नबाब भाई यांना फोन गेले का? संजय राऊत यांच्या ‘त्या’ आरोपावरून गिरीश महाजन यांचा हल्लाबोल
शिवसेना खासदार संजय राऊत यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंद यांच्यावर एक मोठा आरोप केला. मुख्यमंत्री कार्यालयामधून तुरुंगात असणाऱ्या अट्टल गुन्हेगारांना संपर्क केला जात आहे. डिलिंग केली जात आहे, असा आरोप केलाय. त्यावर मंत्री गिरीश महाजन यांनी थेट उत्तर दिलंय.
मुंबई : मुख्यमंत्री शिंदे यांच्या मंत्रालयातील कार्यालयातून तुरुंगातील अट्टल गुन्हेगारांना संपर्क केला जात आहे. त्यांच्याशी डिलिंग केली जात आहे असा खळबळजनक आरोप खासदार संजय राऊत यांनी केला. निवडणुकीआधी या गुन्हेगारांना जेलबाहेर आणण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. मुख्यमंत्री यांच्या कार्यालयात जे सुरू आहे ते लवकरच बाहेर काढेन. तुम्ही गृहमंत्री आहात त्यावर लक्ष द्या असा इशाराही त्यांनी दिला. राऊत यांच्या या आरोपांना राज्याचे वैद्यकीय उच्च व तंत्र शिक्षणमंत्री गिरीश महाजन यांनी थेट उत्तर दिलंय.
मुख्यमंत्री कार्यालय काही लोकांना जामीन देऊन तुरुंगातून बाहेर काढण्याचा प्रयत्न करत आहे. त्याचे पुरावे लवकरच देईन. गुन्हेगारांशी डिलिंग सुरू असून गृहमंत्री काय करत आहेत असा सवाल खासदार संजय राऊत यांनी केला.
तुरुंगातील गुन्हेगारांशी संवाद सुरू आहे. मुंबईपासून नाशिकच्या कैद्यांशी हा संवाद साधला जात आहे. तुरुंगातून मोबाईलचा वापर सुरू आहे. मुख्यमंत्री कार्यालयात अंडरवर्ल्डची टोळी बसली आहे असा आरोप राऊत यांनी केला होता.
संजय राऊत यांच्या या आरोपाला मंत्री गिरीश महाजन यांनी प्रत्युत्तर दिलंय. जेलमध्ये त्यांचेच लोक गेले आहेत. मुख्यमंत्री कार्यालयातून मोबाईलवर संपर्क केला जातो हे तुम्हाला तुमच्याच लोकांनी सांगितले का? की नबाब भाई यांना फोन करून ही माहिती घेतली असा पलटवार मंत्री महाजन यांनी केलाय.
भाजप आमदार नितेश राणे यांनी कोणते टिव्ट केले ते मी पहिले नाही. पण, त्यामुळे कोणाच्या भावना दुखावल्या असतील तर दिलगीरी व्यक्त केली पाहिजे. मात्र, उद्धवजी यांच्याकडून ‘कलंक’ असे बोलणे बरोबर नाही. सत्ता गेली म्हणून त्यांचा तोल जात आहे म्हणूनच ते बेताल वक्तव्य करत आहेत अशी टीकाही त्यांनी केली.