त्याला ओळखतही नाही, अभियंत्याला अमानुषपणे मारहाण केल्याचा आरोप मंत्री जितेंद्र आव्हाडांनी फेटाळला
गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांच्या कार्यकर्त्यांनी (Jitendra Awhad comment on Assaulting a Person) आपल्याला घरातून उचलून नेऊन अमानुषपणे मारहाण केल्याचा आरोप ठाण्यातील सिव्हील इंजिनिअर तरुणाने केला आहे.
ठाणे : गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांच्या कार्यकर्त्यांनी (Jitendra Awhad comment on Assaulting a Person) आपल्याला घरातून उचलून नेऊन अमानुषपणे मारहाण केल्याचा आरोप ठाण्यातील सिव्हील इंजिनिअर तरुणाने केला आहे. फेसबुकवर आक्षेपार्ह कमेंट केल्याने या तरुणाला आव्हाड यांच्या कार्यकर्त्यांनी आणि सुरक्षा रक्षकांनी त्यांना घरात उचलून नेऊन मारहाण केल्याचा आरोप या तरुणाने केला आहे. यावेळी स्वत: जितेंद्र आव्हाडही त्याठिकाणी उपस्थित होते, असाही दावा त्या तरुणाने केला आहे. दरम्यान याप्रकरणी जितेंद्र आव्हाडांवर विरोधी पक्षांनी सडकून टीका केली. यावर नुकतंच जितेंद्र आव्हाड यांनी स्पष्टीकरण दिलं.
“ज्या तरुणाने त्याला माझ्या देखत आणि (Jitendra Awhad comment on Assaulting a Person) माझ्या माणसांनी मारहाण केली अशी तक्रार केली आहे, त्याला मी ओळखत ही नाही,” असा दावा जितेंद्र आव्हाड यांनी केला.
“हा अभियंता गेल्या 3 वर्षांपासून माझ्या विरोधात नाही नाही त्या पोस्ट करतो, असे माझे कार्यकर्ते मला अनेकदा सांगायचे. पण मी त्याकडे दुर्लक्ष केलं. मी सतत 24 तास माझ्या मतदारसंघात आणि सोलापूर जिल्ह्यात कामात व्यस्त आहे. एखाद्या अभियंत्याला मारहाण झाली हा प्रकार मला मीडियामार्फत कळाला,” असेही जितेंद्र आव्हाड म्हणाले.
नेमकं प्रकरण काय?
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 5 एप्रिल रोजी रात्री 9 वाजून 9 मिनिटांनी दिवे लावण्याचं आवाहन केलं होतं. मोदींच्या आवाहनानंतर जितेंद्र आव्हाड यांनी त्यावर सडकून टीका केली. त्यांच्या या प्रतिक्रियेनंतर या तरुणाने आव्हाडांबद्दल सोशल मीडियावर एक आक्षेपार्ह पोस्ट टाकली. याचा राग मनात धरुन जितेंद्र आव्हाड यांच्या सुरक्षारक्षकांनी बंगल्यावर नेवून त्यांच्यासमोर अमानुष मारहाण केली. यावेळी जितेंद्र आव्हाड हेही त्या ठिकाणी उपस्थित होते. त्यांनी मला ती पोस्ट डिलीट करायला लावली. त्यानंतर मी ही पोस्ट चुकून केली आहे, त्याबद्दल माफी मागतो असा व्हिडीओही माझ्याकडून रेकॉर्ड करुन घेतला, असा आरोप तरुणाने केला आहे. या प्रकरणी वर्तकनगर पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली.
एखाद्या व्यक्तीला मंत्र्यांच्या सुरक्षारक्षकाने, मंत्र्यांच्या घरी नेऊन, मंत्र्यांच्या उपस्थितीत बेदम मारहाण करणे, ही अतिशय गंभीर घटना आहे. मुख्यमंत्री मा. उद्धवजी ठाकरे यांनी मंत्री जितेंद्र आव्हाड याना मंत्रिमंडळातून तत्काळ बडतर्फ करावे. @CMOMaharashtra
— Devendra Fadnavis (@Dev_Fadnavis) April 7, 2020
मंत्री मंडळातून बडतर्फ करा, फडणवीसांची मागणी
याप्रकरणी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, प्रवीण दरेकर यांनी जितेंद्र आव्हाडांवर सडकून टीका केली. या घटनेचा देवेंद्र फडणवीस यांनी निषेध केला. तसेच जितेंद्र आव्हाडांना मंत्री मंडळातून बडतर्फ करा, अशी मागणी फडणवीसांनी ट्विटद्वारे केली.