मोठ्या घडामोडींना वेग, अजित पवार दुपारी एकटेच दिल्लीला जाणार; काय घडणार महाराष्ट्राच्या राजकारणात?
Ajit Pawar Meeting With Amit Shah in Delhi : महाराष्ट्रात सध्या मोठ्या घडामोडींना वेग आला आहे. फडणवीसांच्या बंगल्यावर भाजपचे नेते पोहोचलेत. अजित पवार दुपारी एकटेच दिल्लीला जाणार आहेत. महाराष्ट्राच्या राजकारणात नेमकं काय घडणार? हे पाहणं आता महत्त्वाचं असणार आहे. वाचा सविस्तर बातमी...
महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकीचा निकाल लागून नऊ दिवस झाले आहेत. मात्र अद्यापपर्यंत नव्या सरकारचा शपथविधी झालेला नाही. अशातच आता आज महायुतीत हालचाली वाढल्या आहेत. देवेंद्र फडणवीस यांच्या ‘सागर’ या सरकारी निवासस्थानी भाजपचे नेते पोहोचले आहेत. तर अशातच राष्ट्रवादीचे नेते अजित पवार आज दुपारी दिल्ली जाणार आहेत. अजित पवार दिल्लीत जाऊन अमित शाह यांच्यासोबत महत्त्वाची बैठक होणार आहे, अशी माहिती खात्रीलायक सुत्रांनी दिली आहे. या भेटीत खातेवाटपावर चर्चा होण्याची दाट शक्यता आहे. मागच्या वर्षी जेव्हा अजित पवार महायुतीमध्ये सहभागी झाले तेव्हा त्यांना नऊ मंत्रिपदं दिली गेली होती. असं असताना आता अजित पवार गटाला किती मंत्रिपदं मिळणार? हे पाहणं महत्वाचं असणार आहे.
एकनाथ शिंदेंच्या सर्व बैठका रद्द
एकनाथ शिंदे यांच्या सर्व बैठका रद्द करण्यात आल्या आहेत. एकनाथ शिंदे यांनी आज शिवसेना आमदारांची बैठक बोलावली होती. पण आता ती रद्द झाली आहे. डॉक्टरांनी आरामाचा सल्ला दिल्यामुळे एकनाथ शिंदे यांच्या आज सर्व बैठका रद्द झाल्या आहेत. आज एकनाथ शिंदे ठाण्यातील घरी असणार आहेत.
फडणवीसांच्या घरी भाजप नेत्यांची बैठक
देवेंद्र फडणवीस यांचं सरकारी निवासस्थान असणाऱ्या ‘सागर’ बंगल्यावर भाजपचे महत्त्वाचे नेते पोहोचले आहेत. चंद्रकांत पाटील, राहुल नार्वेकर आणि गिरीश महाजन, माधुरी मिसाळ राजेंद्र राऊत आणि अनिल बोंडे हे नेते देवेंद्र फडणवीसांच्या ‘सागर’ बंगल्यावर पोहोचले आहेत. देवेंद्र फडणवीस यांच्या घरी भाजप नेत्याची महत्वाची बैठक होत आहे.
मुख्यमंत्रिपदाबाबत चर्चा
महायुतीच्या नव्या सरकारचा शपथविधी कधी होणार? आणि मुख्यमंत्री कोण असणार हे मात्र अद्यापपर्यंत गुलदस्त्यात आहे. एकनाथ शिंदे यांनी पत्रकार परिषद घेत नरेंद्र मोदी आणि अमित शाह ठरवतील त्यांना आमचा पाठिंबा असेल, असं जाहीर केलं. मात्र अद्यापपर्यंत राज्याचे मुख्यमंत्री कोण असणार? याबाबतची स्पष्टता आलेली नाही. देवेंद्र फडणवीस हे राज्याचे नवे मुख्यमंत्री असतील, तसंच दिल्लीत त्यांच्या नावावर शिक्कामोर्त झाल्याची माहिती आहे. मात्र याबाबतची अधिकृत घोषणा झालेली नाही.