ठाणे: मुंब्रा येथे मनसेच्या (mns) वाहतूक सेनेच्या कार्यालयावर झालेल्या दगडफेकीशी आमचा काहीही सबंध नाही. राष्ट्रवादी (ncp) हा पक्ष संविधानावर निष्ठा असणारा पक्ष आहे, आम्ही असे कृत्य करीत नाही, असे राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष आनंद परांजपे (Anand Paranjpe) यांनी स्पष्ट केले. मुंब्रा येथे मनसेच्या वाहतूक सेनेच्या कार्यालयावर काही समजाकंटकांनी दगडफेक केली. ही दगडफेक राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी केला असल्याचा आरोप करण्यात येत आहे. त्यानंतर आनंद परांजपे यांनी एका व्हिडीओ मेसेजद्वारे हा खुलासा केला आहे. तसेच कुणी अंगावर आलं तर त्यांना शिंगावर घ्यायला आम्ही सक्षम आहोत. तसेच कुणी चोप द्यायची भाषा करत असेल तर आम्हीही त्यांना दुप्पट चोप देऊ, असा इशाराही परांजपे यांनी दिला आहे. दरम्यान, मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची आज ठाण्यात सभा होत आहे, त्यामुळे राज ठाकरे आज काय बोलतात याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.
आम्ही आवाहन केलं होतं. आम्ही दगडफेक करत नाही. राष्ट्रवादीचा कोणताही कार्यकर्ता करत नाही, पण मनसे अंगावर आल्यावर शिंगावर घ्यायला राष्ट्रवादी सक्षम आहे. त्यामुळे १२ तारखेनंतर चोपून काढू अशा कुणी वल्गना करू नये. त्यांच्या चोपाला आम्ही डबल चोप देऊ शकतो, असा आनंद परांजपे यांनी दिला.
राष्ट्रवादीचा या दगडफेकीशी काहीही सबंध नाही. खरंतर त्या कार्यालयाच्या बाहेर सहा सीसीटीव्ही कॅमेरे राष्ट्रवादी काँग्रेसनेच बसविले आहेत. कारण, आम्हाला अपेक्षित होते की, कोणीतरी समाजकंटक आक्षेपार्ह कृत्य करेल आणि त्याचे आरोप राष्ट्रवादी काँग्रेसवर करण्यात येतील. या सीसीटीव्हीचा डीव्हीआर राष्ट्रवादीचे कार्यकर्ते रफिक शेख यांच्या घरामध्ये आहे. ज्यावेळीही दगडफेक झाली. त्यानंतर राष्ट्रवादीनेच सीसीटीव्ही फूटेज तत्काळ मुंब्रा पोलिसांना दिले. त्यानंतर आरोपींना अटक करण्यात आली. अटक असलेले तिन्ही आरोपी हे राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते नाहीत. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी ही डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या संविधानावर निष्ठा ठेवणारा पक्ष आहे. शिव-फुले-शाहू-आंबेडकरांच्या विचारधारेवर काम करणारा राष्ट्रवादी पक्ष असल्याने अशा चिल्लर गोष्टी आम्ही करीत नाही, असं परांजपे यांनी सांगितलं.
संबंधित बातम्या:
CCTV | सीसीटीव्ही लावल्यावरुन वाद, सोसायटी सदस्यांनी बापलेकाला केलेली मारहाणही सीसीटीव्हीत कैद
करारा जवाब मिलेगा; राज ठाकरेंच्या सभेपूर्वी ‘मनसे’तून जोरकस चढाई…!