Navratri 2024 : पहिला दिवस देवीच्या चरणी, पहाटेपासूनच दर्शनासाठी रांगाच रांगा… शारदीय नवरात्रौत्सवाला सुरूवात
आज घटस्थापना, आजच्या दिवसापासून शारदीय नवरात्रोत्सवाला सुरूवात झाली आहे. नवरात्रोत्सवाच्या पहिल्याच दिवशी राज्यातील विविध मंदिरांमध्ये दर्शनासाठी भाविकांनी गर्दी केली आहे.
आज घटस्थापना, आजच्या दिवसापासून शारदीय नवरात्रोत्सवाला सुरूवात झाली आहे. नवरात्रोत्सवाच्या पहिल्याच दिवशी राज्यातील विविध मंदिरांमध्ये दर्शनासाठी भाविकांनी गर्दी केली आहे. नागपूर जिल्ह्यातील 700 वर्षे प्राचिन जगदंबा महालक्ष्मी मंदिर असो, विरारचे जीवदानी देवी मंदिर, चंद्रपूरचे ऐतिहासिक देवी महाकाली मंदिर, महाराष्ट्रातील जागृत देवस्थान असलेले कार्ला गडावरील आई एकविरा देवीचे देऊळ किंवा पुण्यातील चतुःशृंगी मंदिरात सर्वत्र नवरात्रीच्या उत्साह दिसत आहे. आज पहाटेपासूनच राज्यभरातील विविध मंदिरात देवीचे दर्शन घेण्यासाठी भाविकांची गर्दी झाली असून सगळीकडे आनंदाचे, उत्साहाचे वातावरण दिसत आहे.
कोराडी येथील 700 प्राचिन जगदंबा मंदिरात नवरात्रोस्तव
नागपूर जिल्ह्यातील 700 वर्षे प्राचिन जगदंबा महालक्ष्मी मंदिरात नवरात्रोत्सवाला सुरुवात झालीय. आज पहाटेपासूनंच भक्तांची दर्शनासाठी मोठी रांग लावलीय, आज पहिल्या दिवशी महालक्ष्मी जगदंबा मातेचं स्वयंभू दर्शनाची सोय करण्यात आलीय. नवरात्रोत्सवात विदर्भासह, मध्य प्रदेश आणि छत्तीसगडमधील भाविकही दर्शनासाठी येतात.
हजारो भाविक जीवदानी देवीच्या दर्शनाला
नवरात्रोत्सव च्या पहिल्याच दिवशी विरारच्या जीवदानी देवीच्या दर्शनासाठी हजारो भाविकांनी गर्दी केली आहे. लाखो भाविकभक्ताचे जीवदानी देवी हे श्रद्धास्थान आहे. नवराञोत्सवासाठी विरार चे जीवदानी देवी मंदिर संस्थान कडून येणाऱ्या भाविक भक्तांसाठी सर्व सोयी सुविधा करण्यात आल्या आहेत. 9 दिवस चालणाऱ्या या नवरात्रोत्सव मध्ये विरारचा जीवदानी डोंगर भाविक भक्तांनी फुलून गेलेला असतो.
विरारची जीवदानी देवी आहे. जीवदानी देवीचे मंदिर हे पांडव कालीन आहे. उंच अशा डोंगरावर वसलेली जीवदानी देवी लाखो भाविकांचे श्रद्धास्थान आहे. या नवरात्रोत्सव मध्ये पालघर जिल्ह्यासह ठाणे, मुंबई, रायगड, राज्य, परराज्यातील भाविक भक्त जीवदानी देवीच्या दर्शनासाठी येतात. आज नवरात्री चा पहिलाच दिवस असल्याने देवीचा गाभारा वेगवेगळ्या फुलांनी सजविला आहे, सकाळी 8 वाजता गाभाऱ्यात पहिली घटस्थापना झाली आहे. पहाटे पासूनच देवीच्या दर्शनासाठी भाविकांनी गर्दी केली आहे. येणाऱ्या भाविकांच्या सुरक्षेसाठी मंदिर संस्थान कडून पूर्ण परिसरात सीसीटीव्ही कॅमेरे, सुरक्षा रक्षक, पोलीस, तैनात केले असून, सर्व भाविकांना मोफत जेवण ही ठेवले आहे.
सप्तशृंगी गडावर खाजगी वाहनांना प्रवेश बंद
सप्तशृंगी गडावरती खाजगी वाहनांना प्रवेश बंदी करण्यात आली आहे या संदर्भातील जिल्हा प्रशासनांना आदेश काढले असून राज्य परिवहन महामंडळाच्या बसेस व्यतिरिक्त इतर सर्व खाजगी वाहनांना प्रवेश बंद असणार आहे… 3 ऑक्टोंबर ते 12 ऑक्टोंबर पर्यंत नवरात्र उत्सव असल्याने सकाळी सहा वाजल्यापासून सर्व खाजगी वाहनांना प्रवेश बंद असेल. नवरात्र उत्सवात भाविकांची गडावर मोठ्या प्रमाणात गर्दी होत असते. गडावरील रस्ता धोकादायक असल्याने आणि मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होत असल्याकारणाने खाजगी वाहनांना प्रवेश बंद करण्यात आला आहे.
नवरात्रीनिमित्त सजले चंद्रपूरचे ऐतिहासिक देवी महाकाली मंदिर
द्रपूरचे आराध्य दैवत असलेल्या देवी महाकालीच्या अश्विन नवरात्र उत्सवाला आज घटस्थापनेने उत्साहात प्रारंभ झाला आहे. नवरात्राच्या पहिल्याच दिवशी चांदागडच्या आईचे दर्शन घेण्यासाठी हजारोंच्या संख्येत भाविक मंदिरात पहाटे पासून दाखल झाले आहेत. आज सकाळ पासून हजारो भाविकांच्या उपस्थितीने मंदिर परिसर फुलुन गेला आहे. आज सकाळी देवीची विशेष पूजा करून घटस्थापना करण्यात आली. चौदाव्या शतकात गोंड राणी ‘हिरातनी’ आणि पंधराव्या शतकात राणी ‘हिराई’ ने बांधलेल्या या मंदिरात दर्शनासाठी महाराष्ट्र, मध्यप्रदेश, छत्तीसगड, तेलंगणा आणि आंध्रप्रदेश या पाच राज्यातील भाविक गर्दी करतात. पुढचे ९ दिवस देवीच्या दर्शनाला हजारो भक्त हजेरी लावतील.
कार्ला गडावरील एकविरा देवीच्या शारदीय नवरात्र उत्सवास सुरुवात
महाराष्ट्रातील जागृत देवस्थान असलेल्या कार्ला गडावरील आई एकविरा देवीचा शारदीय नवरात्र उत्सवाला आज पासून सुरुवात झाली. घटस्थापनेच्या दिवसापासून महानवमी होमापर्यत सर्व धार्मिक विधी परंपरेनुसार विधिवत होणार असून आज सकाळी 8 वाजता कार्ला गडावरील एकविरा देवीच्या मंदिरात घटस्थापना करण्यात आली. देवीचा यथोचित साजश्रृंगार देखील करण्यात आला. महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून भाविक भक्त कार्ला गड़ावर एकवीरा देवीच्या दर्शनासाठी गर्दी करत आहेत.
पुण्यातील चतुःशृंगी मंदिरात नवरात्रीचा उत्साह
पुण्यातील चतुःशृंगी मंदिरात नवरात्रीचा उत्साह पहायला मिळत असून सकाळपासूनूनच भाविकांनी दर्शनासाठी गर्दी केली आहे. पुण्याचे ग्रामदैवत म्हणून ही देवी ओळखली जाते. महिलांवरील अत्याचार कमी व्हावेत यासाठि शक्ती दे , असं साकडं महिलांनी देवीला घातलं आहे.
शारदीय नवरात्र महोत्सवासाठी तुळजाभवानी मंदिर प्रशासन सज्ज
नऊ दिवसांच्या घोरनिद्रेनंतर आई तुळजाभवानी पहाटे 2 वाजता सिंहासनावर विराजमान झाली आहे. आज विधिवत पूजा करून दुपारी 12 वाजता जिल्हाधिकारी डॉ .सचिन ओम्बासे यांच्या हस्ते घटस्थापना करून शारदीय नवरात्र महोत्सवाला सुरुवात होणार आहे. त्याच पार्श्वभूमीवर तुळजाभवानी मंदिर प्रशासनाने जय्यत तयारी केली आहे. राजे शहाजी महाद्वारावरती आकर्षक फुलांची सजावट करण्यात आली आहे.
सप्तशृंगी गडावर नवरात्र उत्सवास सुरूवात
नाशिकच्या सप्तशृंगी गडावर आज पासून नवरात्र उत्सवास सुरू झाला असून साडे तीन शक्ति पीठपैकी एक असलेल्या सप्तशृंगी देवी गडावर भाविकांनी पहाटेपासून दर्शनासाठी गर्दी केली आहे. पहिल्या दिवशी देवीला पूजा विधी करून साज शृंगार केला जात आहे .
नवरात्र उत्सवानिमित्त आकर्षक फुलांनी सजले विठ्ठल मंदिर
नवरात्र घटस्थापनेनिमित्त श्री विठ्ठल आणि रुक्मिणीमातेच्या मंदिराला विविध फुलांची आकर्षक सजावट करण्यात आली आहे. आज नवरात्र उत्सवाचा पहिला दिवस असल्याने पुणे येथील श्री विठ्ठल भक्त राम जांभुळकर यांच्या वतीने ही सजावट करण्यात आली आहे. श्री विठ्ठल आणि रुक्मिणीमातेचा गाभारा तसेच मंदिराच्या विविध भागांना दोन टन फुलांची सजावट करण्यात आली आहे.
माहूर गडावर रेणुका मातेच्या दर्शनासाठी भाविकांची अलोट गर्दी
नवरात्र उत्सवाला आज पासून सुरुवात झालीय.साडेतीन शक्ती पीठांपैकी एक पूर्ण पीठ असलेल्या नांदेड जिल्ह्यातील श्री रेणुका मातेच्या माहूर गडावर देखील नवरात्र उत्सवाला प्रारंभ झालाय. आज पहिली माळ असणार आहे.श्री रेणुका मातेची शासकीय महापूजा, त्यानंतर साडेनऊ वाजता घटस्थापना, घटस्थापने नंतर नवरात्र उत्सवा सुरुवात.मंदिर संस्थानकडून नऊ दिवस गडावर विविध धार्मिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.