मोठी बातमी ! नवाब मलिक यांचा जावई कार अपघातात जखमी, डोक्याला गंभीर दुखापत
राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार आणि माजी मंत्री नवाब मलिक यांचे जावई समीर खान यांचा अपघात झाला असून ते गंभीर जखमी झाले आहेत. यावेळी नवाब मलिक यांची मुलगी निलोफर देखील उपस्थित होती.
महाराष्ट्रातील दिग्गज नेते, राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार आणि माजी मंत्री नवाब मलिक यांच्या जावयाचा अपघात झाल्याची माहिती समोर आली आहे. मलिक यांचे जावई समीर खान यांच्या कारचा भीषण अपघात झाला असून या दुर्घटनेत खान यांच्या डोक्याला दुखापत झाली. अपघातावेळी नवाब मलिक यांची कन्या आणि खान यांची पत्नी निलोफर यादेखील कारमध्येच होत्या. त्यांच्याही हाताला दुखापत झाल्याचे वृत्त समोर आले आहे. खान यांच्या थार कारला अपघात झाला. कार चालवताना ड्रायव्हरचा पाय ब्रेक ऐवजी ॲक्सीलेटरवर पडला आणि हा अपघात झाला असे समजते. याप्रकरणी पोलिसांनी ड्रायव्हरला ताब्यात घेतले असून त्याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
कसा झाला अपघात ?
मिळालेल्या माहितीनुसार, नवाब मलिक यांची मुलगी निलोफर आणि जावई समीर खान हे दोघेही त्यांच्या घराजवळ असणाऱ्या क्रिटी केअर या हॉस्पिटलमध्ये रेग्युलर चेकअपसाठी गेले होते. त्यानंतर दोघेही रुग्णालयातून बाहेर आले आणि समीर खान यांनी ड्रायव्हला फोन करून कार घेऊन येण्यास सांगितले. मात्र कार आणताना ड्रायव्हरचा पाय ब्रेक ऐवजी ॲक्सीलेटरवर पडला आणि थार कार जोरात येऊन समीर खान यांना धडकली. यामध्ये समीर खान यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. त्यांना तातडीने हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं. सध्या ते आयसीयूमध्ये असून आणखी काही काळ त्यांना अंडर ऑब्झर्व्हेशन ठेवण्यात येणार आहे.
Mumbai, Maharashtra | Nawab Malik’s son-in-law Sameer Khan was seriously injured in a car accident in Kurla. Nawab Malik’s daughter and son-in-law were returning after a routine check-up at a hospital. When they were getting into the car, the car driver accidentally pressed down…
— ANI (@ANI) September 17, 2024
या अपघातात समीर खान यांच्या डोक्याला तसेच चेहऱ्यालाही दुखापत झाल्याचे समजते. कार चालकाने गाडीचा ॲक्सीलेटर दाबला त्यामुळे गाडी जोरात येऊन समीर खान यांच्यावर धडकली आणि ते कारसकट काही अंतर पुढे फरपटत गेले. ती कार पुढे जाऊन एचडीआयएल वसाहतीच्या भिंतीवर आदळली. कारमुळे ही बाईक्स देखील चिरडल्या गेल्यात. या प्रकरणात कार चालक अबुल अन्यारी याला पोलिसांनी ताब्यात घेतलं असून त्याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.