Nagpur Lockdown | नागपूरचे पालकमंत्री नितीन राऊत एकतर्फी निर्णय घेतात, राष्ट्रवादीची टीका
नागपुरात वाढत्या कोरोनाचा प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर पुढील दोन दिवस लॉकडाऊन करण्यात आला आहे. (NCP Oppose Nagpur Lockdown)

नागपूर : राज्यात ठिकठिकाणी लॉकडाऊन करण्यात येत आहे. नागपुरात वाढत्या कोरोनाचा प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर पुढील दोन दिवस लॉकडाऊन करण्यात आला आहे. मात्र या लॉकडाऊनला राष्ट्रवादी काँग्रेसकडून विरोध दर्शवण्यात येत आहे. लॉकडाऊन लावताना लोकप्रतिनिधींना विश्वासात घेण्यात आलेलं नाही, अशी प्रतिक्रिया नागपूरचे राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष अनिल अहिरकर यांनी दिली आहे. (NCP Oppose Nagpur Lockdown decision)
“नागपुरात लावण्यात आलेल्या लॉकडाऊनला राष्ट्रवादी काँग्रेसने विरोध दर्शवला आहे. लॉकडाऊन लावताना लोकप्रतिनिधी यांना विश्वासात घेतले नाही. लोकप्रतिनिधींसोबत चर्चा केली असती तर अनेक पर्याय पुढं आले असते.ज्या प्रमाणे पुण्यात अजित पवार यांनी सर्व लोकप्रतिनिधींना सोबत घेऊन योग्य निर्णय घेतला. त्याचप्रमाणे नागपुरात अपेक्षित होते. मात्र, नागपूरचे पालकमंत्री नितीन राऊत हे एकतर्फी निर्णय घेतात,” असा थेट आरोप राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष अनिल अहिरकर यांनी केला आहे.
नागपुरात लॉकडाऊन
नागपुरात आज आणि उद्या म्हणजेच शनिवारी आणि रविवारी विकेंड लॉकडाऊन लावण्यात आला आहे. नागपुरात कोरोना रुग्णसंख्या वाढत असल्याने पुन्हा लॉकडाऊन करण्याची घोषणा करण्यात आली आहे. नागपूरमध्ये येत्या 15 मार्चपासून ते 21 मार्चपर्यंत कडक लॉकडाऊन असणार आहे. यावेळी मद्य विक्री बंद राहील. लसीकरण सुरू राहील. अत्यावश्यक सेवा सुरू राहील. तर डोळ्यांचे दवाखाने आणि चष्म्याचं दुकान सुरू राहील.
नागपुरातील लॉकडाऊनला भाजपचा विरोध
नागपुरातील लॉकडाऊनला भाजपकडून कडाडून विरोध करण्यात आला आहे. लॉकडाऊन म्हणजे लोकांना वेठीस धरण्याचा उद्योग आहे. लॉकडाऊन करुन काहीही साध्य होणार नाही, अशी भूमिका भाजपचे माजी महापौर संदीप जोशी यांनी मांडली होती.
संदीप जोशी गुरुवारी नागपुरात प्रसारमाध्यमांशी बोलत होते. यावेळी त्यांनी नागपूरचे पालकमंत्री नितीन राऊत यांच्यावर टीकास्त्र सोडले. 15 ते 21 मार्चपर्यंत लॉकडाऊन हा वेडेपणाचा निर्णय आहे. पालकमंत्र्यांनी हेकेखोरपणाने हा निर्णय घेतला आहे. या लॉकडाऊनमुळे कोरोना रुग्णांची संख्या कमी होणार नाही. त्याऐवजी दंडवसुली वाढवून नियम मोडणाऱ्यांवर कारवाई करता आली असती, असे संदीप जोशी यांनी म्हटले.
एकीकडे भाजपकडून याला विरोध होत आहे. व्यापारी सुद्धा लॉकडाऊन नको, पर्याय शोधा, अशी मागणी करत आहेत. तर, नागपूरच्या महापौरांनी लॉकडाऊनसंदर्भात विश्वासात न घेता निर्णय घेण्यावर नाराजी व्यक्त केली आहे. त्यामुळे लॉकडाऊनवरुन आता पालकमंत्री नितीन राऊत यांना घेरण्याची तयारी होत आहे. लॉकडाऊनवरुन राजकारण रंगण्याची शक्यता आहे. (NCP Oppose Nagpur Lockdown decision)
संबंधित बातम्या :
Nagpur Weekend Lockdown | नागपुरात शनिवार-रविवारी विकेंड लॉकडाऊन, नंतर 7 दिवसांचा कडक लॉकडाऊन