“मला मंत्रिपद कोणी नाकारलं, शोध घेणारच”, छगन भुजबळ कडाडले
राज्य मंत्रिमंडळाच्या विस्तारात छगन भुजबळ यांना वगळण्यात आल्याने त्यांनी जाहीर नाराजी व्यक्त केली आहे. आता नुकतंच छगन भुजबळ यांनी कार्यकर्त्यांना मोठे आवाहन केले आहे.
Chaggan Bhujbal On Ministerial Post : महाराष्ट्र सध्या राजकीय घडामोडी वेगाने घडत आहेत. दोन दिवसांपूर्वी राज्यातील महायुती सरकारमधील मंत्रिमंडळाचा विस्तार पार पडला. यावेळी महायुतीच्या 39 मंत्र्यांनी शपथ घेतली. यात 33 कॅबिनेट मंत्री तर 6 राज्य मंत्र्यांचा समावेश आहे. यात भाजपचे 19 मंत्री, शिवसेनेचे 11 आणि राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या 9 मंत्र्यांचा समावेश आहे. महायुतीच्या पहिल्या मंत्रिमंडळ विस्तारात अनेक नवीन चेहऱ्यांना संधी देण्यात आली आहे. तर काही वरिष्ठ आणि ज्येष्ठ नेत्यांना वगळण्यात आले आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ हे नाराज झाले आहेत. राज्य मंत्रिमंडळाच्या विस्तारात छगन भुजबळ यांना वगळण्यात आल्याने त्यांनी जाहीर नाराजी व्यक्त केली आहे. आता नुकतंच छगन भुजबळ यांनी कार्यकर्त्यांना मोठे आवाहन केले आहे.
मला मंत्रिपद कोणी नाकारलं, हेच शोधण्याचा प्रयत्न सुरु
“राज्यातील सर्व कार्यकर्त्यांशी चर्चा करुन मी पुढचा विचार करेन. लोकशाहीत तुम्हाला व्यक्त करण्याचा अधिकार आहे. कुठेही वातावरण बिघडू नका मी सांगितले. मला मंत्रिपद कोणी नाकारलं, हेच शोधण्याचा प्रयत्न सुरु आहे. कोणी नाकारलं हे शोधावं लागेल. प्रत्येक पक्षाचा निर्णय पक्षाचा प्रमुख घेत असतो. जसे भाजपचा निर्णय देवेंद्र फडणवीस घेतात, शिवसेनेचा निर्णय एकनाथ शिंदे घेतात. त्याप्रमाणे आमच्या गटाचा निर्णय अजित पवार घेतात”, असे छगन भुजबळ यांनी म्हटले.
“प्रत्येकाला मंत्रिपद हवं असते”
“प्रत्येकाला मंत्रिपद हवं असते. प्रश्न मंत्रिपदाचा नाही, ज्याप्रकारे अवहेलना करण्यात आली, त्याचा आहे. मला त्यांनीच लोकसभेत उभे राहा असे सांगितलं होतं. केंद्रीय मंत्री अमित शाह यांनी सांगितले. सगळी तयारी झाली. सर्व लोक आले. जर त्यांना मला उभं करायचं होतं, तर मग त्यांनी नाव जाहीर करायला हवं होतं. आठ दिवस झाले, पंधरा दिवस झाले तरी अद्याप माझे नाव जाहीर झाले नाही. त्यासाठी त्यांनी एक महिना लावला. मग मीच म्हटलं मी माघार घेतो. कारण अशाप्रकारे आस लावून बसणं योग्य नाही”, असे छगन भुजबळ म्हणाले.
फडणवीसांनी मी मंत्रिमंडळात असावे, यासाठी आग्रह धरला होता
“मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मी मंत्रिमंडळात असावे, यासाठी आग्रह धरला होता. हे मी स्वत: कन्फर्म करुन घेतले आहे. लोकसभेवर नाव जाहीर केले नाही. राज्यसभेची जागा आली. मी सांगितले मला जाऊ द्या, नाही दिली. दुसऱ्या जागेसाठी मकरंद पाटील यांचे बंधू नितीन पाटील यांना संधी दिली. मी ४० वर्षे इथे आहे. मला तेव्हा इथे राज्यात पक्षाला तुमची गरज आहे, तुम्ही लढायला पाहिजे. मी लढलो. आता सांगत आहे तुम्ही राज्यसभेवर जा, आता मकरंद पाटील यांना मंत्रीपद दिले. त्यांच्या भावाला राजीनामा देण्यासाठी सांगणार आहे”, असे छगन भुजबळ यांनी सांगितले.
“मी निवडणूक लढलो आणि जिंकलो. ती जिंकण्यासाठी माझ्या कार्यकर्त्यांनी जीवाचे रान केले. मी त्यांना काय सांगू. त्यामुळे मी आता विधानसभेचा राजीनामा देऊ शकत नाही. राज्यसभेवर जायचं असेल तर मला विधानसभेचा राजीनामा द्यावा लागेल. मी त्यांना दोन वर्षांनी जातो असं म्हटलं. तोपर्यंत मी मतदारसंघातले जे काही प्रश्न असतील ते सोडवतो. त्यानंतर त्यांनी चर्चा करु असं म्हटले होते. पण ते चर्चेसाठी बसलेच नाही. मला अजित पवार किंवा प्रफुल्ल पटेल यांनी कोणीही फोन केला नाही. मी यांच्या हातातले खेळणे नाही. मी जर राजीनामा दिला तर माझ्या मतदारसंघातील लोकांना काय वाटेल”, असे छगन भुजबळ यांनी म्हटले.