तो दिवा आम्ही तुरुंगात पाहिला; शरद पवार यांनी उडवली बावनकुळे यांची खिल्ली
राज्याचं एक वैशिष्ट्ये आहे. कुठे काही झालं तर त्याला जबाबदार शरद पवार आहे असं म्हटलं जातं. लातूरला भूकंप झाला तरी त्याला शरद पवारच जबाबदार आहेत अशी चर्चा त्याकाळी होती. तुम्हाला माहीत नसेल. पण तशी चर्चा होती. याबाबत सीनिअर लोकांना माहीत असेल, अशी मिश्किल टिप्पणी शरद पवार यांनी आज केली.
माजी केंद्रीय मंत्री शरद पवार यांनी काल केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यावर टीका केली होती. एका तडीपार व्यक्तीच्या हाती देशाचं संरक्षण आहे. त्यांच्याकडे देशाच्या गृहमंत्रीपदाची सूत्रे आहेत, असा हल्लाच शरद पवार यांनी चढवला होता. शरद पवार यांच्या या टीकेचा भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनुकळे यांनी समाचार घेतला होता. अमित शाह यांच्यावर टीका करणं म्हणजे सूर्याला दिवा दाखवण्याचा प्रकार आहे, असं बावनकुळे म्हणाले. त्यावर, तो दिवा आम्ही तुरुंगात पाहिला होता, अशा शब्दात शरद पवार यांनी बावनकुळे यांची खिल्ली उडवली आहे.
शरद पवार यांनी पत्रकार परिषद घेऊन मीडियाशी संवाद साधला. यावेळी त्यांनी विविध प्रश्नांची उत्तरे दिली. अमित शाह यांच्यावर टीका करणं म्हणजे सूर्याला दिवा दाखवण्याचा प्रकार असल्याची टीका चंद्रशेखर बावनकुळे यांनी केली आहे, असं शरद पवार यांना विचारण्यात आलं. त्यावर, तो दिवा आम्ही महाराष्ट्राच्या जेलमध्ये पाहिला होता, असा टोला शरद पवार यांनी लगावला.
बावनकुळे काय म्हणाले होते?
काँग्रेस आणि शरद पवार यांची विचारधारा सत्तेपासून पैसा आणि पैशापासून सत्ता निर्माण करणे अशी आहे. काँग्रेस आणि शरद पवार यांनी आयुष्यभर सत्तेपासून पैसा आणि पैश्यापासून सत्ता हेच राजकारण केलं आहे. त्यामुळे अमित शहांवर बोलणे, त्यांच्या व्यक्तीमत्त्वावर बोलणे म्हणजे सूर्याला दिवा दाखवण्या सारखे आहे, असं चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले होते.
पुन्हा सत्तेत येऊ आणि कन्फ्यूज झालेल्या जनतेची दिशाभूल करू असं त्यांना वाटत आहे. पण त्यांच्या खोटारडेपणातून जनता बाहेर निघाली आहे. मोदींचं सरकार आणायचं, मोदींना आणलेल्या योजना विदर्भासह राज्यात राबवायच्या आहेत. त्यामुळे डबल इंजीन सरकारचीच गरज पडणार आहे, असं चंद्रशेखर बावनकुळे यांनी म्हटलं आहे.
इथंच प्रश्न सुटला पाहिजे
यावेळी शरद पवार यांना तुम्ही आरक्षणासाठी पुढाकार घेणार का? असा सवाल करण्यात आला. त्यावर राज्य सरकार आणि राज्याचे प्रमुख या प्रश्नावर मार्ग काढत आहेत. असं असताना त्यांना हातभार लावणं हे सर्वात महत्त्वाचं आहे. दिल्लीत जाऊन काही होणार नाही. प्रश्न इथला आहे. इथचं सोडवला पाहिजे, असं शरद पवार म्हणाले.
आरक्षणाची मर्यादा 50 टक्क्यावर गेल्यावरच आरक्षणाचा प्रश्न सुटेल असं सांगितलं जात आहे. तुमचं काय मत आहे? असा सवाल शरद पवार यांना करण्यात आला. त्यावर, 50 टक्क्याच्यावर आरक्षणाची मर्यादा न्यावी, अशी आमच्या बैठकीत आमच्या लोकांनी सूचना केली आहे. पण हा राज्याचा प्रश्न आहे. संसदेतील लोकांनी हा मुद्दा मान्य केला पाहिजे. तरच त्यातून मार्ग निघेल. त्यावर अजून काही दिल्लीत चर्चा झालेली नाही, असंही त्यांनी स्पष्ट केलं.