भगवी शाल, हिंदू शेरनी, 14 दिवसांच्या तुरुंगवासाचे फोटो… नवनीत राणांचे बॅनर्स चर्चेत!
महाविकास आघाडी सरकारच्या काळात नवनीत राणा आणि रवी राणा यांनी केलेलं आंदोलन यानिमित्ताने पुन्हा एकदा चर्चेत आलंय.
गिरीश गायकवाड, मुंबई : आगामी हनुमान जयंतीच्या (Hanuman Jayanti) पार्श्वभूमीवर नवनीत राणा यांनी पुन्हा एकदा उद्धव ठाकरेंना टार्गेट केलंय.महाविकास आघाडी (Mahavikas Aghadi) सरकारच्या काळात हनुमान चालीसा पठनासाठी राणा दाम्पत्याने केलेलं आंदोलन, यासाठी भोगलेला १४ दिवसांचा वनवास या सगळ्याची आठवण करून देणारे मोठे होर्डिंग्स मुंबईत झळकलेत. विशेष म्हणजे नवनीत राणा यांचा या बॅनरवर हिंदू शेरनी असा उल्लेख करण्यात आलाय. भगवी शाल पांघरलेला नवनीत राणा यांचा हा फोटो अधिक लक्ष वेधून घेतोय.
कार्यक्रम अमरावतीचा, मुंबईत बॅनरबाजी
खासदार नवनीत राणा आणि आमदार रवी राणा यांच्यातर्फे अमरावतीत येत्या हनुमान जयंतीनिमित्त भव्य कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलंय. ६ एप्रिल रोजी अमरावतीत सामूहिक हनुमान चालीसा पठण करण्यात येणार आहे. या कार्यक्रमाचे होर्डिंग्स मुंबईत झळकवण्यात आलेत. त्यामुळे उद्धव ठाकरे यांना डिवचण्यासाठीच हा प्रकार दिसून येतोय. नवनीत राणा यांचा शेरनी असा उल्लेख जास्त चर्चेचा विषय ठरतोय. महाविकास आघाडी सरकारच्या काळात नवनीत राणा यांनी केलेलं आंदोलन यानिमित्ताने पुन्हा एकदा चर्चेत आलंय.
हिंदुत्व हाच श्वास, धर्मरक्षणाची आस…
नवनीत राणा यांच्या या बॅनर्सवर राणा दाम्पत्याने हनुमान चालिसा पठनामुळे महाविकास आघाडी सरकारच्या काळात भोगलेल्या १४ दिवसांच्या तुरुंगवासाचे फोटो लावण्यात आलेत. अमरावतीत उभ्या राहणाऱ्या भव्य हनुमान मूर्तीचा प्रस्तावित फोटो या बॅनरवर झळकवण्यात आलाय. तसेच हिंदुत्व हाच श्वास, धर्मरक्षणाची आस… असा स्पष्ट इशारा बॅनरच्या माध्यमातून देण्यात आलाय. हनुमान चालीसा पठन करणार म्हणून खोट्या राजद्रोहाच्या गुन्ह्याखाली १४ दिवसांचा तुरुंगवास भोगला, असा मजकूर या बॅनरवर लिहिण्यात आलाय. देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे, अमित शाह तसेच नरेंद्र मोदी यांचे फोटोही बॅनरवर झळकवण्यात आले आहेत.
111 फूट उंच भव्य मूर्ती उभारणार
हनुमान चालीसा पठनावरून चर्चेत आलेल्या राणा दाम्पत्याच्या पुढाकारातून अमरावतीत १११ फूट उंचीची हनुमानाची भव्य मूर्ती उभारली जाणार आहे. अमरावती शहरातील छत्री तलाव परिसरात हे मंदिर उभारलं जातंय. या सर्वोच्च मूर्तीचं काम सुरु करण्यात आलंय. तर येत्या ६ एप्रिल रोजी हनुमान जयंतीनिमित्त या मंदिराचं भूमीपूजन होणार आहे. यावेळी राणा दाम्पत्यातर्फे सामूहिक हनुमान चालिसा पठनाच्या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलंय. या कार्यक्रमाला भाजप आणि शिवसेनेचे दिग्गज नेते उपस्थित राहण्याची शक्यता आहे.