नगरमध्ये राष्ट्रवादीचा मास्टरस्ट्रोक, संग्राम जगतापांना उमेदवारी जाहीर
मुंबई : अहमदनगरमधून लोकसभेसाठी भाजपच्या सुजय विखेंविरुद्ध संग्राम जगताप यांचं नाव निश्चित करण्यात आलंय. संग्राम जगताप हे राष्ट्रवादीचे नगर शहरमधून सध्याचे आमदार आहेत. शिवाय त्यांचे वडील अरुण जगताप हे राष्ट्रवादीचे विधानपरिषदेचे आमदार आहेत. संग्राम जगताप यांचे सासरे आणि नगरमधील किंगमेकर राजकारणी म्हणून ओळख असलेले शिवाजी कर्डिले हे भाजपचे आमदार आहेत. राष्ट्रवादीचा मास्टरस्ट्रोक विधानसभेचे विद्यमान आमदार […]
मुंबई : अहमदनगरमधून लोकसभेसाठी भाजपच्या सुजय विखेंविरुद्ध संग्राम जगताप यांचं नाव निश्चित करण्यात आलंय. संग्राम जगताप हे राष्ट्रवादीचे नगर शहरमधून सध्याचे आमदार आहेत. शिवाय त्यांचे वडील अरुण जगताप हे राष्ट्रवादीचे विधानपरिषदेचे आमदार आहेत. संग्राम जगताप यांचे सासरे आणि नगरमधील किंगमेकर राजकारणी म्हणून ओळख असलेले शिवाजी कर्डिले हे भाजपचे आमदार आहेत.
राष्ट्रवादीचा मास्टरस्ट्रोक
विधानसभेचे विद्यमान आमदार संग्राम जगताप यांना लोकसभेचं तिकीट देऊन राष्ट्रवादी काँग्रेस नगरमध्ये मास्टरस्ट्रोक मारण्याच्या तयारीत आहे. संग्राम जगताप हा नगरमधील तरुण चेहरा आहे. त्यांच्या मागे तरुण कार्यकर्त्यांची मोठी फळी आहे. महत्त्वाचं म्हणजे नगरचं राजकारण ज्यांच्याभोवती फिरतं ते भाजप आमदार शिवाजी कर्डिले हे संग्राम जगताप यांचे सासरे आहेत. महानगरपालिकेत संग्राम जगताप यांनी सासरे शिवाजी कर्डिलेंच्या भाजपला मदत केली होती. त्याची परतफेड शिवाजी कर्डिले करु शकतात.
संग्राम जगताप यांना उमेदवारी दिल्यामुळे नगरमध्ये सुजय विखे विरुद्ध संग्राम जगताप असा दोन तरुणांचा सामना होईल. अशावेळी शिवाजी कर्डिले हे लेकीच्या नवऱ्याला मदत करणार की काँग्रेसमधून नुकतेच भाजपमध्ये आलेल्या सुजय विखेंना मदत करणार असा प्रश्न आहे. दुसरीकडे राष्ट्रवादीचे माजी खासदार यशवंत गडाख यांचे सुपुत्र प्रशांत गडाख यांचं आणि विखे घराण्याचं वैर आहे. त्यामुळे त्यांचीही ताकद संग्राम जगतापांच्या मागे उभी राहू शकते.
संग्राम जगताप यांनी नगरच्या महापालिका निवडणुकीत भाजपला मदत केली होती. भाजपला मदत केल्यामुळे राष्ट्रवादीने नगरसेवकांचं निलंबन केलं होतं, तर संग्राम जगताप यांनाही जाब विचारला होता. पण यानंतरही संग्राम जगताप यांनाच उमेदवारी देण्यात आली आहे.