नेते कुठे गेले हे कळेना? मलिदा गॅंगला जागा दाखवू, शरद पवार यांचा नेमका टोला कुणाला?
कण्हेरी येथे प्रचाराचा नारळ फोडल्यानंतर अपयश येत नाही हा मला अनुभव आहे. त्यामुळेच या निवडणूकमध्ये विजयी होणार हे माझे मन पहिल्यापासून सांगत होते आणि माझ्या मनाचे खरे झाले. या निवडणुकीत दिल्लीपासून सर्व शक्ती पणाला लावली गेली.
लोकसभा निवडणुकीमध्ये बारामती मतदारसंघातून शरद पवार यांच्या कन्या सुप्रिया सुळे यांनी पुन्हा एकदा विजय मिळविला. या विजयानंतर राष्ट्रवादी शरद पवार गटाचे प्रमुख शरद पवार यांनी काटेवाडी गावी प्रथमच भेट दिली. काटेवाडी गावात शरद पवार यांचे मोठ्या उत्साहाने स्वागत करण्यात आले. यावेळी शरद पवार यांनी बालपणीच्या आठवणी सांगितल्या. त्याचप्रमाणे अजितदादा गटालाही मोठा इशारा दिला. बारामती तालुक्यात फिरत असताना नेते कुठे गेले हे कळेना असा खरमरीत टोलाही त्यांनी लगावला. आजचा दिवस माझ्या आयुष्यातील सर्वात आनंदाचा दिवस आहे. माझे चौथीपर्यंतचे शिक्षण काटेवाडी येथे झाले. शनिवारी आणि रविवारी आम्हांला सुट्टी असताना आमची आई गुरे, ढोरे चारण्यासाठी आम्हाला पाठवत असे ते म्हणाले.
आजपर्यंत जे काही सर्व विजय मिळाले त्याचे कारण म्हणजे कण्हेरी येथे आम्ही पहिला नारळ फोडायचो. कण्हेरी येथे प्रचाराचा नारळ फोडल्यानंतर अपयश येत नाही हा मला अनुभव आहे. त्यामुळेच या निवडणूकमध्ये विजयी होणार हे माझे मन पहिल्यापासून सांगत होते आणि माझ्या मनाचे खरे झाले. या निवडणुकीत दिल्लीपासून सर्व शक्ती पणाला लावली गेली. देशाचे पंतप्रधान 18 ठिकाणी प्रचार करण्यासाठी आले. पण, त्यातील 8 ते 9 ठिकाणी त्यांनी फक्त शरद पवार हेच नाव घेतले. निवडणूक झाली त्यामुळे आता पाठीमागच्या गोष्टी काढायच्या नाहीत. आता फक्त काम करायचे आहे असे शरद पवार यावेळी म्हणाले.
आपल्या देशात लोकशाही आहे. जगात अनेक ठिकाणी हुकूमशाही आहे ती इथे आणण्याचा प्रयत्न केला होता. परंतु, लोक शहाणे असल्याने त्यांनी हुकूमशाही येऊ दिली नाही. मतदान करण्यासाठी गेल्यानंतर लोकांचा निर्णय महत्वाचा असतो. समाजकारण हे लोकांचे हिताचे आहे याप्रकारे राजकारण करायचे आहे. सत्तेचा वापर सर्वसामान्य जनेतची कामे करण्यासाठी करायचा असतो ही शिकवण आम्हांला स्वर्गीय यशवंतराव चव्हाण यांनी दिली असे त्यांनी सांगितले.
बारामती तालुक्यात फिरत असताना नेते कुठे गेले हे कळेना असा टोला लगावून शरद पवार पुढे म्हणाले, कॉन्ट्रॅक्टर आणि मलिदा गॅंग बाजूला गेली असे कार्यकर्ते म्हणतात. पण, मलिदा गॅंगचा उद्योग असेल तर त्यांना त्यांची जागा दाखवली जाईल. छत्रपती कारखाना सुरू करण्यासाठी अनेक जणांचे योगदान होते. छत्रपती कारखान्यासंदर्भात कोण मार्गदर्शन करत आहे याच्या खोलात जावे लागेल. कारखान्याची निवडणूक ही संसाराची आहे त्यामुळे त्यामध्ये लक्ष घालावे लागेल. लोक निवडून आणावे लागतील त्यामुळे काही गोष्टींकडे अधिक लक्ष द्यावे लागेल, असा सूचक इशारही त्यांनी यावेळी दिला.