NCP Ajit Pawar Cabinet Minister : अजितदादांच्या बंडावेळी मंत्रिपदाची शपथ घेणाऱ्या 8 मंत्र्यांपैकी यावेळी किती जणांना संधी? पाहा यादी
अजित पवार यांनी राष्ट्रवादीमधून बंड केल्यानंतर भाजपला पाठिंबा दिला होता, त्यावेळी त्यांच्यासोबत एकूण आठ नेत्यांनी मंत्रिपदाची शपथ घेतली होती, मात्र यावेळी त्यातील अनेकांचा पत्ता कट झाला आहे.
विधानसभा निवडणुकीमध्ये राज्यात महायुतीला स्पष्ट बहुमत मिळालं. लोकसभा निवडणुकीमध्ये महायुतीला मोठा धक्का बसला होता, मात्र या पराभवातून सावरत महायुतीने विधानसभा निवडणुकीत जोरदार पुनरागमन केलं. महाराष्ट्रातील दोन प्रमुख पक्ष शिवसेना आणि राष्ट्रवादीमध्ये पडलेल्या फुटीनंतर ही पहिलीच निवडणूक असल्यामुळे संपूर्ण राज्याचं या निवडणुकीच्या निकालाकडे लक्ष लागलं होतं. या निवडणुकीत महायुतीला स्पष्ट बहुमत मिळालं.
महायुतीचे राज्यात तब्बल 231 आमदार निवडून आले. भाजप 131 आमदारांसह सर्वात मोठा पक्ष ठरला तर शिवसेना शिंदे गटाला 57 आणि राष्ट्रवादी अजित पवार गटाला 41 जागा मिळाल्या. अजित पवार यांनी राष्ट्रवादीतून बंड केल्यानंतर राष्ट्रवादीत दोन गट पडले. राष्ट्रवादी शरद पवार गट आणि राष्ट्रवादी अजित पवार गट. दरम्यान राष्ट्रवादीत पडलेल्या फुटीनंतर लोकसभा निवडणुकीत अजित पवार यांना मोठा धक्का बसला होता. त्यामुळे विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या किती जागा येणार, याकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागलं होतं. मात्र विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी अजित पवार गटाला मोठं यश मिळालं 41 मतदारसंघात त्यांचे उमेदवार विजयी झाले तर दुसरीकडे शरद पवार गटाला मोठा धक्का बसला. राष्ट्रवादी शरद पवार गटाचे केवळ 10 च आमदार निवडून आले.
दरम्यान अजित पवार यांनी जेव्हा राष्ट्रवादीतून बंड केलं होतं तेव्हा त्यांना अनेक आमदारांनी पाठिंबा दिला होता. तसेच अजित पवार यांनी जेव्हा राज्यातील महायुती सरकारला पाठिंबा देऊन उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली तेव्हा त्यांच्यासोबत 8 जणांनी मंत्रिपदाची शपथ घेतली होती. मात्र यावेळी त्यातील अनेक जणांचा पत्ता कट झाला आहे. त्यांच्या ऐवजी नव्या चेहऱ्यांना संधी मिळाली आहे.
कोणाची संधी हुकली?
अजित पवार यांनी जेव्हा बंड केलं तेव्हा त्यांच्यासोबत छगन भुजबळ, धनंजय मुंडे, दिलीप वळसे पाटील, हसन मुश्रीफ, धर्मरावबाबा आत्राम, आदिती तटकरे, संजय बनसोडे आणि अनिल पटेल यांनी मंत्रिपदाची शपथ घेतली होती. मात्र यावेळी यातील छगन भुजबळ, दिलीप वळसे पाटील,धर्मरावबाबा आत्राम, संजय बनसोडे आणि अनिल पाटील यांचा पत्ता कट झाला आहे. तर धनंजय मुंडे, हसन मुश्रीफ,आदिती तटकरे यांना पुन्हा एकदा संधी मिळाली आहे.