उजनीचं पाणी मराठवाड्याला देण्यास काँग्रेस आणि राष्ट्रवादीचा विरोध
नवीद पठाण, टीव्ही 9 मराठी, पुणे : दुष्काळाने होरपळत असलेल्या मराठवाड्याला पाणी देण्यास उत्तर महाराष्ट्रानंतर आता पश्चिम महाराष्ट्रातूनही विरोध आहे. उजनी धरणातून जायकवाडी धरणात पाणी सोडण्यासाठी काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांकडून विरोध करण्यात आलाय. यासाठी आज इंदापूर तालुका राष्ट्रवादीच्या वतीने पळसदेव येथे आमदार दत्तात्रय भरणे यांच्या मार्गदर्शनाखाली जाहीर निषेध सभा घेण्यात आली. निषेध सभा घेऊन मराठवाड्यासाठी […]
नवीद पठाण, टीव्ही 9 मराठी, पुणे : दुष्काळाने होरपळत असलेल्या मराठवाड्याला पाणी देण्यास उत्तर महाराष्ट्रानंतर आता पश्चिम महाराष्ट्रातूनही विरोध आहे. उजनी धरणातून जायकवाडी धरणात पाणी सोडण्यासाठी काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांकडून विरोध करण्यात आलाय. यासाठी आज इंदापूर तालुका राष्ट्रवादीच्या वतीने पळसदेव येथे आमदार दत्तात्रय भरणे यांच्या मार्गदर्शनाखाली जाहीर निषेध सभा घेण्यात आली.
निषेध सभा घेऊन मराठवाड्यासाठी पाणी सोडण्याला विरोध दर्शवण्यात आला. उजनीच्या जलाशयात कृष्णेचे पाणी येत नाही, तोपर्यंत उजनीचे पाणी सिना नदीत सोडू देणार नाही, अशी भूमीका राष्ट्रवादीच्या वतीने घेण्यात आली. लवकरच या पाण्याच्या वाटपाबाबत न्यायालयात धाव घेणार असल्याचं आमदार भरणे यांनी सांगितलं.
उजनीतून मराठवाड्याला बोगद्यातून पाणी देण्यासाठी काँग्रेसचे नेते हर्षवर्धन पाटील यांनी याअगोदरच विरोध केलेला आहे. कृष्णा-भीमा नदीजोड प्रकल्पाअंतर्गत मराठवाड्याला पाणी सोडलं जाणार आहे. सध्या या प्रकल्पाचं काम चालू आहे. एक वर्षभरात हा प्रकल्प पूर्ण होण्याचा अंदाज आहे.
नीरा-भीमा नदी स्थिरीकरण जोड प्रकल्पाचा मुख्य हेतू नीरा नदीतून येणारे पाणी उजनी धरणात वळवून उस्मानाबाद, सोलापूर यासह पुणे जिल्ह्यातील शेतीला आणि लोकांना या पाण्याचा त्याचा उपयोग करून देण्यात येणार आहे. 2012 मध्ये कामाला सुरुवात करण्यात आली होती, मात्र सरकारकडून निधी मिळत नसल्याने मध्यंतरी दोन वर्षे काम बंद होतं. फडणवीस सरकारने या प्रकल्पाचं काम युद्धपातळीवर सुरु केलं आहे.
नदी जोड प्रकल्पाच्या अंतर्गत एका खोऱ्यातून दुसऱ्या खोऱ्यात पाणी नेण्यासाठी नदी जोड प्रकल्पाची संकल्पना अंमलात आणली. त्या अंतर्गत आता नीरा आणि भीमा या दोन नद्या एकमेकांना जोडण्याचे काम जोरात चालू आहे. पावसाचे पाणी पावसाळ्यात नदीतून वाया जाते. हे अतिरिक्त पाणी या नदीजोड प्रकल्पामुळे एका खोऱ्यातून दुसऱ्या खोऱ्यात आणले जाणर आहे.
इंदापूर तालुक्यातील उद्धट येथून नीरा नदीतील पाणी जमिनीखालून 100 ते 150 फूट खोलीच्या बोगद्यातून उजनीच्या पाणलोट क्षेत्रात सोडले जाणार आहे. हे काम सध्या जोरात चालू आहे. नीरा नदीचे पाणी भीमा नदीत म्हणजेच उजनीच्या पाणलोट क्षेत्रात भादलवाडी येथे 24 किमीच्या बोगद्यातून आणले जाणार आहे. तर हेच पाणी पुढे करमाळा तालुक्यातील जेऊर येथून सिना कोळेगाव या धरणात 27 किमीच्या बोगद्यातून सोडले जाणार आहे. उजनीच्या पूर्व बाजूच्या 21 किमीच्या बोगद्यातून सिना नदीत हे पाणी सोडले जाणार आहे. या पाण्याचा उपयोग उस्मानाबाद, बीड जिल्हातील सुमारे 34 हजार हेक्टर शेती सिंचनासाठी होणार आहे.
दरम्यान, केवळ निवडणुका डोळ्यासमोर ठेवून काँग्रेस आणि राष्ट्रवादी या प्रकल्पावरुन वादंग निर्माण करण्याच्या प्रयत्नात असल्याचं दिसतंय. आधी काँग्रेसचे नेते हर्षवर्धन पाटील यांनी या प्रकल्पाचं काम होऊ न देण्याचा इशारा दिला. त्या पाठोपाठ राष्ट्रवादीचे आमदार दत्ता भरणे यांनी आपण या प्रकल्पाचे काम होऊ देणार नसल्याचं सांगत निषेध सभा घेऊन मराठवाड्याला पाणी देण्याला विरोध दर्शवलाय.