना स्वतंत्र पद्धतीने राजकारणात काम करण्याचा अधिकार आहे. त्यामुळे मला असं वाटतं की बावनकुळे यांनी पती-पत्नीमध्ये बोलू नये, अशा शब्दांत त्यांनी बावनकुळे यांना सुनावलं.
बाहेरचं कोणी बोललं नाहीतर..
मी ज्या पक्षात कार्यकर्ती आहे त्या पक्षाचे नेते पंतप्रधान मोदी, अमित शहा आणि देवेंद्र फडणवीस आहेत. हा निर्णय मी माझ्या स्वेच्छेने घेतला आहे आणि ते (पती रवी राणा) त्यांच्या इच्छेनुसार निर्णय घेतीलल. नवरा-बायकोमध्ये बाहेरचं कोणी बोललं नाही तरच बरं.. असं मला वाटतं.
नवनीत राणा या अमरावतीच्या विद्यमान अपक्ष खासदार होत्या, मात्र त्यांनी आता भाजपमध्ये प्रवेश केला आहे. 2019 मध्ये त्यांनी शिवसेनेचे आनंदराव अडसूळ यांचा पराभव करून अपक्ष उमेदवार म्हणून विजय मिळवला. त्या भाजपच्या समर्थक होत्या. एप्रिल २०२२ मध्ये मुंबई पोलिसांनी नवनीत राणांविरुद्ध एफआयआर दाखल करण्यात आला होता. तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या खाजगी निवासस्थानाबाहेर हनुमान चालीसा पठण करण्याचा इशारा दिल्यानंतर नवनीत राणा आणि त्यांचे पती रवी राणा यांना अटक करण्यात आली होती. त्यांच्यावर “वेगवेगळ्या गटांमध्ये शत्रुत्व निर्माण केल्याचा” आरोप लावण्यात आला होता.