नवाब मलिक यांच्या जावयाची प्रकृती गंभीर, आयसीयूमध्ये दाखल; घातपाताचा संशय ?
माजी मंत्री नवाब मलिक यांचे जावई समीर खान यांचा अपघात झाला होता. त्यामध्ये त्यांच्या डोक्याला गंभीर मार लागल्याने रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यांची प्रकृती अद्याप गंभीर असून आयसीयूमध्ये दाखल करण्यात आलंय.
राज्यातील ज्येष्ठ नेते, राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार आणि माजी मंत्री नवाब मलिक यांच्या जावयाचा काल अपघात झाला होता. थार कार अंगावरून गेल्याने नवाब मलिक यांचे जावई समीर खान तसेच त्यांची कन्या निलोफर यांनाही मार लागला. या दुर्घटनेत खान हे जखमी झाले, त्यांच्या डोक्याला दुखापत झाली. त्यांना तातडीने नजीकच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले असून अपघातानंतर त्यांची प्रकृती अद्याप जखमी असून त्यांना आयसीयूमध्ये दाखल करण्यात आलं आहे. समीर खान यांच्या थार कारला भीषण अपघात झाला.
नवाब मलिक यांची मुलगी निलोफर आणि जावई समीर खान हे दोघेही त्यांच्या घराजवळ असणाऱ्या क्रिटी केअर या हॉस्पिटलमध्ये रेग्युलर चेकअपसाठी गेले होते. त्यानंतर दोघेही रुग्णालयातून बाहेर आले आणि समीर खान यांनी ड्रायव्हला फोन करून कार घेऊन येण्यास सांगितले. मात्र कार आणताना ड्रायव्हरचा पाय ब्रेक ऐवजी ॲक्सीलेटरवर पडला आणि ही दुर्घटना घडली.
समीर खान हे गाडीत बसत असतानाच ड्रायव्हरकडून ही चूक झाली आणि गाडी फुल स्पीडने जाऊन भिंतीला आदळली. त्यावेळी कारने चार ते पाच दुचाकीना देखील जोरदार धडक दिली. या अपघातात खान हेही गाडीसोबतच फरपटत गेले. त्यानंतर ही कार पंधरा फूट उंच भिंतीवर जाऊन आदळली. ड्रायव्हरच्या या अक्षम्य चुकीमुळे समीर खान यांच्या अंगावरूनच गाडीचे मागचे चाक गेल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे.
अनेक फ्रॅक्चर्स, डोक्यालाही मार
या अपघातात खान यांच्या पोटाला, छातीला, पाठीला तसेच मणक्याला ठिकठिकाणी फ्रॅक्चर्स आहेत. तसेच त्यांच्या डोक्यालाही बराच मार लागला असून मेंदूत क्लॉट झाल्याची माहिती देखील डॉक्टरांनी दिली आहे. सध्या त्यांची प्रकृती गंभीर असून त्यांना आयसीयूमध्ये ठेवण्यात आलंय.
अपघातावेळी ड्रायव्हर नशेत होता का ?
या अपघातानंतर कार चालवणारा ड्रायव्हर अब्दुल अन्सारी हा सध्या विनोबा भावे पोलिसांच्या ताब्यात आहे. पोलिसांकडून या प्रकरणाचा कसून तपास सुरू असून या अपघातामागे घातपात आहे का याचीही पोलिस चौकशी करत आहेत. दरम्यान कार चावणाऱ्या ड्रायव्हरने अपघातावेळी कोणतीही नशा केली नव्हती, अशी माहितीही पोलिसांनी दिली आहे.