महापरिनिर्वाण दिनाच्या दिवशी बंगला सोडून का जाता?; जितेंद्र आव्हाड यांचा राज ठाकरेंना सवाल
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पुन्हा एकदा माजी केंद्रीय मंत्री शरद पवार यांच्यावर टीका केली आहे. राज ठाकरे यांच्या या टीकेचा माजी मंत्री, आमदार जितेंद्र आव्हाड यांनी खरपूस समाचार घेतला आहे. शरद पवार यांनी कोणत्या समाजासाठी काय काय केलं? याची यादीच जितेंद्र आव्हाड यांनी वाचून दाखवत राज ठाकरे यांना सडेतोड उत्तर दिलं आहे.
राज ठाकरे यांना नेहमीच चर्चेत रहायला आवडते आणि चर्चेत रहायचे असेल तर शरद पवारांचं नाव घ्यावं लागतं. महाराष्ट्रातील राजकारणात त्यांचं अस्तित्व संपलं आहे. शरद पवार यांनी काय करावं त्यापेक्षा राज ठाकरे यांनी काय करावं? किती वेळा त्यांनी भूमिका बदलावी? याचा त्यांनीच विचार करावा. शरद पवार यांना उपदेश करायला जाऊ नये. तुमच्या घराखालीच दलित विद्यार्थ्यांना मारहाण का झाली? एका मुलीला मारहाण झाली, असं सांगतानाच जेव्हा बाबासाहेब आंबेडकर यांचा महापरिनिर्वाण दिन असता तेव्हा तुम्ही तुमचा बंगला सोडून लोणावळ्याला जाऊन का राहतात? हे कोणाला माहित नाही. हे जगाला सांगावे लागेल, असा सवालच शरद पवार गटाचे नेते, आमदार जितेंद्र आव्हाड यांनी केला आहे.
आमदार जितेंद्र आव्हाड यांनी मीडियाशी संवाद साधताना हा सवाल केला आहे. तुमच्या मनातील जातीद्वेष आणि धर्म द्वेष किती आहे हे तुमच्या जवळच्या लोकांना माहीत आहे. राज ठाकरे यांनी जातीपातीच्या राजकारणात बोलू नये. ज्यांनी परप्रांतीय मुसलमान आणि दलितांच्या विरोधात भूमिका घेतली, अशा माणसाने जातीपातीबद्दल बोलावे? आणि ते पण शरद पवार यांच्याबद्दल बोलावे हे हास्यास्पद आहे आणि त्यांना हास्य विनोद करण्याची सवय आहे, असा टोला जितेंद्र आव्हाड यांनी लगावला.
ज्यांचे चार हात तुपात आणि डोके कढईत…
यावेळी राज ठाकरे यांनी केलेल्या आरक्षणाच्या मुद्द्यावरही त्यांनी भाष्य केलं. मला आताच कळलं, राज ठाकरे म्हणाले, महाराष्ट्राला आरक्षणाची गरज नाही. आरक्षण कशासाठी आहे हे समजून घ्यावे लागते. एसीच्या वातावरणातील घरात जन्मलेल्यांना आरक्षणाचे महत्त्व काय कळणार? असा सवाल करतानाच आरक्षणाचे महत्त्व समजण्यासाठी त्या परिस्थितीतून जावे लागते. याचा अनुभव असावा लागतो. ज्यांचे चारही हात तुपात आहे आणि डोके कढईत त्यांना काय आरक्षण कळणार? असा सवाल आव्हाड यांनी केला.
त्या मराठ्यांना आरक्षण मिळालंच पाहिजे
जातीनुसार जनगणना होऊन जाऊ दे. बहुजन समाज किती आहे हे महाराष्ट्राला कळेल. त्यांची आर्थिक परिस्थिती आज काय आहे हे कळेल. आर्थिक दुर्बल असणाऱ्या मराठ्यांना आरक्षण मिळालेच पाहिजे ही आमची भूमिका आहे, असंही त्यांनी स्पष्ट केलं.
पवारांनी काय केलं हे सांगण्याची गरज नाही
शरद पवार यांनी कुठल्या कुठल्या समाजासाठी काम केले. हे मी या क्षणी सांगण्याची गरज नाही. त्या त्या समाजाला व्यवस्थित माहिती आहे. शरद पवारांनी आपल्यासाठी काय केले, मग ते धनगर असो, आदिवासी असो की शेड्युल कास्ट असोॉ… भारतात मंडल आयोग आणण्याची हिंमत नव्हती. ओबीसींना आरक्षण देण्याचं काम शरद पवार यांनी केल आहे. सत्ता जाईल हे माहीत असतानाही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव मराठा विद्यापीठाला दिलं, महिला आरक्षण आणले, ओबीसी आरक्षण आणले. त्यामुळे शरद पवार साहेब जातीपातीचं राजकारण करत आहे असे सांगू नये. आपल्या घरात गप्पागोष्टी करण्यासाठी कार्यकर्त्यांना खूश करण्यासाठी बोलावे, असा चिमटाही त्यांनी काढले.