धक्के, तडाखे आणि तडे सुरूच… काँग्रेस सोडली, अशोक चव्हाणांच्या मेव्हुण्यांचा उद्या नवा पक्षप्रवेश; कोणत्या पक्षात जाणार?
उपमुख्यमंत्री अजित पवार प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे, सहकार मंत्री बाबासाहेब पाटील आणि माजी मंत्री नवाब मलिक नांदेड जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत. त्यांच्या उपस्थितीत काँग्रेसचे माजी खासदार भास्करराव पाटील खतगावकर, माजी आमदार ओमप्रकाश पोखरना, मीनल खतगावकर राष्ट्रवादीत प्रवेश करणार आहेत. नांदेडच्या नरसी येथे पक्षप्रवेश सोहळा पार पडणार आहे.

राज्यात महायुतीचं सरकार आल्यापासून महाविकास आघाडीतील काँग्रेस, शरद पवार गट आणि ठाकरे गटाला तडाखे बसायचं काही थांबलेलं नाही. या तिन्ही राजकीय पक्षांना दर चार दिवसाने राजकीय भूकंपाचा सामना करावा लागत आहे. आता त्यात आणखी एक भर पडली आहे. माजी मुख्यमंत्री आणि भाजप नेते अशोक चव्हाण यांच्यानंतर आता त्यांचे मेव्हुणे भास्करराव पाटील खतगावकर यांनी काँग्रेसला झटका दिला आहे. खतगावकर यांनी काँग्रेसला सोडचिठ्ठी देत अजितदादा यांच्या पक्षात प्रवेश करण्याचा निर्णय घेतला आहे. उद्या त्यांचा अजितदादा गटात प्रवेश होणार आहे. त्यामुळे मराठवाड्यातील अजितदादा गटाचं बळ वाढण्यास मदत होणार असल्याची चर्ची आहे.
उपमुख्यमंत्री अजित पवार हे उद्या नांदेडच्या दौऱ्यावर येणार आहेत. त्यामुळे नांदेडच्या नरसी येथा उद्या भास्करराव पाटील खतगावकर हे राष्ट्रवादीत प्रवेश करणार आहेत. त्यांच्यासोबत त्यांची सून मीनल खतगावकर, माजी आमदार ओमप्रकाश पोखरना हे सुद्धा अजितदादा गटात प्रवेश करणार आहेत. खतगावकर यांना पक्षात घेऊन अजितदादांनी एकाच दगडात दोन पक्षी मारल्याचं सांगितलं जात आहे. खतगावकरांना सोबत घेऊन अजितदादांनी काँग्रेसला धक्का दिला आहे. तर मेव्हुण्यालाच गळाला लावून अशोक चव्हाण यांनाही शह दिल्याचं बोललं जात आहे.
ना मान, ना सन्मान
राष्ट्रवादीचे आमदार प्रताप पाटील चिखलीकर यांच्या माध्यमातून खतगावकर यांचा पक्षप्रवेश होणार आहे. काँग्रेसमध्ये मानसन्मान मिळत नाही. त्यामुळेच पक्षांतर करत असल्याचं खतगावकर यांनी म्हटलं आहे. विधानसभा निवडणुकीत क्रॉस वोटिंग केल्याचा चव्हाण कुटुंबीयावर आरोप. काँग्रेसचे खासदार रवींद्र चव्हाण यांच्यावर ठपका ठेवत भास्करराव पाटलांनी राष्ट्रवादीत प्रवेश करण्याचा निर्णय घेतला आहे.
शिंदे गटाची ऑफर होती
23 तारखेला नरसी येथे 15 ते 20 हजार लोकांसह अजित पवार यांच्या उपस्थिती पक्ष प्रवेश होणार आहे. माजी आमदार ओमप्रकाश पोखरना, माझ्या सुनबाई डॉ. मीनल खतगावकर यांच्यासह 300 सरपंच, चेअरमन जिल्हा परिषद सदस्य यांचा प्रवेश होणार आहे. मला शिंदे गटाची ऑफर होती. मात्र सेक्युलर विचाराचा पक्ष म्हणून मी राष्ट्रवादीत प्रवेश करत आहे. अजितदादा हार्डवर्कर नेते आहेत. महाराष्ट्रातील सगळ्या प्रश्नांची त्यांना जाण आहे, असंही खतगावकर यांनी सांगितलं.
म्हणून मतांचा फरक झाला
आपल्या भागातील विकासाचे प्रश्न सुटत नाहीत म्हणून बदल करावे लागतात. कार्यकर्त्यांना सन्मान मिळत नाही. नांदेड जिल्ह्यातील राहिलेले प्रश्न सोडवायचे आहेत. त्यासाठी मी निर्णय घेतल्याचंही त्यांनी सांगितलं. तसेच लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीतील मतदानात मोठी तफावत झाली. त्यामुळे कार्यकर्त्यांमध्ये नाराजी आहे. आमच्या मतात आणि त्यांच्या मतात 29 हजार मताचा फरक आहे, चव्हाण कुटुंबियांनी क्रॉस वोटिंग केलं म्हणून मताचा फरक झाला, असा आरोप त्यांनी केलाय.
ते संयुक्तिक वाटलं नाही
अशोकराव माझे नातेवाईक आहेत. मेव्हणे आहेत, वसंतराव चव्हाण यांचे भाऊ आनंदराव चव्हाण यांची मुलगी माझ्या घरात आहे. लोकसभा पोट निवडणुकीला बीजेपीकडून मीनल खतगावकर यांना उमेदवारी मिळाली असती, मात्र त्यांची मुलगी आमच्या घरात असल्यामुळे त्यांच्या मुलाचे विरोधात उमेदवारी देणं संयुक्तिक वाटलं नाही, असंही त्यांनी सांगितलं.
शह देण्यासाठी प्रवेश नाही
माझा पक्षप्रवेश कुणालाही शह नाही, माझा पक्षप्रवेश नांदेड जिल्ह्याचा विकास, बिलोली, देगलूर, नायगाव विकासासाठी आहे. स्थानिक स्वराज्य संस्थेत निवडणुकीत कार्यकर्त्यांना पाठबळ देता आलं पाहिजे. विकासाचे प्रश्न सोडवता आले पाहिजे हे माझे मुख्य ध्येय आहे, असं सांगतानाच पक्षप्रवेशावेळी अजितदादा यांच्यासह प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे, सहकार मंत्री बाबासाहेब पाटील, माजी मंत्री नवाब मलिक आणि प्रफुल पटेल सुद्धा येण्याची शक्यता त्यांनी वर्तवली आहे.