ग्रामपंचायत निवडणुकीच्या निकालाची धामधूम, अजित पवारांची प्रतिक्रिया
महाविकासआघाडीच्या गटाला चांगला प्रतिसाद मिळाला आहे, असे अजित पवार म्हणाले. (Ajit Pawar Comment on Gram Panchayat Election Results)
बारामती : ग्रामपंचायत निवडणुकीतही राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी भाजपचे नेते राम शिंदे यांना मोठा धक्का दिला आहे. राम शिंदे यांच्या चौंडी गावातील ग्रामपंचायत निवडणुकीत रोहित पवार गटाचा विजय झाला आहे. नुकतंच उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना याबाबतची प्रतिक्रिया दिली आहे. विधानपरिषदेच्या निवडणुकीनंतर ग्रामपंचायत निवडणुकांमध्येही महाविकासआघाडीच्या गटाला चांगला प्रतिसाद मिळाला आहे, असे अजित पवार म्हणाले. (Ajit Pawar Comment on Gram Panchayat Election Results)
“काही दिवसांपूर्वी विधानपरिषदेच्या निवडणुका पार पडल्या. यात महाविकासआघाडीला चांगले यश मिळाले होते. त्यानंतर आता ग्रामपंचायत निवडणुकांमध्ये महाविकासआघाडीच्या गटाला चांगला प्रतिसाद मिळताना दिसत आहे. भाजपाचे माजी मंत्री राम शिंदे यांच्या गटाचा देखील पराभव झाला आहे. तर या ठिकाणी कर्जत जामखेड आमदार रोहित पवार यांच्या गटाचा विजय होताना दिसत आहे,” अशी प्रतिक्रिया अजित पवारांनी दिली
राम शिंदेंच्या गावातही रोहित पवारांचा विजय
2019 च्या विधानसभा निवडणुकीत कर्जत जामखेड मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेसकडून रोहित पवार यांना उमेदवारी देण्यात आली. त्यावेळी रोहित पवार यांनी राम शिंदे यांना मोठा धक्का देत विजय मिळवला होता. त्यानंतर कर्जत-जामखेड मतदारसंघात रोहित पवार यांनी मोठं लक्ष घातलं होतं.
चौंडी ग्रामपंचायतीतील 9 पैकी 7 जागांवर रोहित पवार यांच्या गटानं विजय मिळवला आहे. तर राम शिंदे यांच्या गटाला 2 जागा राखण्यात यश मिळालं आहे. त्यामुळेचं राम शिंदे यांच्या गावातही रोहित पवार यांच्या गटाचा विजय झाला आहे.
सर्व नेते एकत्र बसून मार्ग काढू – अजित पवार
“सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांच्या बाबतीत पोलिसांनी चौकशी करावी. याबाबत आमचे नेते शरद पवार हेच अंतिम निर्णय घेतील,” असेही अजित पवार म्हणाले.
“औरंगाबादच्या नामतंरावरून काँग्रेस आणि शिवसेना यांच्यामध्ये वाद सुरू आहे. याबाबतीत प्रत्येकाचे मत वेगवेगळे असते. अशावेळी महाविकास आघाडीचे सर्व नेते एकत्र बसून मार्ग काढू. तसेच दिल्लीच्या आंदोलनाबाबत आमचा तेथील शेतकऱ्यांना पाठिंबा आहे. पण फक्त मुंबईत गर्दी करण्यापेक्षा वेगवेगळ्या जिल्ह्यात आंदोलन करून ते दिल्ली पर्यंत पोहोचले तर योग्य होईल,” असेही अजित पवार म्हणाले. (Ajit Pawar Comment on Gram Panchayat Election Results)
संबंधित बातम्या :