NCC ट्रेनिंगदरम्यान कॅडेट्सना बेदम मारहाणीचा व्हिडीओ व्हायरल, प्रकरण तापलं, राजकीय पक्षही आक्रमक
ठाण्यातील जोशी बेडेकर कॉलेमध्ये NCCच्या विद्यार्थ्यांना मारहाण प्रकरणाचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर राजकीय क्षेत्रातून आक्रमक प्रतिक्रिया उमटल्या आहेत.
ठाणे | 4 ऑगस्ट 2023 : शहरातील प्रसिद्ध अशा बांदोडकर आणि जोशी बेडेकर कॉलेजमध्ये NCC च्या विद्यार्थ्यांना बेदम मारहाण (NCC cadets beaten up) झाल्याचे प्रकरण भलतेच तापले आहे. या संदर्भातील एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल (video viral) झाल्यानंतर संतापाची लाट उसळली असून विविध राजकीय पक्ष आक्रमक झाले आहेत. या घटनेविरोधात सर्व राजकीय पक्ष एकवटले असून आज सकाळपासून कॉलेजबाहेर विविध राजकीय पक्षांचे आंदोलन सुरू आहे.
दरम्यान या मारहाण प्रकरणातील वरिष्ठ विद्यार्थ्याला निलंबित करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. मारहाणीचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर राजकीय क्षेत्रातून याबाबत आक्रमक प्रतिक्रिया उमटल्या यानंतर महाविद्यालय प्रशासनाने ही कारवाई केली आहे. मात्र केवळ विद्यार्थ्यावरच नव्हे तर कॉलेजच्या प्राचार्यांवरही याप्रकरणी गुन्हा दाखल करावा आणि कठोर कारवाई करावी अशी मागणी राजकीय संघटनांकडून करण्यात येत आहे.
सकाळपासूनच विविध राजकीय पक्ष कॉलेजबाहेर आंदोलन करत असून तेथे मोठ्या प्रमाणात पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. शिवसेना शिंदे गट आणि ठाकरे गटातील युवासेनेचे कार्यकर्ते महाविद्यालयाच्या गेट समोर घोषणाबाजी करत महाविद्यालय येथे निवेदन देण्यासाठी गेले होते. तसेच शिवसेना शिंदे गट युवा सेनेच्या वतीने काही तरूण टाळे ठोकण्यासाठी आले असता पोलिसांनी मज्जाव केला .
काय आहे नेमक प्रकरण ?
जोशी बेडेकर महाविद्यालयात NCC च्या विद्यार्थ्यांना बेदम मारहाण केली जात असल्याचा व्हिडीओ व्हायरल झाला. त्यामुळे विद्यार्थी व पालकांमध्ये एकच खळबळ माजली. जोशी बेडेकर कॉलेजच्या आवारात दोडकर,बेडेकर आणि पॉलिटेक्निक या तिन्ही विभागांच्या विद्यार्थ्यांना संयुक्तपणे एनसीसीचे ट्रेनिंग देण्यात येते. त्याचा एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे.
पावसामुळे आवारात पाणी साचले होते, रिमझिम पाऊसही पडत होता. त्या वातावरणातही कॅडेट्सना ट्रेनिंग देण्यात येत होते, ते पुश-अपस करत होते. मात्र ते व्यवस्थित जमत नसलेल्या विद्यार्थांना एक व्यक्ती काठीने बेदम मारहाण करत असल्याचे या व्हिडीओत दिसत आहे. दुसऱ्या एका विद्यार्थाने गुपचुपपणे हा व्हिडीओ रेकॉर्ड केला आणि तो बघता बघता व्हायरल झाला. त्यामुळे संतापाची लाट उसळली आहे. अशा प्रकारे देण्यात येणारी ही शिक्षा अमानवी असल्याचे मत व्यक्त होत असून विद्यार्थ्यांमध्येही दहशत पसरली आहे.
Shocking video of #NCC students being brutally beaten up by seniors in Bandodkar College in #Maharashtra‘s #Thane. pic.twitter.com/mbhweRTrUj
— Hate Detector ? (@HateDetectors) August 3, 2023
कॉलेजचं म्हणणं काय ?
हा व्हिडीओ व्हायरल होताच हे प्रकरण तापू लागले आणि कॉलेज प्रशासनाला खडबडून जाग आली. हे असले प्रकार आम्ही कोणीही खपवून घेणार नसल्याचे सांगत, विद्यार्थ्यांनी बिलकूल काळजी करू नये, असे सांगत शिक्षकांनी घाबरलेल्या विद्यार्थ्यांना दिलासा देण्याचा प्रयत्न केला आहे. .शिक्षक नसताना झालेला हा प्रकार असून त्या विद्यार्थ्यावर तात्काळ कारवाई करण्याची प्रक्रियाही सुरू करण्यात आली असल्याचे जोशी बेडेकर कॉलेजच्या प्राचार्या सुचित्रा नाईक यांनी स्पष्ट केले. तसेच यापुढे असले प्रकार घडू नयेत म्हणून एका कमिटीची स्थापना करण्यात येणार असल्याचेही त्यांनी नमूद केले.