ट्रकभर पुराव्यात नाव नव्हतं, तरीही उपमुख्यमंत्री, गृहमंत्रिपदाचा राजीनामा दिला, छगन भुजबळांचं विधान; सूचक सल्ला की आणखी काही…?
छगन भुजबळ यांची पुण्यात आज प्रकट मुलाखत पार पडली. जाधव इंस्टिट्यूटमध्ये सुरू असलेल्या युवा संसद कार्यक्रमात मुलाखतीदरम्यान बोलताना छगन भुजबळांनी अनेक मुद्द्यांवर भाष्य केले.

तेलगी बनावट स्टॅम्प घोटाळा प्रकरण कायमच विविध कारणांनी चर्चेत असते. या प्रकरणामुळे राष्ट्रवादीचे तत्कालीन उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री छगन भुजबळ यांना राजीनामा द्यावा लागला होता. आता तब्बल 21 वर्षांनी छगन भुजबळ यांनी तेलगी घोटाळाप्रकरणी शरद पवारांवर निशाणा साधला. छगन भुजबळ यांची पुण्यात आज प्रकट मुलाखत पार पडली. जाधव इंस्टिट्यूटमध्ये सुरू असलेल्या युवा संसद कार्यक्रमात मुलाखतीदरम्यान बोलताना छगन भुजबळांनी अनेक मुद्द्यांवर भाष्य केले.
“…त्यात छगन भुजबळ हे नाव कुठेही नव्हतं”
या मुलाखतीत छगन भुजबळांना तेलगी घोटाळ्याप्रकरणी प्रश्न विचारण्यात आला. त्यावर त्यांनी माझी काहीच चूक नसताना माझा राजीनामा घेण्यात आला, असा मोठा दावा छगन भुजबळ यांनी केला. “तेलगी प्रकरण दोन-तीन राज्यात होतं, त्यामुळे मी सुप्रीम कोर्टात गेलो. हे प्रकरण सीबीआयकडे घ्या अशी मी मागणी केली. ट्रकभर कागद आणले. त्यात छगन भुजबळ हे नाव कुठेही नव्हतं. ज्या प्रकरणी माझं नाव सीबीआयनेही घेतलं नाही”, असे छगन भुजबळ म्हणाले.
साहेब राजीनामा घेण्याची घाई तुम्ही केली…
“उपमुख्यमंत्री म्हणून मला राजीनामा द्यावा लागला. गृहमंत्रिपदाचाही राजीनामा द्यावा लागला. त्यावेळी माथ्यावर हा तेलगी प्रकरणातील आहे, असा शिक्का बसला होता. मला शरद पवारांना सांगायचं आहे की साहेब राजीनामा घेण्याची घाई तुम्ही केली. तुम्ही आता जे सांगता की पुढे काय होणार. ते राजकारण होतं. त्यावेळी तर तसं काही नव्हतं ना”, असा सवाल छगन भुजबळांनी केला.
मी गोरगरिबांसाठी भांडू शकणार आहे का?
यानंतर छगन भुजबळांना तुम्हाला राज्यपाल बनवण्यात येणार असल्याबद्दल विचारणा करण्यात आली. त्यावर त्यांनी फारच थेट भाषेत उत्तर दिले. “राज्यपाल बनवणं म्हणजे माझ्या तोंडाला कुलूप लावण्याचा प्रकार आहे. राज्यपाल होऊन मी काय करु. माझं काम आहे की मी गोरगरिबांसाठी भांडणं. राज्यपाल झाल्यानंतर मी गोरगरिबांसाठी भांडू शकणार आहे का, बोलू शकणार आहे का?” असा सवाल छगन भुजबळांनी केला.
“मी जसा मोकळा आहे तसा ठीक आहे”
“मी राज्यपाल पदाचा अपमान करु इच्छित नाही. ते मोठं पद आहे. नाहीतर परत मी राज्यपाल पदाचा अपमान केला असं म्हणतील. राज्यपाल पद घेतलं तर मी भटक्या, विमुक्तांचे आरक्षण आणि सरंक्षण मी करु शकणार नाही. त्यामुळे मी जसा मोकळा आहे तसा ठीक आहे”, असे छगन भुजबळ म्हणाले.