छगन भुजबळ यांची नाराजी दूर करण्यासाठी तीन नेते मैदानात, भुजबळ ऐकणार की बंडावर ठाम राहणार?; आज राज्यात मोठ्या घडामोडी
छगन भुजबळ यांची नाराजी दूर करण्यासाठी हे तिन्ही नेते भेट घेणार आहेत. या भेटीची तारीख अद्याप निश्चित झालेली नहाी. मात्र ही भेट नाशिकमध्ये होणार असल्याची शक्यता वर्तवली जात आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ हे नाराज झाले आहेत. राज्य मंत्रिमंडळाच्या विस्तारात छगन भुजबळ यांना वगळण्यात आल्याने त्यांनी जाहीरपणे नाराजी व्यक्त केली. त्यातच आता छगन भुजबळांनी नागपुरातील हिवाळी अधिवेशनाला जाणार नाही, असा निर्णय घेतला आहे. यामुळे ते लवकरच बंड पुकारण्याच्या तयारीत आहेत. “जहाँ नहीं चैना वहा नहीं रहना”, असं सूचक वक्तव्य छगन भुजबळ यांनी केले आहे. आता छगन भुजबळांची नाराजी दूर करण्यासाठी राष्ट्रवादीकडून प्रयत्न केले जात आहेत.
छगन भुजबळांची नाराजी दूर करण्यासाठी तिन्हीही नेते भेटणार
मिळालेल्या माहितीनुसार, मंत्रिपद न मिळाल्यामुळे नाराज झालेल्या छगन भुजबळांची नाराजी दूर करण्याचे प्रयत्न सुरु झाले आहे. गेल्या दोन दिवसांपासून गैरहजर असलेले अजित पवार हे आज विधिमंडळात दाखल होणार आहेत. त्यानंतर आता राष्ट्रवादीच्या गोटातील हालचालींना वेग आला आहे. राष्ट्रवादी पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अजित पवार, प्रदेशाध्यक्ष सुनिल तटकरे, कार्याध्यक्ष प्रफुल्ल पटेल हे तिघे लवकरच छगन भुजबळांची भेट घेणार आहेत. छगन भुजबळ यांची नाराजी दूर करण्यासाठी हे तिन्ही नेते भेट घेणार आहेत. या भेटीची तारीख अद्याप निश्चित झालेली नहाी. मात्र ही भेट नाशिकमध्ये होणार असल्याची शक्यता वर्तवली जात आहे.
नाशिकमध्ये मोठा कार्यकर्ता मेळावा
तर दुसरीकडे आज छगन भुजबळांनी नाशिकमध्ये मोठा कार्यकर्ता मेळावा आयोजित केला आहे. या मेळाव्यादरम्यान ते मोठ्या प्रमाणात शक्ती प्रदर्शन करणार आहेत. मंत्री पदावरून डावलल्यामुळे छगन भुजबळ नाराज झाले आहेत. नाशिकमध्ये आज समता परिषदेची राज्यस्तरीय बैठक आयोजित करण्यात आली आहे. छगन भुजबळ यांच्या प्रमुख उपस्थितीत ही बैठक होणार आहे. या बैठकीत छगन भुजबळ काय भूमिका मांडतात याकडे सर्वांचेच लक्ष लागलं आहे.
भुजबळ समर्थक नाशिकमध्ये दाखल होण्यास सुरुवात
मंत्रिमंडळात स्थान आणि पक्षात सन्मान मिळत नसल्याने छगन भुजबळ नाराज आहेत. गेल्या दोन दिवसांपासून भुजबळांनी आक्रमक भूमिका घेत पक्ष नेतृत्वावर टीका केली आहे. त्यांची मनधरणी करण्याचे प्रयत्न राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे आणि प्रफुल्ल पटेल यांच्याकडून सुरु आहेत. छगन भुजबळ यांना डावलण्यात आल्यानंतर राज्यभरातील भुजबळ समर्थक आक्रमक झाले आहेत. आज नाशिकमध्ये होणाऱ्या समता परिषदेच्या बैठकीसाठी राज्यभरातील भुजबळ समर्थक दाखल होण्यास सुरुवात झाली आहे. हे सरकार जातीयवादी असल्याचा आरोप केला जात आहे. ओबीसींसाठी लढणाऱ्या नेत्याला डावललं जात असल्याची भावना भुजबळ समर्थकांकडून व्यक्त करण्यात आली आहे.
येवल्यातील भुजबळ समर्थक आक्रमक झाले आहेत. नाशिकमध्ये होणाऱ्या बैठकीसाठी येवल्यातून अनेक भुजबळ समर्थक रवाना झाले आहेत. छगन भुजबळांच्या समर्थनार्थ जोरदार घोषणाबाजी करत समर्थक नाशिकच्या दिशेने निघाले आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी आहे की अजित पवार, तटकरे आणि पटेल प्रायव्हेट लिमिटेड पार्टी आहे, असा प्रश्नही भुजबळ समर्थकांकडून विचारला जात आहे.